चीनमधलं हे मच्छिमारांचं गाव कसं झालं 'सिलिकॉन व्हॅली'?

व्हीडिओ कॅप्शन, चीनमधलं एक छोटसं शहर कसं बनलं हायटेक?
    • Author, विनीत खरे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

दक्षिण चीनमधलं शेनझेन हे 40 वर्षांपूर्वी मच्छिमारांचं गाव होतं. जिथून लोक पोहून आणि जीव धोक्यात घालून शेजारच्या हाँगकाँगमध्ये कामाच्या शोधासाठी जात असत. आज शेनझेनला 'चीनची सिलिकॉन व्हॅली' किंवा 'जगाचं हार्डवेअर केंद्र' म्हणतात.

1980मध्ये चीनचे नेते डेंग श्याओपिंग यांनी शेनझेनमध्ये पहिल्या स्पेशल इकॉनॉमिक झोनची (SEZ) निर्मिती केली. त्यानंतर शेनझेनचं स्वरूप बदलण्यास सुरुवात झाली.

शेनझेनच्या संग्रहालयात जुन्या गावाचं वर्णन करणारे फोटो आहेत. ज्यात चहूबाजूनं जमीन दिसत असून फॅक्टरीमध्ये काम करणारे लोक दिसत आहेत.

40 वर्षांपूर्वीचं शेनजेन

फोटो स्रोत, Shenzhen Museum

फोटो कॅप्शन, 40 वर्षांपूर्वीचं शेनजेन

या वस्तूसंग्रहालयात डेंग श्याओपिंग यांच्या फोटोंशिवाय त्यांची गाडी, त्यांचा बिछाना यांसह काही खाजगी वस्तूही ठेवल्या आहेत.

80 आणि 90 च्या दशकांत शेनझेनच्या कंपन्यांमध्ये चीनच्या दूरवरच्या गरीब गावांमध्ये राहणारे लोक कमी पगारांत काम करायचे.

कर आणि श्रम कायद्यातून सुटका मिळाल्यामुळे कंपन्यांना इथे उत्पादन करणं शक्य जायचं. त्यामुळे लवकरच या शहराला जगाची कंपनी म्हटलं जायचं.

आज शेनझेनला 'चीनची सिलिकॉन व्हॅली' किंवा 'जगाचं हार्डवेअर केंद्र' म्हणतात.

जगातल्या सगळ्यांत अलीकडे उभं राहिलेलं शेनझेन शहर इनोवेशन, तंत्रज्ञान, आर्टिफिशियन इंटेलिजन्स, स्टार्ट अप्स आणि बायोटेक्नोलॉजीचं केंद्र बनलं आहे.

डेंग श्याओपिंग हे शेनजेनमध्ये

फोटो स्रोत, Shenzhen Museum

फोटो कॅप्शन, डेंग श्याओपिंग हे शेनजेनमध्ये

काही आकड्यांनुसार, शेनझेन शहराची अर्थव्यवस्था हाँगकाँग आणि सिंगापूरच्या बरोबरीची आहे. इथलं बंदर जगातलं सगळ्यांत व्यग्र बंदरांपैकी एक मानलं जात आहे.

स्कायस्क्रॅपर सेंटरच्या यादीनुसार जगातल्या 100 उंच इमारतींपैकी 6 शेनझेमध्ये आहेत.

शेनझेनच्या उंच इमारती, हवेची गुणवत्ता, रुंद रस्त्यांवर धावणाऱ्या इलेक्ट्रिक बस आणि गाड्या, हे सगळंच चीन आणि पूर्ण आशियात या शहराला वेगळं बनवतं.

शेनझेनमधून निघालेल्या टेन्सेंट, जेडीटीई आणि ह्यूवेई या कंपन्यांनी जगात आपली ओळख बनवली आहे.

फायनान्शियल टाइम्सनुसार, गेल्या वर्षी ह्यूवेईनं संशोधनावर 14 अब्ज डॉलर खर्च केले.

शेनजेनमध्ये हार्डवेअर पार्ट मिळणं खूपच सोपं आहे.
फोटो कॅप्शन, शेनझेनमध्ये हार्डवेअर पार्ट मिळणं खूपच सोपं आहे.

शेनझेनमध्ये टेक्नॉलॉजी स्टार्टअप सुरू करणारे त्यांचे अनुभव व्यक्त करताना सांगतात की, "ज्या वेगात शेनझेनमध्ये तांत्रिक उपकरणं तयारं करणारे लोक त्याचा प्रोटाटाईप बनवतात, त्यांना टेस्ट करून पुन्हा बाजारात आणतात, हा वेग साधणं जगात दुसरीकडे कुठे शक्य नाही."

त्यामुळे इथे तंत्रज्ञानाचा अनुभव असणाऱ्यांची काही कमी नाही. तर, स्वस्तात मशीन, चिप्स, पार्ट याचीही सहजच उपलब्धता आहे.

युरोपातून आलेल्या मिलान ग्लामोचिक यांनी चार वर्षांपूर्वी प्रथम मुलांसाठी रोबोटिक्स शिकवण्यासाठी शाळा सुरू केली.

या शाळेत 5 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी विज्ञान, इंजिनिअरिंग, कंप्युटर सायन्स, रोबोटिक्स यांचं शिक्षण दिलं जातं.

या शाळेची प्रत्येक तासाची फी काही हजार आहे. यामुळे इथे केवळ श्रीमंतांची मुलंच शिक्षण घेण्यासाठी येतात.

मिलान यांनी अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीसह अनेक देशांमध्ये काम केलं आहे.
फोटो कॅप्शन, मिलान यांनी अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीसह अनेक देशांमध्ये काम केलं आहे.

मिलान सांगतात, "आपल्या आवडीचं डिझाईन बनवण्याची या मुलांना सूट आहे. जर ते नापास झाले तर ते पुन्हा प्रयत्न करतात. कारण, त्यांनी स्वतः अडचणींचं कारण शोधलं पाहिजे."

या शाळेच्या क्लासमधल्या एका टेबलावर चारही बाजूंनी छोटी-छोटी आणि खूप गुंतागुंतीची उपकरणं पसरलेली होती.

मिलान यांनी अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीसह अनेक देशांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या मते, शेनझेनमधला तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग भन्नाट असून त्यासोबत राहणं अवघड आहे.

मिलान मुलांना रोबोटिक्स शिकवतात.
फोटो कॅप्शन, मिलान मुलांना रोबोटिक्स शिकवतात.

मिलान सांगतात, "आम्ही तंत्रज्ञानाच्या विकासाच्या केंद्रस्थानी आहोत. एखाद्या प्रोग्रामच्या विकासासाठी इकडे सगळ्या सुविधा आहेत. आम्ही ज्या प्रोग्रामचा विकास करतो, ते नंतर जगभरात पसरतात. मग, ते हार्डवेअर असो की सॉफ्टवेअर. शेनझेनमध्ये तंत्रज्ञानाच्या विकासासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे."

शेनझेनमधली ह्वा छियांग पेई बाजार ही एक प्रसिद्ध अशी जागा आहे. तिथे प्रत्येक प्रकारचं इलेक्ट्रॉनिक उपकरण उपलब्ध आहे. बहुमजली वातानुकूलित बाजाराच्या आत इलेक्ट्रॉनिक्सचं जग आहे. मोबाईल, ड्रोन, चिप्स किंवा इतर भाग इथे सगळं काही मिळतं. फक्त तुमच्यात घासाघीस करण्याची ताकद हवी.

शेनझेनमध्ये अशा अनेक बाजारपेठा आहेत.

शेनजेन
फोटो कॅप्शन, ह्वा छियांग पेई बाजार

आकडेवारीनुसार, शहराची अर्थव्यवस्था 1979 मध्ये 30 कोटी डॉलर होती. 2016 साली हा आकडा 256 अब्ज डॉलर इतकी पोहोचली आहे.

लाव्हा या भारतीय कंपनीनंसुद्धा याच कारणांमुळे मोबाईल, टॅबलेट, फिचर फोनची रचना, उत्पादन यासाठी तिथे संशोधन केंद्र उभारलं.

शेनझेन मुख्य शहर ठेवत लाव्हा कंपनीने बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, मेक्सिको, इजिप्त, अशा बाजारात आपली उत्पादनं विकली.

दुपारी जेव्हा आम्ही नानशान जिल्ह्यातल्या लाव्हाच्या कार्यालयात पोहोचलो तेव्हा तिथले कर्मचारी छान झोपले होते.

शेनजेन
फोटो कॅप्शन, भारतीय कंपनी लाव्हा ने 2009 साली तिथे मोबाईल टॅब यांचं उत्पादन केंद्र उघडलं आहे.

शेनझेनमध्ये काम करण्याची हीच पद्धत आहे. इथे दुपारी तुम्हाला झोपायला एक पलंगही मिळतो.

शेनझेनमध्ये पाच वर्षांपासून काम करणारे DGM Finance म्हणून काम करणारे रति राम म्हणतात, "शेनझेनमध्ये जास्त पर्याय आहेत. तिथे जर तुम्ही मशीनरीचे भाग घ्यायला जाता तेव्हा अगदी स्वस्त दरात सगळ्या गोष्टी मिळतात. तिथे लोकांशी बोलणं सोपं असतं. सुट्या भागाचे अनेक वितरक आहेत. भारतात हे शक्य नाही. इथे प्रत्येक रस्त्यात, स्वस्त आणि चांगलं सामान मिळतं.

दिल्लीमध्ये राहणाऱ्या रती राम यांचं लग्नही चीनमध्येच झालं आहे.

रती राम सांगतात की, त्यांच्या कंपनीचे भारतीय इंजिनिअर तिथे रचना, उत्पादन, संशोधन अशा अनेक गोष्टी शिकायला येतात.

रती राम
फोटो कॅप्शन, दिल्लीतील रती राम यांनी चीनमध्येच लग्न केलं आहे.

सरकारी अनुदान आणि कंपन्यांत गुंतवणूक करणारे व्हेंचर कॅपिटॅलिस्ट यांच्यामुळे हा भाग आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला आहे.

स्मार्ट हेडलाईट, बिल्ट इन स्पीकर अशा सुविधांनी युक्त असलेल्या लिवॉल कंपनीचे संस्थापक असलेले 46 वर्षीय ब्रायन झंग यांनी चार वर्षांपूर्वी कंपनी सुरू करण्यासाठी शेनझेनची निवड केली.

ते सगळ्यांत आधी 1994 मध्ये शेनजेनला आले होते.

झंग सांगतात, "त्या वेळी हे एक छोटंसं आणि स्वच्छ शहर होतं. जिथे फक्त एक किंवा दोन कार धुण्याची गरज पडायची. तेव्हा मला महिन्याला 600 युआन (म्हणजे 6000 रुपये) मिळायचे."

ब्रायन झंग
फोटो कॅप्शन, ब्रायन झंग यांनी आपली कंपनी सुरू करण्यासाठी शिनजिंगची निवड केली आहे.

आता 600 युआनमध्ये शेनझेनला तुम्हाला रहायला घरसुद्धा मिळणार नाही.

लिवॉलला रिसर्च, पेटंट, आणि ट्रेडमार्कसाठी सरकारकडून 25 मिलिअन युआन मिळाले. त्या पैशाच्या मदतीने कंपनीच्या अनेक देशांत व्यापाराचा विस्तार झाला.

झंग सांगतात, "शेनजेन मध्ये काही नवीन संशोधन करणाऱ्या स्टार्ट अप ला प्रोत्साहन देण्याचं धोरण आहे. कंपनी वेगाने पुढे जाण्यासाठी सरकारकडून हा पैसा दिला जातो जेणेकरून कंपनीचा विस्तार होईल. आम्ही चीन आणि जगभरात 170 पेटंटसाठी अर्ज आले आहेत. एखाद्या स्टार्ट अप साठी इतका पैसा खर्च करणं सोपं नव्हतं.

गेल्या 40 वर्षांत एका गावातून अशा पॉवरहाऊसमध्ये रुपांतरित झालेल्या शहरात संधीची काहीही कमी नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)