अमेरिका निवडणूक निकाल 2020 : विजयी उमेदवार कोण, हे कधी कळेल?

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत.
विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप आणि प्रतिस्पर्धी डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे आपापल्या विजयाचे दावे करत आहेत.
पण दोन दिवस उलटून गेले तरी अद्याप विजय कुणी मिळवला, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
मग विजयी उमेदवार कोण हे कधी कळेल, हा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडलेला आहे. अद्याप मतमोजणीच सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
त्यामुळे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे.
कोरोना व्हायरसच्या साथीमुळे अनेक मतदारांनी पोस्टल मतदान करण्यास पसंती दिली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोस्टल मतदान या निवडणुकीत झालेलं आहे.
हे मतदान कसं मोजावं याबाबत अमेरिकेतील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे कायदे आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला थोडा विलंब लागण्याची शक्यता आहे.

जो बायडन यांना पुरेशी लोकप्रिय मतं मिळाली की नाही?
निवडणुकीत जो बायडन हे आघाडीवर आहेत. पण त्यांना विजयासाठी आवश्यक मतं अद्याप मिळालेली नाहीत.
अमेरिकेत इलेक्टोरल कॉलेज पद्धतीने मतमोजणी केली जाते. त्यामुळे या प्रक्रियेत बायडन यांना बहुमत सिद्ध करणं आवश्यक आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या प्रक्रियेत राज्याच्या लोकसंख्येनुसार त्याठिकाणी विशिष्ट संख्येने इलेक्टर असतात. तुम्ही या राज्यात बहुमत मिळवल्यास त्या राज्यातील संपूर्ण इलेक्टर्स तुमच्या पारड्यात जातात. (पण नेब्रास्का आणि मेन या राज्यांत वेगळी यंत्रणा आहे.)
अमेरिकेत राज्यांमधून 538 इतकं इलेक्टोरल मतांची संख्या आहे. त्यापैकी 270 मतं मिळवणारा उमेदवार विजयी होत असतो.
प्रक्रियेला उशीर का लागतोय?
प्रत्येक राज्यात कोणत्या क्रमाने मतमोजणी करण्यात येते, यावर हे अवलंबून आहे. त्या राज्यांची माहिती आपण घेऊ -
अरिझोना (11 मतं) - या राज्यात जो बायडन यांना किंचित आघाडी मिळाली आहे. या राज्यात 5 लाख मतांची मोजणी अद्याप बाकी असल्याचं सांगितलं जातं आहे. यापैकी निम्म्याहून अधिक मत मेरिकोपा काऊंटी या परिसरातील आहेत. स्थानिक प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी सात वाजेपर्यंत इथला निकाल जाहीर केला जाऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
नेवाडा (6 मतं) - इथंही बायडन यांना निसटती आघाडी मिळाली आहे. मतमोजणी वेगाने करण्यात येत असल्याचं येथील राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. त्यासाठी वेळमर्यादाही देण्यात आली आहे. इथली पोस्टल मतं अद्याप मोजण्यात आलेली नाहीत.
जॉर्जिया (16 मतं) - या राज्यात ट्रंप बायडन यांच्यापेक्षा किंचित पुढे आहेत. इथल्या 90 हजार मतांची मोजणी अद्याप बाकी आहे.
पेन्सिल्व्हेनिया (20 मतं) - याठिकाणी अद्याप 7 लाख 63 हजार 311 पोस्टल मतं मोजायचं बाकी आहे.
या राज्यातील कायद्यानुसार मतदानाआधी पोस्टल मतं मोजली जाऊ शकत नाहीत. सध्या ट्रंप आघाडीवर असले तरी पोस्टल मतांची मोजणी अद्याप बाकी असल्याने काहीही होऊ शकतं, असं म्हटलं जात आहे.
विल्किन्सन (10 आणि मिशिगन (16) - विल्किन्सन आणि मिशिगनमध्ये बायडन हेच विजय मिळवतील असा अंदाज विविध माध्यमांनी व्यक्त केला आहे.
पण याठिकाणी बायडन आणि ट्रंप यांच्यामधील मतांचा फरक केवळ 1 टक्के इतकाच आहे.
मतमोजणी इतकी अवघड का?
इतर देशांप्रमाणे अमेरिकेत एकच निवडणूक आयोग नाही. इथं होणाऱ्या निवडणुकीवर देखरेख त्या-त्या राज्यातील प्रशासनाकडून केलं जातं. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांतील नियम आणि कायदे वेगळे आहेत. याचा निकालावर परिणाम होत आहे. त्यामुळेच निकाल येण्यास विलंब होत आहे.
आता फक्त आकडेमोड बाकी आहे का?
डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडन यांनी नेवाडा, अरिझोना आणि विल्किन्सन तसंच मिशिगन राज्यांत विजय मिळवल्यास त्याना 270 मतं मिळतील. ट्रंप यांना निवडणूक जिंकण्यासाठी पेन्सिल्व्हेनियासह जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, नेवाडा आणि अरिझोना या राज्यांत विजय मिळवणं आवश्यक आहे. पण ट्रंप यांनी काही कायदेशीर आव्हानं दिली आहेत, ती पुढीलप्रमाणे -

फोटो स्रोत, Getty Images
- विल्किन्सनमध्ये पुनर्मोजणीची मागणी
- मिशिगनमधील मतमोजणीत पारदर्शकता नसल्याचं सांगत ते स्थगित करण्याची मागणी
- पेन्सिल्व्हेनियात पोस्टल मतदानासाठी मुदत वाढवून देण्यात आली होती. त्या निर्णयाला आव्हान
- जॉर्जियामधील अनुपस्थित राहिलेल्या मतदानाशी संबंधित आव्हान
पेन्सिल्व्हेनियाचा अपवाद वगळता सुप्रीम कोर्टाने याबाबतचे नियम पुन्हा जाहीर करण्याचे संकेत दिले होते. पण याठिकाणचं मतदान तुलनेने कमी असून मतदानात त्यामुळे फारसा काही फरक पडणार नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे.
आकडेवाडीपुरता विषय राहिला नाही
सध्या आकेडवारीवर सगळं अवलंबून आहे, असं चित्र वरकरणी दिसत असलं तरी हे सगळं फक्त एवढ्यापुरतंच मर्यादित नाही.
ही निवडणूक इतकी अटीतटीची होईल, अशी कल्पना कोणत्याच राजकीय विश्लेषकाने केलेली नव्हती.
बीबीसी सांख्यिकी गोष्टींचे तज्ज्ञ रॉबर्ट कफ यांच्या मते, सध्यातरी याबाबत काहीही बोलणं घाईचं ठरेल. आतापर्यंत बायडन हे ट्रंप यांच्यापेक्षा 8 मतांनी पुढे असल्याचं स्पष्ट झालं आहे.
अमेरिकन व्यवस्थेवर विश्वास नसलेला एक वर्ग मतदारांमध्ये आहे. हा वर्ग मतदान करतही नाही. त्यांनी मतदान केलं असतं तर त्यांचं मतदान ट्रंप यांच्या पारड्यात जाऊ शकत होतं, असं काही तज्ज्ञांना वाटतं.
मतदारांचं प्राधान्य कोणत्या मुद्द्याला जास्त आहे, याकडे थोडंफार दुर्लक्ष झालं. कोरोनाची साथ वेगाने पसरत असताना एडिसन रिसर्चने एक सर्वेक्षण केलं होतं. त्यामध्ये अर्थव्यवस्था हा सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा असल्याचं बहुतांश मतदारांनी म्हटलं होतं. ट्रंप यांचा तो प्रमुख मुद्दा होता.
ट्रंप यांच्या मतदात्यांबाबत तज्ज्ञांनी जो अंदाज व्यक्त केला होता, त्यापेक्षा जास्त प्रमाणात त्यांचा मतदारवर्ग असल्याचं दिसून आलं आहे.
सोप्या भाषेत सांगायचं तर, डोनाल्ड ट्रंप यांची निवडणुकीतील कामगिरी अपेक्षेपेक्षा जास्त चांगली राहिली. बायडन यांनी त्यांच्या बालेकिल्यात मोठा विजय मिळवला नाही. त्यामुळेच ही लढाई अत्यंत अटीतटीची बनल्याचं दिसून आलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








