You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रावरून दगड-माती आणणाऱ्याला 'नासा' देणार एक डॉलर रक्कम
- Author, जस्टिन हार्पर
- Role, बिझनेस रिपोर्टर, बीबीसी न्यूज
नासा ही अमेरिकन अंतराळ संस्था चंद्राच्या पृष्ठभागावरून दगड-माती आणण्यासाठी एका खासगी कंपनीला 1 अमेरिकी डॉलर एवढी रक्कम देणार आहे.
'लूनार आउटपोस्ट' असं या कंपनीचं नाव आहे. गुरुवारीच हा करार करण्यात आला. ही कंपनी नासासाठी चंद्रावरून दगडाचे नमुने आणेल.
नासाने एकूण चार कंपन्यांना अशा प्रकारचे कंत्राट दिले आहेत. या कंपन्या अत्यल्प किंमतीला नासासाठी चंद्रावरून दगडांचे नमुने आणणार आहेत.
यामध्ये कॅलिफोर्नियातील मास्टेन स्पेस सिस्टम्स, टोकियो इथली आय-स्पेस आणि तिसरी कंपनी याच आय-स्पेसची युरोपातली सहाय्यक कंपनी आहे. नासा या कंपन्यांना चंद्रावरून दगड, धोंडे आणि माती आणण्यासाठी मोबदला देईल.
हे नमुने 50 ग्राम ते 500 ग्राम वजनाचे असू शकतात.
"या कंपन्या आमच्यासाठी नमुने गोळा करतील आणि ते नमुने आम्हाला देतील. या नमुन्यांशी संबंधित डेटाही देतील. यातून चंद्राची अधिक माहिती मिळवता येईल", असं नासाच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे.
लूनार आउटपोस्टचे सीईओ जस्टिन सायरस यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "2023 साली ही मोहीम पार पडणार आहे. मात्र, आम्ही काही लँडर कंपन्यांशी चर्चा करतोय. सर्व योग्य पद्धतीने पार पडल्यास ठरलेल्या वेळेच्या आधीसुद्धा मोहीम सुरू करता येईल."
'प्रश्न पैशांचा नाही'
अमेरिकेतील कोलोरॅडोमधली लूनार आउटपोस्ट ही एक रोबोटिक्स कंपनी आहे. नासाशी केलेल्या करारानुसार या कंपनीला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून दगड, मातीचे नमुने आणण्यासाठी 1 अमेरिकन डॉलर मिळेल.
मात्र, या कामासाठी नासाकडून मिळणारी रक्कम केवळ प्रेरणा नाही तर या मोहिमेतून कंपन्यांना इतरही अनेक वैज्ञानिक फायदे मिळणार आहेत. उदााहरणार्थ कंपन्यांना चंद्राच्या पृष्ठभागावरून संसाधनांचा उपसा करण्यासाठीच्या अभ्यासाठीची परवानगी मिळणार आहे.
सायरस म्हणतात, "या मोहिमेमुळे मोठा बदल घडणार आहे. विशेषतः अंतराळ संशोधनाशी संबंधित विचारधारेत आमूलाग्र परिवर्तन होईल."
सायरस यांची कंपनी चंद्रावर प्रवासाच्या दृष्टीने काम करणाऱ्या ब्लू ओरायझनसारख्या इतर काही कंपन्यांच्या संपर्कात आहे. ब्लू ओरायझन कंपनीच्या निर्मितीत अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बोसेफ यांचा मोठा हातभार आहे.
जपानच्या ज्या कंपनीसोबत नासाने करार केला आहे, त्या कंपनीला 5 हजार डॉलर्स देण्यात येणार आहेत. ही जपानी कंपनी 2022 साली चंद्राची उत्तर-पूर्व भागातून नमुने गोळा करेल.
एक डॉलर तीन हफ्त्यांमध्ये मिळणार
अंतराळतज्ज्ञ सीनिएड ओ सुलीवान म्हणतात, "स्पेस प्रोग्रामसाठी इथे 1 अमेरिकी डॉलर ही रक्कम महत्त्वाची नाही तर अशा कार्यक्रमांमध्ये नासाचं सहभागी होणंच मुळात महत्त्वाचं आहे. याद्वारे नासा एक उदाहरण घालून देत आहे."
ते पुढे म्हणतात, "या कार्यक्रमासाठी किती रक्कम दिली हे महत्त्वाचं नाही तर पृथ्वीच्या बाहेर खरेदी-विक्रीसाठीची बाजारपेठ उभारण्यासाठी व्यावसायिक आणि कायदेशीर निकष तयार करणं महत्त्वाचं आहे."
तिन्ही कंपन्यांच्या रकमेचं वितरण तीन हफ्त्यांमध्ये करण्यात येईल, असं नासाकडून सांगण्यात आलं आहे.
पहिल्या हफ्त्यात कंपन्यांना 10% रक्कम मिळेल. त्यानंतर स्पेसक्राफ्ट लाँच करतानाच्या दुसऱ्या टप्प्यात पुढील 10% रक्कम देण्यात येईल. यानंतर कंपन्यांनी गोळा केलेल्या नमुन्यांची नासाकडून पडताळणी झाल्यानंतर उर्वरित 80% रक्कम सुपूर्द करण्यात येईल.
यावर सायरस गमतीत म्हणतात, "एका कंपनीला 1 डॉलरसुद्धा हफ्त्यांमध्ये मिळणार आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)