दुष्काळ मानवाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे - WFP

2020 वर्षाचा नोबेल शांतता पुरस्कार गुरुवारी (11 डिसेंबर) जागतिक अन्नसुरक्षा कार्यक्रम (वर्ल्ड फूड प्रोग्रॅम WFP) या संघटनेला प्रदान करण्यात आला.

संघटनेचे कार्यकारी संचालक डेव्हीड बिजली यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यावेळी बिजली म्हणाले, "400 व्या शतकात रोम शहरात भीषण दुष्काळ पडला होता. त्यामुळे संपूर्ण लोकसंख्येपैकी 90 टक्के लोक मृत्यूमुखी पडले. त्याच वेळी रोमन साम्राज्याचं पतन होण्यास सुरुवात झाली. पण दुष्काळ पडल्यामुळे पतन झालं की पतन झाल्यामुळे दुष्काळ पडला हे दोन प्रश्न निर्माण होतात. या दोन्ही प्रश्नांचं उत्तर 'हो' असंच आहे."

डेव्हीड बिजली पुढे म्हणाले, "आपण त्याच प्रकारच्या दुष्काळाकडे चाललो आहोत. सध्याच्या श्रीमंत, आधुनिक, तंत्रज्ञानाने प्रगत अशा जगात याची कल्पना करणं अवघड आहे, पण हे खरं आहे. दुष्काळ मानवाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे, हे सांगणं माझं कर्तव्य आहे."

ते पुढे म्हणतात, "दुष्काळ रोखण्यात अयशस्वी ठरल्यास अनेकांचे जीव जातील. मोठा अनर्थ होईल. अन्न सुरक्षेत शांततेचा मार्ग दडलेला आहे, असं आम्ही मानतो. हा नोबेल पुरस्कार फक्त धन्यवाद म्हणून नाही. तर पुढचं पाऊल उचलण्यासाठी मिळाला, असं आम्हाला वाटतं."

जागतिक अन्न सुरक्षा कार्यक्रम ही संघटना कुपोषणाविरुद्ध लढणारी जगातली सर्वांत मोठी संघटना आहे. अन्न सुरक्षा क्षेत्रात या संघटनेचं काम उल्लेखनीय आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनांच्या अखत्यारित जागतिक अन्नसुरक्षा कार्यक्रम येतो. या संघटनेचं मुख्यालय रोम येथे आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)