कोरोना व्हायरस: भारत किंवा अमेरिका नव्हे, 'हा' देश मृत्युदरात आहे अव्वल

कोरोना

कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या देशांच्या यादीत अमेरिका, ब्राझील, भारत आणि मेक्सिको आहे. पण कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूदर असलेला देश अमेरिका, ब्राझील किंवा भारत नाही.

भारतामध्ये रविवारी (30 ऑगस्ट) एकाच दिवसात 78 हजार कोरोनाग्रस्तांची नोंदणी झाली आहे. एकाच दिवसात नऊशेहून अधिक लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. असं असलं तरी भारत किंवा अमेरिका सर्वाधिक मृत्युदर असलेला देश नाही असं आकडेवारी सांगते.

कोव्हिड-19 मुळे जगातील सर्वाधिक मृत्यूदर असलेला देश हा दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला लागून असलेला पेरू हा देश आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार, पेरू येथे मृत्यूचे प्रमाण 88.40 टक्के आहे.

कोरोना
लाईन

लॅटिन अमेरिकन देशांममधील कोरोनाचा पहिला रुग्ण ब्राझीलमध्ये सापडला. कोरोनाचा सर्वाधिक प्रसार झालेल्या देशांच्या यादीत ब्राझील दुसऱ्या स्थानी आहे. ब्राझीलमध्ये कोरोनानं आतापर्यंत जवळपास एक लाख वीस हजार लोकांचा बळी घेतला आहे.

अमेरिकेतही कोरोनानं थैमान घातलं आहे. अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या लाखाच्या पार आहे.

एकूण मृत्यूची संख्या 28 हजारांवर

कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच कडक निर्बंध लावणाऱ्या देशांमध्ये पेरू हा लॅटिन अमेरिकन देशही होता. लॉकडॉऊनमधून बाहेर पडताना जनतेला मदतीसाठी पॅकेज जाहीर करण्यातही पेरूने पुढाकार घेतला होता.

जॉन्स हॉपकिन्सच्या माहितीनुसार, पेरूमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 28 हजार 471 लोकांचा बळी गेला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या देशांमध्ये पेरू नवव्या क्रमांकावर आहे.

कोरोना

फोटो स्रोत, JHU.EDU

पेरूसाठी गेल्या आठवड्यातील आकडेवारी थोडी दिलासादायक होती. मृत्यूंच्या संख्येत गेल्या आठवड्यात किंचित घट झाली होती.

इथे गेल्या आठवड्यात कोरोनाच्या बळींच्या संख्येत किंचित घट झाली आहे. पेरूच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, बुधवारी (25 ऑगस्ट) 123 जणांचा मृत्यू, तर गुरुवारी (26 ऑगस्ट) 153 जणांचा मृत्यू झाला.

पेरूची लोकसंख्या 3 कोटी 25 लाख (2019 ची आकडेवारी) एवढी आहे. तुलनेनं कमी लोकसंख्या असूनही पेरूमध्ये कोरोनामुळे होणारा मृत्यूदर इतका जास्त का आहे? यामागची पाच कारणे जाणून घेऊया.

1) अपुरी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

सायटानो हेरेडिया युनिव्हर्सिटी ऑफ लिमामधील प्राध्यापक आणि इन्स्टिट्युट ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनचे माजी संचालक डॉ. एदुआर्दो गोटुझो म्हणतात की, पेरूनं आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी केलेली गुंतवणूक तोकडी आहे.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

ते सांगतात, "केवळ रुग्णालयांची कमतरता हाच मुद्दा नाही, तर आयसीयूमध्ये बेड्स नाहीत, आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे आणि मॉलिक्युलर टेस्ट करण्यास सक्षम असलेली एकच प्रयोगशाळा आहे."

पेरूत गेल्या दोन दशकांत आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक काही प्रमाणात वाढलीये. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार, 2017 पर्यंत देशाच्या एकूण जीडीपीच्या 4.9 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक आरोग्यावर केली.

मायक्रोकंसल्ट कन्सल्टन्सीचे अर्थतज्ज्ञ एल्मर क्युबा सांगतात, "इथे विकास दराच्या तुलनेत प्रत्येक व्यक्तीवर होणारा आरोग्यासाठीचा खर्च कमी आहे."

साथीच्या रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णालयांमध्ये फक्त 3000 बेड्स आणि आयसीयूमध्ये 100 बेड्स होते. पेरूचे राष्ट्रपती मार्टिन विजकारा यांच्या मते, रुग्णालयांमधील बेड्स संख्या 18,000 आणि आयसीयूमध्ये जून अखेरपर्यंत 1,600 पर्यंत वाढवली.

डॉ. एदुआर्दो गोटुझो म्हणतात, हे साथीचे रोग तुमच्या तयारीपेक्षा एक पाऊल पुढे असतात.

सिटाडो हेरेडिया विद्यापीठातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. अर्नेस्तो गॉसर सांगतात, "आरोग्य व्यवस्थेतील सुधारणेमुळे मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाण जास्त असण्याचे हे एकमेव कारण असू शकत नाही."

2) कोरोनाच्या प्रतिबंधाकडे दुर्लक्ष

"कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात पेरूने चाचण्यांवर कमी भर दिला आणि रुग्णालयातील उपचारांना अधिक महत्त्व दिलं," असं डॉ. गॉसर सांगतात.

"त्यामुळे शाळा-कॉलेज बंद करणे, सीमा बंद करणे, लोकांना क्वारंटाईन करणे, रुग्णालय व्यवस्था, आरोग्य सेविका आणि अधिकारी असं सर्वकाही करुनही कोरोनावर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. यामुळे लॉकडॉऊन असूनही अपेक्षित यश मिळालेलं नाही," असं डॉ. गॉसर सांगतात.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

ते सांगतात, "सरकारने आयसीयूमध्ये बेड्सची संख्या वाढवली. पण हा या साथीच्या रोगाचा शेवटचा टप्पा असतो, ज्याकडे सरकारने अधिक लक्ष दिले. उलट इथेच मृत्यूची शक्यता सर्वाधिक असते."

"सरकारच्या या दृष्टिकोनामुळे रुग्णालयातच या आजारावर उपचार करता येऊ शकतात हे दिसून आले. पण सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना माहीत आहे की, रुग्णांना गंभीर स्थितीपर्यंत जाऊ न देण्याचे प्रयत्न व्हायला हवे होते," असं डॉ. गॉसर सांगतात.

सरकारवर टीका करताना ते म्हणतात, "सरकारने संसर्गाबद्दल अचूक माहिती न देणाऱ्या सेरोलॉजिकल चाचण्या आणि जलद चाचण्यांची संख्या वाढवली, पण संसर्गाविषयी खरी माहिती देण्यास सक्षम असलेल्या मॉलिक्युलर चाचण्यांची संख्या वाढवायला हवी होती. शुक्रवारपर्यंत पेरूमध्ये मॉलिक्युलर टेस्टच्या माध्यमातून 1,54,197 चाचण्यांची माहिती मिळाली आहे. रॅपिड टेस्टमधून यापेक्षा तीनपट अधिक 4,67,800 चाचण्या होऊ शकल्या आहेत. कोरोना साथीच्या सुरुवातीला देशात एकच प्रयोगशाळा होती जिथे मॉलिक्यूलर टेस्ट झाल्या. जूनपर्यंत ही संख्या 12 आणि ऑगस्टपर्यंत 35 इतकी वाढवण्यात आली," असं डॉ. गॉसर सांगतात.

एदुआर्दो गोटुझो म्हणतात, "कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांचा शोध घेतला जातो. त्यांना विलगीकरण विभागात ठेवले जाते. तेव्हा कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगच्या मदतीने साथीचे रोग टाळण्यास मदत होते."

डॉ. गॉसर सांगतात,"आयसीयूमध्ये बेड्सची संख्या वाढवण्यावर सरकारचा भर होता. खरं तर आयसीयूपर्यंत रुग्ण पोहचणार नाही याकडे सरकारनं लक्ष द्यायला हवं होतं."

3) ऑक्सिजनची कमतरता

पेरूमध्ये मृत्यूदर सर्वाधिक असण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे ऑक्सिजनची कमतरता.

ऑक्सिजनसाठी लोकांना मोठ्या रांगेत उभे रहावे लागले अशी दृश्य माध्यमांमध्ये दिसून आली. ऑक्सिजनची मागणी वाढल्याने सप्लायर्सनी त्याच्या किंमती वाढवल्या आणि ऑक्सिजन सेंटर्स सुरू केले.

कोरोना

फोटो स्रोत, REUTERS/SEBASTIAN CASTANEDA

जून महिन्यात सरकारने ऑक्सिजन 'जीवनावश्यक' उत्पादन असल्याचे जाहीर केले आणि वाढती मागणी लक्षात घेता देश 25 लाख डॉलर्सचा ऑक्सिजन विकत घेईल असे आश्वासन दिले.

डॉ. गॉसर म्हणतात, "ऑक्सिजनच्या अभावाचा मृत्यूवर थेट परिणाम झाला, कारण गरजूंना ते वेळेवर मिळू शकले नाही. तसेच त्यांना आयसीयूचीही गरज होती पण तिथेही बेड्स उपलब्ध नव्हते."

4) सरकारची घाई

कोरोना विषाणूचा प्रसार जगभरात होत असताना पेरू सरकारकडून तातडीने पावलं उचलण्यात आली. कडक निर्बंधही लावण्यात आले. लॉकडॉऊनमध्ये आपली नोकरी गमवावी लागली अशा लोकांच्या मदतीसाठी जीडीपीच्या 9 ते 12 टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला.

पण ही सरकारी मदत पुरेशी नव्हती. पेरूतली 71 टक्के जनता असंघटीत क्षेत्र किंवा मजुरीचे काम करते. त्यांच्यासाठी घरातून बाहेर पडणं शक्य नव्हते.

राष्ट्रपती विजकारा यांनी मे महिन्यात बाजारपेठांसारख्या गर्दीच्या ठिकाणांना 'कोरोना विषाणूचा केंद्रबिंदू' असे संबोधलं. मात्र हातावर पोट असणाऱ्यांना दुसरा पर्याय नव्हता.

सरकारने बँकांच्या माध्यमातून लोकांना पैसे देण्यास सुरुवात केली. पण पेरूमध्ये केवळ 38.1 टक्के प्रौढांची बँक खाती आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांनी बँकांमध्ये गर्दी केली.

कोरोना

फोटो स्रोत, REUTERS/SEBASTIAN CASTANEDA

डॉक्टर गोटुझो म्हणतात, "साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने पावले उचलली, पण प्रत्यक्षात यामुळेच संसर्ग पसरण्यास मदत झाली."

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे प्रादेशिक प्रमुख ह्यूगो नोपो सांगतात, "साथीच्या रोगांच्या पार्श्वभूमीवर, युरोपातील सरकारने ज्या उपाययोजना केल्या त्याचेच अनुकरण पेरू सरकारने केले. पण पेरूमधील परिस्थिती ओळखून देशासाठी वेगळ्या पर्यायांचा विचार करण्याची गरज होती.

देशात कोरोनासारखा साथीचा रोग पसरेल याची जाणीव कुणालाही नव्हती. सरकारकडून मोठ्या चुका होतील असंही लोकांना वाटले नाही. पण जर सरकारने चूक केली तर पारदर्शकतेने सुधारणाही केल्या पाहिजे."

सरकारने आपल्या काही चुका सुधारल्या, बाजारपेठा सुरक्षित करण्यासाठी आणि बाजारपेठेची व्यवस्था सुधारण्यासाठी पावले उचलली तसंच बँकिंगचा वेळ वाढवला आणि 18 वर्षांवरील लोकांना स्वयंचलित बँक खाती उघडण्याची व्यवस्था केली.

5) लॉकडॉऊनच्या नियमांचे उल्लंघन

अलीकडच्या काही दिवसांत, अनेकांनी सरकारच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर टीका केली आणि साथीच्या रोगांचा प्रसार करण्यास हे लोक जबाबदार असल्याचे सांगितले.

याचे कारण म्हणजे लिमामध्ये नुकत्याच झालेल्या एका पार्टीत धक्काबुक्कीमुळे 13 जणांचा मृत्यू झाला. पेरूमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असूनही टॉमस रेस्ट्रोबा मध्ये 130 लोक पार्टी करत होते. पोलीस पोहोचले तेव्हा खळबळ उडाली.

ह्यूगो नोपो सांगतात, "ही अशी एकमेव घटना नाही. पण यावरून असे सूचित होते की, लोकांनी नियम पायदळी तुडवले. दुर्दैवाने आम्हाला याची किंमत मोजावी लागत आहे."

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यापासून देशात अशा 321 पार्ट्या झाल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी (27 ऑगस्ट) एका वृत्तपत्राला दिली.

वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, "देशात संसर्गाची आकडेवारी वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे नागरिकांच्या चुका. यामध्ये आणखी एक बाब आहे. पीडित जनतेला दोष देणं जी आधीच अडचणीत आहे. खरं तर सामाजिक व्यवस्था दोषी आहे."

युनिव्हर्सिटीडेल पॅसिफिकियोचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक पाब्लो लाव्हाडो सांगतात, "अशा पार्ट्यांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे हे खरे आहे, पण कोरोनाच्या मृत्यूचे हे मुख्य कारण आहे असे मला वाटत नाही. याला दुजोरा देणारी अद्याप कोणतीही आकडेवारी समोर आलेली नाही."

मृत्यूदर सर्वाधिक असल्याची कबुली

पेरूमध्ये कोरोनाचा मृत्यूदर सर्वाधिक असल्याचे पेरू सरकारने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मान्य केले. त्यांनी सांगितले, "साथीच्या रोगाच्या काळात मृत्यूदराबाबत आमच्यासारखा पारदर्शी असणारा दुसरा कोणता देश असेल याबाबत आम्हाला कल्पना नाही."

कोरोना

फोटो स्रोत, EPA/ANDINA

त्यांनी म्हटलं, "कोरोना रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचे लोकांनी पालन करावे यासाठी, पोलीस रस्त्यावर, बँकांमध्ये, बाजारपेठेत, बस स्टॉपवर काम करण्यास तयार आहेत."

जनतेने सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावे यासाठी पेरू सरकार जनजागृती करणार आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)