मुथय्या मुरलीधरन याच्या आयुष्यावरचा सिनेमा वादग्रस्त का झाला आहे?

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन याच्या जीवनप्रवासावरील प्रस्तावित चित्रपटाला दक्षिण भारतामध्ये प्रचंड विरोध होत आहे.

या पार्श्वभूमीवर चित्रपटातील मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून माघार घ्यावी लागली असली, तरी हा चरित्रपट ठरल्याप्रमाणे प्रदर्शित होईल, असं मुरलीधरन यांनी म्हटलं आहे. बीबीसीच्या नलिनी शिवथासन यांनी या चित्रपटासंदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर मुरलीधरन यांच्याशी संवाद साधला.

"मी अनेक वादांना तोंड दिलेलं आहे, केवळ क्रिकेटच्या संदर्भातच नव्हे, इतरही अनेक वाद येऊन गेले. मला अनेक अडथळ्यांमधून मार्ग काढावा लागला आहे. तर हे (चरित्रपटासंदर्भातील वादाचं) आव्हान अशा अनेक आव्हानांपैकी एक आहे," असं 48 वर्षीय मुरलीधरन सांगतात.

श्रीलंकेतील अल्पसंख्याक तमिळ समुदायात जन्मलेल्या मुरलीधरन यांनी अनेक अडचणींवर मात करत श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघापर्यंतचा प्रवास केला. तमिळ फुटीरतावादी व सिंहला बहुसंख्याक सैन्यदलं यांच्यातील प्रदीर्घ यादवी युद्धाच्याच कालखंडात मुरलीधरन यांचा हा प्रवास झाला.

या दरम्यान, त्यांना गोलंदाजीच्या पद्धतीसंदर्भातील वादाला तोंड द्यावं लागलं- ऑस्ट्रेलियामध्ये चेंडू 'फेकल्या'च्या कारणावरून त्यांना पंचांनी 'नो-बॉल' दिला ती घटना गाजली होती, पण अखेरीस क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक म्हणून त्यांनी स्वतःचं स्थान पक्कं केलं.

परंतु, या सर्व जीवनप्रवासावरील चरित्रपट बहुधा त्यांच्यासमोरचा सर्वांत मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे. कसोटी क्रिकेटमध्ये मुरलीधरन यांच्या नावावर विक्रमी 800 बळींची नोंद आहे, त्यावरूनच या चरित्रपटाचंही नाव '800' असं ठेवण्यात आलं.

चित्रिकरणाला अजून सुरुवात झालेली नसली, तरी दक्षिण भारतातील लोकप्रिय अभिनेते विजय सेतुपती यांना प्रमुख भूमिकेत दाखवणारं चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यावर संतापाची प्रचंड लाट उसळली.

तामिळनाडूभर '#ShameOnVijaySethupathi' असा हॅशटॅग पसरला आणि सेतुपती यांनी ही भूमिका नाकारावी अशी मागणी अनेकांनी केली.

तरुणांना प्रेरणा मिळावी या हेतूने तयार होणारा हा 'क्रीडाविषयक चरित्रपट' आहे, असं संबंधित चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हटलं आहे. पण हा मुरलीधरन यांचा कौतुकपट होईल आणि स्वतःच एक वादग्रस्त राजकीय विषय ठरलेल्या व्यक्तीच्या गौरवीकरणाचा हा प्रयत्न असावा, अशी शंका टीकाकारांनी व्यक्त केली.

श्रीलंकेतील सैन्यदलं व तमिळ बंडखोरांमधील युद्ध 2009 साली संपुष्टात आल्याचा आनंद व्यक्त करणारं विधान मुरलीधरन यांनी गेल्या वर्षीच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीवेळी केलं होतं. शिवाय, गोटबाया राजपक्षे यांच्या उमेदवारीलाही त्यांनी त्या वेळी समर्थन दिलं. या चरित्रपटाला होणारा बहुतांश विरोध त्या विधानसंदर्भात आहे.

लष्करी मोहिमेद्वारे 'तमिळ टायगर' फुटीरतावाद्यांना चिरडून टाकण्यात आलं तेव्हा श्री. राजपक्षे हे संरक्षण सचिव होते. या क्रूर कारवाईमध्ये एक लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला.

"माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदी दिवस" 2009 साली आला, कारण त्या दिवसानंतर हा देश "भयमुक्त" झाला, असं विधान मुरलीधरन यांनी केलं होतं.

या युद्धाच्या अखेरच्या टप्प्यांमध्ये सुमारे 40 हजार श्रीलंकन तमिळ नागरिक मरण पावल्याचा अंदाज आहे. भारतातील तामिळनाडू राज्यात समान भाषा व समान वांशिक अस्मितेमुळे हा एक भावनिक मुद्दा ठरतो.

"मुरलीधरन तमिळ असले, तरी ते तामिळींसारखे वागत नाहीत, आणि त्यांनी स्वतः किंवा चित्रपटाच्या रूपाने तामिळनाडूत प्रवेश करू नये, असं आम्हाला वाटतं," असं चेन्नईस्थित युवा कार्यकर्ता व्ही. प्रभा म्हणाले.

"श्रीलंकेतील यादवी युद्धावेळी मुरलीधरन यांनी बऱ्याच चुका केल्या आहे. तमिळ समुदायामध्ये ते नायक व्हावेत असं आम्हाला वाटत नाही."

पण आपलं ते विधान वारंवार संदर्भाशिवाय "मोडतोड" करून सादर केलं जातं, असं मुरलीधरन म्हणतात.

"2009 सालानंतर या देशात शांतता प्रस्थापित झाली, असा माझ्या बोलण्याचा अर्थ होता. युद्ध संपलं तो माझ्या आयुष्यातला सर्वांत आनंदी दिवस होता, कारण त्या दिवसापासून शांतता नांदायला लागली, तमिळ नागरिकांनी प्राण गमावले म्हणून काही तो माझ्या आनंदाचा दिवस नव्हता," असं त्यांनी दुबईहून बोलताना सांगितलं. दुबईत सुरू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेमध्ये 'सनरायजर्स हैदराबाद' या संघाचे ते गोलंदाजी प्रशिक्षक आहेत.

"युद्धाबाबत मी कोणतीही बाजू घेतलेली नाही- राजपक्षे यांची किंवा दुसऱ्या कोणाचीही बाजू मी घेतलेली नाही. मी मध्यभूमीवर होतो. श्रीलंकेत काय घडतंय, हे भारतातल्या लोकांना माहीत नाही."

मुरलीधरन यांचं भारताशी, विशेषतः तमिळनाडूशी घनिष्ठ नातं आहे. त्यांची पत्नी तमिळनाडूची आहे आणि 2008 ते 2010 या कालावधीमध्ये ते 'चेन्नई सुपर किंग्स' या संघाकडून खेळले होते. त्या वेळी संघाच्या सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंमध्ये त्यांची गणना झाली.

मग हा चित्रपट इतका वादग्रस्त का ठरतो आहे?

"श्रीलंकेतील नागरी युद्धामध्ये तमिळींच्याबाबतीत काय घडलं हे तमिळनाडूतील लोकांना 2010 सालीदेखील माहीत होतं, पण तेव्हा काही त्यांनी मुरलीधरन यांचं नाव त्या युद्धाशी जोडलं नव्हतं," असं श्री. प्रभा म्हणाले.

"मग आम्ही या संदर्भात प्रचारमोहीम सुरू केली आणि मुरलीधरन यांनी श्रीलंकेतील सरकारला कसं समर्थन दिलं, हे लोकांसमोर आणलं. त्यामुळे 2013 साली मुरलीधरन व इतर श्रीलंकन खेळाडूंवर बंदी घालण्यात आम्हाला यश मिळालं."

श्रीलंकन खेळाडू असतील असे आयपीएलचे सामने आपल्या राज्यात खेळण्यावर तमिळनाडू राज्य सरकारने 2013 साली बंदी घातली. श्रीलंकेतील तमिळीच्या मानवाधिकारांचा भंग झाल्याचं कारण या संदर्भात देण्यात आलं.

चेन्नईतील मुक्त पत्रकार कविता मुरलीधरन यांच्या मते, मुथय्या मुरलीधरन यांच्या चरित्रपटामध्ये प्रमुख भूमिका करणारे 42 वर्षीय अभिनेते विजय सेतुपती यांच्या संदर्भामुळे हा वाद जास्त तीव्र झाला.

"सेतुपती यांच्याकडे पुरोगामी अभिनेता म्हणून पाहिलं जातं, ते अनेक सामाजिक प्रश्नांवर मतं मांडतात, त्यामुळे त्यांनी मुथय्या मुरलीधरन यांची भूमिका स्वीकारली, याने बरेच लोक अस्वस्थ झाले," असं त्या म्हणतात.

"तमिळनाडूतील लोक चित्रपटांना अतिशय गांभीऱ्याने घेतात. इथे चित्रपट केवळ चित्रपट उरत नाही- तमिळ चित्रपटसृष्टी आणि राजकारण परस्परांशी जोडलेले आहेत."

तामिळ चित्रपटसृष्टी 'कॉलिवूड' म्हणून ओळखली जाते आणि इथल्या चित्रपटांमध्ये अनेकदा तामिळी राष्ट्रवादाचं सूत्र असतं. या राज्याचे अनेक मुख्यमंत्री राजकारणात येण्यापूर्वी चित्रपट अभिनेते अथवा अभिनेत्री होते.

सदर भूमिका सोडण्यासाठी सेतुपती यांच्यावर चित्रपट तारे-तारकांकडून आणि राजकारण्यांकडूनही दबाव आला.

पण, आश्चर्याची बाब म्हणजे स्वतः मुरलीधरन यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि सेतुपती यांना माघार घ्यायची विनंती केली.

"या चित्रपटामुळे सेतुपती यांनी विनाकारण अडचणींना सामोरं का जावं? मी त्यांच्या समोर या अडचणी वाढून ठेवण्यात काय अर्थ आहे?" असं मुरलीधरन विचारतात.

"ही माझी लढाई आहे, त्यांची नव्हे, त्यामुळे माझी लढाई मी लढेन."

श्रीलंकेत मुरलीधरन यांच्याकडे क्रीडाक्षेत्रातील आदर्श म्हणून पाहिलं जातं, तिथे या वादासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.

"त्यांच्याविषयीचा चित्रपट बघायला मला आवडेल. म्हणजे त्यांचं गौरवीकरण करणारा नव्हे, पण त्यांच्या गुंतागुंतीच्या ओळखीचे सर्व पैलू पडद्यावर आणणारा चित्रपट असेल तर पाहायला आवडेल," असं क्रिकेटच्या विषयावर लिहिणारे कोलंबो स्थित लेखक अँड्र्यू फिडेल फर्नांडो म्हणतात. मुरलीधरन यांच्या क्रिकेट कारकीर्दीविषयी त्यांनी बरंच लिहिलं आहे.

"चित्रपटाला तत्काळ असा विरोध होणं हास्यास्पद आहे- मुळात त्या चित्रपटात काय असणार आहे, याचीही आपल्याला कल्पना नाही."

श्रीलंकेतील यादवी युद्धादरम्यान बेपत्ता झालेल्या तमिळ लोकांचे कुटुंबीय या संदर्भात टीका करतात. हा चित्रपटच रद्द करायला हवा, अशीही मागणी त्यांच्यातील काहींनी केली आहे.

"2009 मध्ये युद्ध संपलं तो माझ्या आयुष्यातला सर्वांत आनंदी दिवस होता, हे मुरलीधरन यांचे शब्द जगभरातील तमिळ लोकांच्या भावना दुखावणारे आहे. या कोरोना विषाणूपेक्षाही ते गंभीर होतं," असं गोपाळकृष्णन राजकुमार यांनी 'बीबीसी तमिळ'शी बोलताना सांगितलं. युद्धात बेपत्ता झालेल्या कुटुंबीयांचे ते प्रतिनिधी आहेत.

"मुरलीधरन तमिळ असल्यामुळे लोकप्रिय झाले, पण त्यांनी इथल्या तमिळी लोकांसाठी काहीही केलेलं नाही."

सदर चित्रपटाचे निर्माते 'डार मोशन पिक्चर्स' ('द लंचबॉक्स' व 'अग्ली' अशा हिंदी चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे) व 'मूव्ही ट्रेन मोशन पिक्चर्स' यांनी 2021च्या आरंभी चित्रीकरण सुरू करायचं ठरवलं होतं. पण आता प्रमुख अभिनेताच नसल्यामुळे चित्रीकरण लगेच सुरू होण्याची चिन्हं नाहीत.

पण आपली जीवनकहाणी पडद्यावर येईल, असा विश्वास मुरलीधरन यांना वाटतो.

"चित्रपट होईलच. हा चित्रपट काही फक्त तमिळनाडूपुरता नाहीये. त्याचे निर्माते मुंबईचे आहेत, त्यांना तमिळ, सिंहला, हिंदी, बंगाली, तेलुगू, मल्याळम अशा सर्व भाषांमध्ये आणि इंग्रजी सबटायटलसह चित्रपट काढायचा आहे," असं मुरलीधरन म्हणतात.

"हा क्रीडाविषयक चित्रपट आहे, तो वादग्रस्त कसा असेल?"

परंतु, '800'च्या निमित्ताने सुरू झालेला क्षोभ बघता हा महान क्रिकेटपटू आणि त्याचं राजकारण यांना वेगवेगळं ठेवणं अवघड ठरेल, असं दिसतं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)