लिसा स्थळेकर: पुण्यातल्या अनाथ आश्रमापासून ते आयसीसी हॉल ऑफ फेमपर्यंतचा प्रवास

लिसा स्थळेकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लिसा स्थळेकर

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार लिसा स्थळेकर यांना इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आलं आहे.

41 वर्षांच्या स्थळेकर हॉल ऑफ फेममध्ये स्थान पटकावणाऱ्या नवव्या महिला क्रिकेटपटू आहेत.

ऑस्ट्रेलिया संघाच्या माजी कर्णधार स्थळेकर यांनी आपल्या नेत्रदीपक कारकिर्दीत 2005 आणि 2013 सालचा वर्ल्ड कप जिंकला. तसंच टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये टॉप रँकिंग मिळवली आहे.

लाईन
लाईन

हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत त्या म्हणाल्या, "मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला सर्वोत्तम खेळाडूंच्या गटात सामिल होण्याची संधी मिळेल."

ऑल राउंडर स्थळेकर यांनी 2013 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, त्या अजूनही न्यू साउथ वेल्ससाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतात. 12 वर्ष त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं.

भारताशी नातं

लिसा स्थळेकर यांनी 2013 साली ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. अंतिम सामना मुंबईत झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव करत वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं.

या सामन्यात लिसा यांनी घेतलेल्या एका उत्कृष्ट कॅचमुळेच आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप 2013 ऑस्ट्रेलियाने जिंकला. या मॅचमध्ये त्यांनी दोन मोठ्या विकेटही घेतल्या होत्या.

या अविस्मरणीय सामन्यानंतर त्यांनी निवृत्ती घेतली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की भारतात मिळवलेला हा विजय त्यांच्यासाठी अविस्मरणीय आहे. मात्र, भारताची एवढी एकमेव आठवण नाही. उलट आज त्या आयुष्यात जे काही आहेत त्याची सुरुवात भारतापासूनच झाली होती.

आयसीसीच्या वेबसाईटनुसार 13 ऑगस्ट 1979 रोजी स्थळेकर यांचा जन्म झाला. जन्मानंतर काही दिवसातच त्यांना पुण्यातल्या एका अनाथ आश्रमात सोडून देण्यात आलं होतं. त्यावेळी 3 आठवड्यांच्या त्या इवल्याशा जीवाला स्थळेकर जोडप्याने दत्तक घेतलं.

Cricket.com.au च्या म्हणण्यानुसार पुण्यात जन्मलेल्या लिसा स्थळेकर यांच्या आई-वडिलांनी त्यांचं नाव लैला ठेवलं होतं. मात्र, त्यांची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची असल्याने त्यांनी या मुलीला पुण्यातल्या श्रीवत्स अनाथालयात सोडलं.

मात्र, पुढे या इवल्याशा जीवाच्या नशिबाचे मार्ग मिशिगनमधल्या एका जोडप्यापर्यंत गेले. हरेन. त्यांचा जन्म मुंबईतला. त्यांच्या पत्नीचं नाव होतं सोए स्थळेकर.

लैलाला दत्तक घेण्याच्या सहा वर्षांपूर्वीही त्यांनी एका मुलीला दत्तक घेतलं होतं. आणखी एका मुलीला दत्तक घेण्याची त्यांची इच्छा होती.

त्यांनी लैलाला दत्तक घेतलं. त्यावेळी त्या जेमतेम 3 आठवड्यांच्या होत्या. त्यानंतर त्या आपल्या नव्या कुटुंबासोबत अमेरिकेत गेल्या.

रक्तातच होतं क्रिकेट

लिसा स्थळेकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, "माझा जन्म भारतातल्या पुणे शहरातला. तिथून मला दत्तक घेण्यात आलं. पुढे दोन वर्ष मी अमेरिकेत होते. त्यानंतर दोन वर्ष केनियामध्ये होते. शेवटी आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झालो. माझे वडील भारतीय आहेत आणि आई इंग्लिश."

आणखी एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं, "एक भारतीय म्हणून सर्वांनाच ठाऊक आहे की त्यांना क्रिकेटचं वेड असतं. माझीही अशी पक्की खात्री आहे की माझ्या रक्तातच क्रिकेट आहे."

लिसा स्थळेकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लिसा स्थळेकर

लिसा यांचे वडील हरेन स्थळेकर यांनी सांगितलं होतं की मला क्रिकेट खेळायचं आहे, हे लिसाने वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी सांगितलं होतं. लीसाच्या लहानपणाविषयी सांगताना ते म्हणाले होते की लिसा घराच्या मागच्या वऱ्हांड्यात क्रिकेट खेळायची आणि ती खूप चांगलं खेळायची.

लिसा स्थळेकर यांनी या वर्षीच्या सुरुवातीला एसीजी पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की स्थानिक क्लबमध्ये 600 मुलांमध्ये प्रवेश घेणारी ती एकमेव मुलगी होती.

क्रिकेट करिअरचा श्रीगणेशा

स्थळेकर यांच्या क्रिकेट करिअरची सुरुवात त्याकाळातल्या इतर मुलींप्रमाणेच झाली. म्हणजे मुलांसोबत क्रिकेट खेळून. शिवाय, महिलासुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतात, हे त्यांच्या गावीही नव्हतं.

वयाच्या 13 वर्षी त्यांना गार्डन वुमेन्स क्रिकेट क्लबमध्ये दाखल झाल्या. त्यावेळी त्यांना कळलं की मुलीसुद्धा देशासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतात. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत लिसा स्थळेकर म्हणाल्या होत्या, "त्याकाळी महिला क्रिकेटचे सामने टिव्हीवर दाखवले जात नव्हते. त्याविषयी कुणी लेखही छापत नव्हतं. खेळाडूचं कुटुंब आणि तिचे मित्र-मैत्रिणी यांनाच तेवढी माहिती असायची."

लिसा स्थळेकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लिसा स्थळेकर

आयसीसीच्या वेबसाईटनुसार लीसा स्थळेकर यांनी 29 जून 2001 साली ऑस्ट्रेलिया संघाकडून इंग्लंडविरोधात एका मॅचमध्ये डेब्यू केला होता.

त्या उजव्या हाताने बॅटिंग आणि डाव्या हाताने स्पिन बॉलिंग करायच्या.

स्थळेकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याआधी 125 वनडे मॅच खेळल्या. ऑस्ट्रेलियातल्या इतर कुठल्याही महिला खेळाडूने खेळलेले हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक सामने आहेत.

याव्यतिरिक्त त्या 8 टेस्ट सामने आणि 54 T-20 सामनेही खेळल्या आहेत.

चार यशस्वी वुमेन्स वर्ल्ड कप स्पर्धांवर त्यांनी स्वतःचं नाव कोरलं आहे - दोन वनडे आणि दोन T-20. तर तीन आंतरराष्ट्रीय शतकंही त्यांच्या नावावर आहेत.

2008-09 साली ज्यावेळी आयसीसी रँकिंगला सुरुवात झाली त्यावेळी लिसा स्थळेकर यांचा त्यात जगातल्या लिडिंग ऑल राउंडर म्हणून समावेश करण्यात आला.

लिसा स्थळेकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लिसा स्थळेकर

त्या वनडे सामन्यांमध्ये 1000 रन्स आणि 100 विकेट्स घेणाऱ्या पहिल्या महिला क्रिकेट खेळाडू आहेत.

त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3,913 रन्स आणि 229 विकेट्स घेतल्या आहेत.

निवृत्तीच्या वेळी त्या महिला वनडेमध्ये दहाव्या क्रमांकाच्या सर्वाधिक रन्स बनवणाऱ्या खेळाडू होत्या. तर ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक रन्स बनवणाऱ्या तिसऱ्या खेळाडू होत्या.

वनडे सामन्यांमध्ये त्यांनी 149 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या आणि आजही टॉप टेनमध्ये आहेत.

त्या निवृत्त झाल्या त्यावेळी त्यांनी T-20 सामन्यांमध्ये घेतलेल्या 60 विकेट्स दुसऱ्या क्रमांकावर होत्या.

निवृत्तीनंतर त्यांनी क्रिकेट कमेंटेटर म्हणून नवीन इनिंग सुरू केली आहे.

लिसा स्थळेकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लिसा स्थळेकर

हॉल ऑफ फेममध्ये लिसा स्थळेकर यांच्यासोबतच दोन पुरूष खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे - जहीर अब्बास आणि जॅक कॅलिस.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी तिघांचही अभिनंदन केलं आहे. याविषयी केलेल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, "खेळ... सीमेची बंधन मोडून जगाला एकत्र आणू शकतो आणि तुम्ही सर्वांनीच यात तुमचं योगदान दिलं आहे."

या प्रसंगी ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने लिसा स्थळेकर यांच्या क्रिकेटच्या आठवणीही ताज्या केल्या.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)