उंची वाढवण्याची शस्त्रक्रिया करून 3 इंचांनी वाढवले पाय, पण...

फोटो स्रोत, DR S. ROBERT ROZBRUCH
- Author, टॉम ब्राडा
- Role, बीबीसी न्यूज
उंची वाढवण्यासाठी आपण विविध प्रकारचे व्यायाम करतो. पण उंची वाढवण्यासाठी कोणी पाय लांब केल्याचं ऐकलंय? ऑपरेशनने पाय लांब केल्याचं वाचलंय? नाही ना?
पण 2015 मध्ये सॅमने पाय लांब करण्यासाठी शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर त्यांची उंची 5 फूट 4 इंचावरून 5 फूट 7 इंच झाली आहे. पाय लांब करण्याच्या शस्त्रक्रियेनंतर सॅमची उंची तीन इंचाने वाढली.
हे वाचून तुम्हाला वाटलं असेल..व्वा! किती छान…पण जरा थांबा..
पाय लांब करण्याची ही शस्त्रक्रिया वाटते, तेवढी सोपी नाही. या शस्त्रक्रियेमुळे आरोग्याला धोका पोहोचू शकतो. तज्ज्ञांच्या मते, काही व्यक्तींना ही शस्त्रक्रिया केल्यानंतर होणारा त्रास खूप वर्ष राहू शकतो.
एकेकाळी सॅम बेकर आपल्या वर्गात सर्वात उंच होते. पण माध्यमिक शाळेत गेल्यानंतर त्यांच्या मित्रांची उंची त्यांच्यापेक्षा जास्त वाढली होती.
सॅम सांगतात, "मी कॉलेजमध्ये असताना मला जाणीव झाली. माझ्या वर्गात शिकणाऱ्या इतर मुलांपेक्षा माझी उंची कमी होती. एवढंच नाही, तर मुलींच्या उंचीपेक्षाही माझी उंची कमी होती."
"या गोष्टीचा आपल्या मनावर मोठा परिणाम होतो. खरं सांगू, आपल्यापेक्षा उंचीने कमी असलेल्या मुलांना मुली डेट करत नाहीत. एकवेळ अशी होती, माझ्या मनात विचार आला, आता मला जीवनसाथी मिळणारच नाही," असं सॅम म्हणतात.

फोटो स्रोत, DR S. ROBERT ROZBRUCH
न्यूयॉर्कमध्ये रहाणाऱ्या सॅम यांना त्यांची उंची अजून वाढेल असा विश्वास होता. पण मनात कुठेतरी उंची वाढायची तेवढी वाढलीय, हा विचार सारखा सतावत होता.
ते पुढे सांगतात, "उंच असल्यामुळे व्यक्ती जास्त यशस्वी होतो, असं मला कायम वाटायचं. त्यामुळे उंची कशी वाढवायची याबद्दल मी सतत विचार करायचो,".
मी कधी चालू शकतो?
उंची वाढवण्यासाठी सॅम यांनी विविध पर्याय शोधले. पण स्ट्रेचिंगचे व्यायाम किंवा हिल्स असणारे बूट वापरण्यासाठी ते नाखूश नव्हते.
मग सॅम यांना उंची वाढवण्यासाठी पायाची शस्त्रक्रिया शक्य आहे, याची माहिती मिळाली. सॅम यांना आशेचा किरण दिसू लागला. आईशी चर्चा केल्यानंतर डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया आणि संभाव्य धोके माहित करून घेतल्यानंतर त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
2015 मध्ये सॅम यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांची उंची 5 फूट 4 इंचावरून 5 फूट 7 इंच झाली.
सॅम पुढे सांगतात, "डॉक्टरांनी पहिल्यांदाच कल्पना दिली होती. ही शस्त्रक्रिया अजिबात सोपी नाही. माझ्या मनात विचार सुरू होता. उंची तीन इंचांनी वाढल्यानंतर मी काय करणार? मी चालू शकतो? धावू शकतो?"
"ऑपरेशननंतर फिजीओथेरपीचे सेशन्स झाले. आठवड्यात तीन-चार दिवस काही तास ही थेरपी चालायची. जवळपास सहा महिने फिजीओथेरपीचे सेशन्स सुरू होते," असं ते पुढे सांगतात.
"असं वाटलं, पाय तोडून पुन्हा चालायला सुरूवात करू. ही एक कॉसमॅटिक सर्जरी आहे. पण, यामुळे माझ्या मानसिक आरोग्यावर खूप परिणाम झाला," असं सॅम म्हणतात.
पाय लांब करण्याची शस्त्रक्रिया 10 पेक्षा जास्त देशांमध्ये केली जाते. या शस्त्रक्रियेनंतर उंची पाच इंचापर्यंत वाढू शकते. दरवर्षी किती लोक ही शस्त्रक्रिया करतात, हे सांगण खूप कठीण आहे. पण डॉक्टरांच्या माहितीप्रमाणे याची मागणी वाढू लागली आहे. बीबीसीने विविध देशातील डॉक्टरांना संपर्क केला, ज्याठिकाणी ही शस्त्रक्रिया केली जाते.
अमेरिका, जर्मनी आणि दक्षिण कोरियामधील मोठे क्लिनिक्स दरवर्षी 100 ते 200 शस्त्रक्रिया करतात. स्पेन, भारत, तुर्की आणि इटलीमध्ये दरवर्षी 20 ते 40 शस्त्रक्रिया केल्या जातात. तर, ब्रिटनमध्ये 15 शस्त्रक्रिया होतात.

फोटो स्रोत, DR S. ROBERT ROZBRUCH
ब्रिटनमध्ये ही शस्त्रक्रिया फार थोड्या क्लिनिकमध्ये केली जाते. केअर क्वालिटी कमिशन या शस्त्रक्रियांकडे लक्ष देतं. या शस्त्रक्रियेची किंमत 50 हजार पाऊंड आहे. अमेरिकेत 75 हजार डॉलर्सपासून 2,80,000 डॉलर्स या शस्त्रक्रियेसाठी खर्च येऊ शकतो.
ही शस्त्रक्रिया खूपवेळ चालणारी, खर्चिक आणि शरीराला त्रास होणारी आहे. उंची वाढवण्यासाठी पायाच्या शस्त्रक्रियेचा शोध रशियन डॉक्टर गेव्रिल इलिजारोव यांनी लावला. दुसऱ्या महायुद्धानंतर परतणाऱ्या जवानांनावर ते शस्त्रक्रिया करायचे. गेल्या 70 वर्षात अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित झालं. पण शस्त्रक्रियेचा मूळ सिद्धांत अजूनही तसाच आहे.
पायाच्या हाडात छेद करून त्याचे दोन तुकडे केले जातात. नंतर शस्त्रक्रियेच्या मदतीने एक रॉड हाडांच्या आत फिक्स केला जातो. या रॉडला दर दिवशी एक मिलीमीटर लांब केलं जातं. हाडं पुन्हा जोडली जाईपर्यंत आणि रुग्णाची इच्छा असेपर्यंत उंची वाढवली जाते.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अनेक दिवस चालण्याचा प्रयत्न करावा लागतो. या शस्त्रक्रियेदरम्यान नाजूक नसांना इजा होण्याची भीती असते. रक्ताच्या गाठी होऊ शकतात किंवा हाडं पुन्हा जोडली जाऊ शकत नाहीत.
'मी उंची तीन इंच वाढवली'
बार्नी यांनी 2015 मध्ये इटलीत उंची वाढवण्यासाठी ही शस्त्रक्रिया करून घेतली. त्यांची उंच तीन इंचांनी वाढली. आजारामुळे बार्नी यांचे पाय वाकले होते. त्यामुळे त्यांनी पाय सरळ करण्यासोबत पाय लांब करण्याचा निर्णय घेतला.
दोन शस्त्रक्रिया एकत्र होऊ शकतात. रिकव्हरी रेटवर याचा काहीच परिणाम होणार नाही, असं आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं. मात्र, शस्त्रक्रियेनंतर पाच वर्षांनी बार्नी यांना अजूनही त्रास होतोय.
ते म्हणतात, "मी 16 वर्षाचा असतो, तर त्रास जास्त झाला नसता. पण ऑपरेशनच्या वेळी मी 46 वर्षांचा होतो."
"माझ्या पायांची हाडं पुन्हा पहिल्यासारखी झाली नाहीत. त्यांच्यात तीन इंचाची गॅप आहे. दोन हाडांमध्ये एक तीन इंचाचा रॉड आहे," असं बार्नी म्हणतात.
"ही शस्त्रक्रिया केल्यानंतर मला खूप त्रास सहन करावा लागला. असं वाटत होतं, पायातील नसांना कोणीतरी ओढत आहे. खूप त्रासदायक होतं ते सगळं."
बार्नी यांच्या हाडात गॅप असूनही आहे. त्यांच्या पायातील रॉड वजन सांभाळण्यासाठी उपयुक्त असल्याने, बार्नी यांना चालताना त्रास होत नाही. मात्र, मानसिकरित्या बार्नी आतून खूप खचलेले आहेत.
"माझ्या आयुष्यात एक क्षण असा आला की, मी चूक केली का? असा विचार मनात आला. पण, माझे कुटुंबीय आणि बॉस चांगले असल्याने मला त्रास झाला नाही. या शस्त्रक्रियेनंतर होणारा त्रास वाढत गेला, तर खूप वाढतो," असं बार्नी म्हणतात.

ब्रिटनच्या अस्थिरोग तज्ज्ञांच्या संघटनेचे प्रोफेसर हमीश सिंपसन यांनी शस्त्रक्रियेनंतर असलेल्या संभाव्य धोक्यांबद्दल माहिती दिली.
ते म्हणतात, "अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया आता सुरक्षित आहे. मात्र, हाडांची उंची वाढवताना रक्तवाहिन्या, नसा, त्वचा यांचा आकारही वाढवावा लागतो. त्यामुळेच ही शस्त्रक्रिया खूप कठीण आहे,".
अस्थिरोगतज्ज्ञ सर्जन डॉ. डेवि कुठड गुडियर सांगतात, "पायाची उंची वाढवण्याची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींमध्ये मानसिक तणाव असल्याचं दिसून आलंय. या शस्त्रक्रियेची वाढती मागणी पाहता, येणाऱ्या काळात लोकांनी आरोग्यापेक्षा पैशाला जास्त महत्त्व देऊ नये,".
"शस्त्रक्रियेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे जायचं किंवा कमी पैसे घेणाऱ्याकडे असे दोन पर्याय लोकांसमोर असतील. पण लोकांना त्यांच्यासोबत काय होण्याची शक्यता आहे. याची माहिती देण्यात आली नसेल," असं ते पुढे म्हणतात.
तुम्ही बाहेरच्या देशात शस्त्रक्रिया करून पुन्हा ब्रिटनमध्ये याल. पण आम्हालाच तुम्हाला पहावं लागेल, असं डॉ. गुडियर सांगतात.
बार्नी यांना भेटल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पायातील रॉड काढण्यात येणार होता.
बार्नी सांगतात, "बऱ्याच लोकांना शस्त्रक्रियेचा चांगला फायदा होतो. मला पूर्णत: रिकव्हर होण्यासाठी वेळ लागेल. मला वाटतं माझं ऑपरेशन योग्य पद्धतीने झालं नव्हतं,".
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








