कोरोना : केवळ लस तयार करणं पुरेसं नाही, असं जगभरातले तज्ज्ञ का म्हणत आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पिटर रे अॅलिसन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कोव्हिड-19 वर लस शोधून काढण्याचे प्रयत्न सध्या क्लिनिकल ट्रायलच्या पातळीवर सुरू आहेत. मात्र, त्यापुढचा टप्पा म्हणजे उत्पादन आणि वितरण. या दोन्ही गोष्टींमध्ये येणाऱ्या अडचणींवरही विचार करणं गरजेचं आहे.
कुठल्याही आजारावर केवळ लस शोधून उपयोग नसतो. लस विकसित केल्यानंतर व्यापक पातळीवर लसीकरण मोहीम राबवावी लागते आणि हेच आज जगासमोरचं मोठं आव्हान आहे.
कारखान्यात लस उत्पादन करण्याची प्रक्रिया प्रयोगशाळेत लस तयार करण्याच्या प्रक्रियेपेक्षा खूप वेगळी असते.
गोवर, गालगुंड, रुबेला ते अगदी इन्फ्लूएन्झासारख्या आजारासाठीच्या अनेक लशींचे कोट्यवधी डोस दरवर्षी कारखान्यातून तयार होतात. 2009 साली आलेल्या स्वाईन फ्लूच्या साथीने जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला. या आजारावरची लस शोधून काढल्यानंतर जवळपास सहा महिन्यात या लसीचे 3 अब्ज डोस तयार करण्यात आले होते.
नवीन लस विकसित करणं एक दीर्घ प्रक्रिया असते. पश्चिम आफ्रिकेत 2014 ते 2016 या काळात इबोलाची साथ पसरली होती. यात 11 हजार जणांचा मृत्यू झाला होता. कॅनडातल्या पब्लिक हेल्थ एजंसीचे शास्त्रज्ञ 2003 पासून rVSV-ZEBOV लसीवर संशोधन करत होते.
मात्र, लशीच्या क्लिनिकल ट्रायल सुरू झाल्या ते इबोलाची साथ आल्यानंतर. या क्लिनिकल ट्रायल्स नोव्हेंबर 2016 साली पूर्ण झाल्या. मात्र, त्यानंतरही 15 हजार लोकांवर चाचण्या घेण्यात आल्या आणि अशाप्रकारे तब्बल 3 वर्षांनी लशीला मंजुरी मिळाली.
अस्तित्वात असलेल्या लसींच्या उत्पादनाला किंचितही धक्का न बसू देता राष्ट्रीय किंवा जागतिक पातळीवर पूर्णपणे नवीन लस विकसित करणं, फार अवघड काम असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

कोलंबिया विद्यापीठात सेंटर फॉर इन्फेक्शन अँड इम्युनिटीमध्ये विषाणूतज्ज्ञ असणाऱ्या अँजेला रॅसम्युसेन म्हणतात, "आम्ही अशा एका विषाणूवर लस विकसित करत आहोत ज्यावर यापूर्वी कधीही लस तयार करण्यात आलेली नव्हती, जिला कधीच मंजुरी मिळालेली नव्हती. इतकंच नाही तर त्यासाठी अशा व्यासपीठांचा वापर करतोय, जे यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरलेले नव्हते."
सामान्यपणे लस विकसित करून ती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, लसीच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत हा कालावधी 18 महिन्यांवर आणण्यासाठी जगभरातून एकत्रितपणे प्रयत्न सुरू आहेत.
या संकटकाळात औषध उत्पादक इंडस्ट्रीकडून जी समांतर विकास प्रक्रिया (parallal development process) वापरली जात आहे ती या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी आहे. लस विकसित करण्याचे अनेक टप्पे असतात. यात प्रयोगशाळेत लस तयार करणे, हा एक टप्पा असतो. त्यानंतर प्राण्यांवर लसीची चाचणी होते. पुढे क्लिनिकल ट्रायलचेही काही टप्पे असतात.
हे सर्व टप्पे यशस्वीरित्या पार केल्यानंतर ती अंतिम मंजुरीसाठी जाते आणि मग कारखान्यात मोठ्या प्रमाणावर लशीचं उत्पादन सुरू होतं.

फोटो स्रोत, Getty Images
कोव्हिड-19 लशीच्या बाबतीत मात्र, यातले अनेक टप्पे समांतर सुरू आहेत. लशीची तातडीने गरज असल्यामुळे अशा पद्धतीने समांतर टप्पे राबवले जात आहेत. मात्र, यात एक अडचण अशी आहे की एक टप्पा यशस्वी झाला की नाही, हे दुसरा टप्पा सुरू करण्याआधी कळत नाही.
उदाहरणार्थ- प्राण्यांवरच्या चाचण्यानंतर क्लिनिकल ट्रायलसाठी लशीचा नेमका किती डोस वापरावा, हे ठरवलं जातं. मात्र, कोव्हिड-19 लशीचे वेगवेगळे टप्पे एकाचवेळी सुरू असल्याने त्यांचे निष्कर्षही एकाचवेळी तपासले जात आहेत.
इंटरनॅशनल सोसायटी फॉर व्हॅक्सिनच्या प्रमुख मार्गारेट लियू म्हणतात, "आम्ही सध्या त्या लशीचे प्राण्यांवर करण्यात आलेल्या चाचणीचे निकाल तपासत आहोत ज्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल आधीच सुरू झाल्या आहेत."
याच समांतर विकास प्रक्रियेचा एक भाग म्हणून लस अजून विकसित झाली नसली तरी जगभरात उत्पादन सुविधा उभारल्या जात आहेत. यात मोठी आर्थिक जोखीम आहे. कारण या लशीला मंजुरी मिळाली नाही तर उत्पादन सुविधा उभारण्यासाठी लागणारा सगळा खर्च वाया जाणार आहे.
लशीच्या उत्पादनासाठी अमेरिकेने 'Operation Warp Speed' ही मोहीम आखली आहे. त्यासाठी तब्बल 10 अब्ज डॉलर्स एवढा खर्च येणार आहे.
कुठल्याही लशीचं जेव्हा कारखान्यात उत्पादन घेतलं जातं तेव्हा लस तयार करण्याची प्रयोगशाळेतली पद्धत वापरत नाहीत. यासाठी केकचं उदाहरण देता येईल. लहान केक बनवण्याची पद्धत वेगळी असते. मात्र, तिप्पट सामुग्री वापरून त्याच पद्धतीने मोठा केक बनवला तर तो काठावरून करपलेला आणि आतून कच्चा राहण्याची शक्यता असते.

फोटो स्रोत, Getty Images
कुठल्याही लशीचं जेव्हा मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात त्यावेळीसुद्धा अशीच अडचण येते. 'असोसिएशन ऑफ ब्रिटिश फार्मास्युटिकल इंडस्ट्री'मध्ये न्यू मेडिसिन्स अँड डेटा पॉलिसीचे संचालक ब्रायन डीन म्हणतात, "छोट्या पातळीवर एखादी गोष्ट तयार करण्याची जी पद्धत असते तीच मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यासाठी योग्य असतेच असं नाही."
आणि म्हणूनच लशीच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठीसुद्धा वेगळी प्रक्रिया राबवावी लागते. यात टप्प्याटप्प्याने लशीचं उत्पादन वाढवलं जातं. प्रत्येक टप्प्यात उत्पादित करण्यात आलेल्या लशीची गुणवत्ता तपासूनच पुढच्या टप्प्यावर त्यापेक्षा जास्त उत्पादन घेतात.
डीन म्हणतात, "कारखान्यातल्या उत्पादनावेळीसुद्धा ट्रायल अँड एररचे अनके टप्पे पार पाडावे लागतात आणि म्हणूनच योग्य परतावा मिळवून देणाऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ लागतो."
शिवाय, लस उत्पादनाचं कुठलंच तंत्रज्ञान यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरलेले नाही. यामुळेदेखील समस्येत भर पडते. लियू म्हणतात, "सर्वांनाच मोठ्या प्रमाणावर उत्पादनाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
भरीस भर म्हणजे कोव्हिड-19 पासून बचावासाठी प्रत्येकाला या लशीचे दोन डोस द्यावे लागणार आहेत. याचाच अर्थ जगभरातल्या लोकांना ही लस उपलब्ध करून देण्यासाठी जागतिक लोकसंख्येच्या दुप्पट डोस तयार करावे लागतील. म्हणजे जवळपास 16 अब्ज."
लशीचा एकच डोस घेतल्यास त्याचे दुष्परिणामही संभवतात.
लियू म्हणतात, "ज्या लोकांमध्ये अँटीबॉडी कमी असतील ते आता त्यांना आजाराचा धोका नाही, असं मानून सोशल डिस्टन्सिंगचे किंवा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे नियम न पाळण्याची शक्यता आहे. अशावेळी त्यांना नव्याने संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे ते इतरांना संसर्ग देऊ शकतात."

फोटो स्रोत, Getty Images
काही लशींच्या वापरासाठी विशेष उपकरणांची गरज असते. काही डीएनए-बेस्ड लसींवर संशोधन सुरू आहे. या लसीचा प्रत्येक डोस देण्यासाठी एका इलेक्ट्रोपोर्शन उपकरणाची गरज असते. कॅन्सरची औषधं देण्यासाठी पू्र्वी इलेक्ट्रोपोर्शन उपकरण वापरायचे.
लहान इलेक्ट्रिक टूथब्रशच्या आकाराचं हे उपकरण असतं. या उपकरणातून निर्माण होणाऱ्या अत्यल्प तीव्रतेच्या करंटमुळे पेशींच्या आवरणातली छिद्र उघडतात आणि या छिद्रातून औषध किंवा लस आत सोडली जाते.
हे उपकरण एकापेक्षा जास्त वेळेला वापरता येत असलं तरी पुरेशा प्रमाणात त्यांचंही उत्पादन करावंच लागणार. शिवाय, आरोग्य कर्मचाऱ्यांना हे उपकरण वापरण्याचं प्रशिक्षणही द्यावं लागेल.
लशीसोबत इतरही काही वस्तूंची गरज असते. उदाहरणार्थ- लस ठेवण्यासाठीच्या काचेच्या बाटल्या किंवा कुपी. या कुपी बोरोसिलिकेट या विशिष्ट काचेपासून बनवतात. बाहेरील तापमान बदलाचा या काचांवर परिणाम होत नाही आणि केमिकल रिअॅक्शनची जोखीमही कमी असते. त्यामुळे लसीची गुणवत्ता कायम राखण्यात मोठी मदत होते.
कोव्हिड-19 च्या लसींसाठीसुद्धा या छोट्या-छोट्या बाटल्यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घ्यावं लागणार आहे. यामुळेसुद्धा लसीचं सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यावर मर्यादा येऊ शकतात.
मल्टी-डोस व्हॅक्सिन व्हायल म्हणजेच लसीचे एकापेक्षा जास्त डोस साठवू शकतील अशा कुपी हा यावरचा एक उपाय ठरू शकतो. मात्र, निश्चित वेळेत यातले सगळे डोस वापरले गेले नाही तर डोस वाया जाण्याची शक्यता आहे. जेव्हा मागणी एवढी प्रचंड असते तेव्हा एकही डोस वाया घालवणं परवडणारं नाही.
त्यामुळे लस तयार करणं जेवढं महत्त्वाचं तेवढचं ती सुरक्षित ठेवणं आणि तिची गुणवत्ता कायम ठेवणं महत्त्वाचं असतं. बहुतांश लशींना अतिशय थंड तापमानात ठेवावं लागतं. कोव्हिड-19 साठी ज्या लशींवर संशोधन सुरू आहे त्यापैकी काही लशींना तर अगदी उणे 70 ते उणे 80 एवढ्या कमी तापमानाची गरज आहे.
एवढं कमी तापमान सामान्यपणे प्रयोगशाळांमध्येच शक्य असतं. अनेक मेडिकल सेंटर्समध्ये अशा सुविधा नसतात.
शीतपेट्यांची ही समस्या सोडवण्यासाठी UPS आणि DHL सारख्या वितरक कंपन्या जगभरात अशा शीतपेट्या तयार करणारे फ्रिझर फार्म उघडत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
लियू म्हणतात, "तापमानावर लक्ष ठेवण्यासाठी काही कंपन्या लसीच्या कुपींसाठीचे मॉनिटर्सही तयार करत आहेत. वाहतुकीदरम्यान लशीच्या तापमानावर काही परिणाम झाला का, हे तपासण्यासाठी हे मॉनिटर उपयोगी पडतील."
शिवाय, ज्याला 'लास्ट माईल प्रॉब्लेम' किंवा 'लास्ट माईल इश्यू' म्हणतात ती समस्याही आहे. 'लास्ट माईल प्रॉब्लेम' म्हणजे दुर्गम भागात लस पोहोचवण्यात येणाऱ्या अडचणी. मोठ्या शहरांमध्ये वाहतुकीच्या सोयी असतात. त्यामुळे तिथे लस पोहोचवणे सोपं असतं. मात्र, लहान शहरं किंवा खेड्यांमध्ये जिथे वाहतुकीच्या सोयी-सुविधा नसतात, अशा ठिकाणी सुरक्षितपणे लस पोहोचवणे जिकरीचं काम आहे. विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांमध्ये ही मोठी समस्या आहे.
2021 च्या सुरुवातीला अत्यंत गरजूंना ही लस मिळेल, अशी आशा आपण करू शकतो. सर्वांना लस मिळण्यासाठी उन्हाळ्यापर्यंत वाट बघावी लागण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊनच जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन आणि वितरणासाठीच्या ज्या पायाभूत सुविधांची गरज आहे, त्या करण्याचं काम सुरू झालेलं आहे.
हे एक प्रचंड मोठं आव्हान आहे. मात्र, कोव्हिड-19 च्या लशीसाठी सुरू असलेले अभूतपूर्व असे जागतिक सामूहिक प्रयत्न बघता, हे आव्हान आपण नक्कीच पार करू, याची खात्री पटल्याशिवाय राहत नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








