बेलारूस: हजारो लोक रस्त्यावर, पुतीन हस्तक्षेप करतील का ?

फोटो स्रोत, Getty Images
बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांचा विरोध करत हजारो लोक राजधानी मिन्स्कच्या रस्त्यांवर उतरले आहेत. हे सर्व लोक वादग्रस्त निवडणुकांचं विरोध करत आहेत.
पोलिसांची हिंसा आणि निवडणुकीतील कथित फसवणूक या मुद्द्यांवरून बेलारूसची जनता संतापली आहे आणि आंदोलनादरम्यान तो संताप दिसून येतोय.
बेलारूसची राजधानी मिन्स्कच्या मध्यवर्ती भागात 'मार्च फॉर फ्रीडम' नावानं हजारो लोकांचा मोर्चा काढला जातोय.
याचदरम्यान राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी काही हजार लोकांसमोर भाषण करताना त्यांनी विरोधकांना 'उंदीर' म्हटलं. शिवाय, देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्याचंही आवाहन लुकाशेन्को यांनी केलं.
राष्ट्रपती लुकाशेन्को यांनी याच आठवड्यात दोनवेळा रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली. बेलारूसमध्ये बाहेरील सैन्यानं हस्तक्षेप केल्यास रशिया मदत करेल, असं आश्वासन रशियानं दिलंय.

फोटो स्रोत, Reuters
बेलारूसचे दीर्घ काळासाठी निवडून आलेले राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी पोलंड आणि लिथएनियामध्ये सध्या सुरू असलेल्या नाटोच्या शस्त्रसरावाबाबत काळजी व्यक्त केलीय. त्याचसोबत, पाश्चिमात्य देशांच्या लष्करी युतीवरही टीका केलीय.
नाटोनं मात्र सैन्याची जमवाजमव केल्याचे आरोप फेटाळले आहेत. जेव्हा रशियानं क्रीमियावर ताबा मिळवला होता, तेव्हा नाटोनं ब्रिटन, कॅनडा, जर्मनी आणि अमेरिकेच्या सैन्याच्या चार तुकड्या बाल्टिक देशांमध्ये पाठवल्या होत्या.
गेल्या रविवारी झालेल्या निवडणुकीत लुकाशेन्को यांनी एकतर्फी विजय मिळवल्याचा दावा केला आणि बेलारूसमध्ये तणावाला सुरुवात झाली. राष्ट्रपती लुकाशेन्को यांनी निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप केला जातोय.
केंद्रीय निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की, 1994 सालापासून सत्तेत असलेल्या लुकाशेन्को यांनी 80.1 टक्के मतं मिळवली, तर मुख्य विरोधी पक्षाचे उमेदवार स्वेतलाना तीखानोवस्काया यांनी 10.12 टक्के मतं मिळवली. मात्र, स्वेतलाना यांचा आरोप आहे की, ज्या भागात मतमोजणी पार पडली, तिथे 60-70 टक्क्यांपर्यंत मतं मिळवली गेली.
रशियाची प्रतिक्रिया काय असेल?
बीबीसीचे मॉस्कोचे प्रतिनिधी स्टीव्ह रोजेनबर्ग यांच्या माहितीनुसार, रशियाच्या माध्यमांमध्ये बेलारूस 2020 आणि युक्रेन 2014 यांची तुलना केली जातेय.
युक्रेनमध्ये पाश्चिमात्य देशांच्या समर्थनानं झालेल्या क्रांतीनंतर रशियानं आपलं सैन्यबळ क्रीमियावर ताबा मिळवण्यासाठी पाठवलं होतं. रशियाच्या लष्करानं पूर्व युक्रेनमध्येही हस्तक्षेप केला होता.

फोटो स्रोत, Reuters
आता प्रश्न असा आहे की, सहा वर्षांनंतर रशिया बेलारूसमध्ये सैन्य पाठवेल?
किमान कागदोपत्री पाहिल्यास रशियानं असं काही पाऊल उचलल्यास त्यांना नुकसान पोहोचवणारं ठरू शकतं. शिवाय, बेलारूसमधील विरोधी पक्षाचं जे आंदोलन सध्या सुरू आहे, ते रशियाच्या किंवा पाश्चिमात्य देशांच्या विरोधातील नाहीय. हे आंदोलन केवळ राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या विरोधातील आहे.
जर रशियानं बेलारूसच्या राष्ट्रपतींच्या समर्थनासाठी सैन्य पाठवलं, तर बेलारूसमधील सर्वसामान्य लोक रशियाच्या विरोधात जाऊ शकतात.
हे खरंय की, रशिया बेलारूसला आपल्या नियंत्रणात ठेवू पाहतेय. बेलारूससोबतचे सबंध अधिक दृढ व्हावेत, असाच रशियाचा नेहमी प्रयत्न राहिलाय. रशिया पुन्हा एकदा संघराष्ट्रच्या रुपात स्वत:ला पुढे आणू पाहतेय आणि या संघराष्ट्राचे केंद्र अर्थात पुतीन असतील. राजकीय प्रभावातूनही रशिया हे साध्य करू शकते.

फोटो स्रोत, Reuters
आपल्या दारात आणखी एक क्रांती होऊ नये, याची भीती रशियाला आहे. मात्र, बेलारूस पश्चिम किंवा पूर्वेकडील कुणाचीच निवड करत नाहीय.
बेलारूसचे लोक पोलीस आणि सुरक्षादलाच्या हिंसेच्या विरोधात आहेत. लोकांमध्ये संताप इतका वाढलाय की, परंपरेनं समर्थक राहिलेले संघटनेचे कामगारही त्यांची सोबत सोडू लागलेत.
मिन्स्कमध्ये सध्या काय सुरू आहे?
स्थानिक मध्यमांच्या वृत्तांनुसार, राष्ट्रपती लुकाशेन्को यांच्या समर्थनार्थ झालेल्या रॅलीमध्ये जवळपास 31 हजार लोकांनी भाग घेतला होता, तर सरकारी आकडेवारीनुसार, यात 65 हजार लोक सहभागी झाले होते.
समर्थकांना संबोधित करताना लुकाशेन्को म्हणाले, मला रॅली आवडत नाहीत आणि स्वत:ची बाजू मांडण्यासाठी रॅलीची गरज नाही. लोकांची मदत मागावी लागतेय, ही आपली चूक नाहीय.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी त्यांनी फेटाळली. जर पुन्हा निवडणुका झाल्या, देश म्हणून बेलारूस पूर्णपणे संपेल.

फोटो स्रोत, Reuters
तुम्ही इथे सर्व जमा झालात, कारण 25 वर्षांत पहिल्यांदाच तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य, देश, घर, पत्नी, मुलं यांचं रक्षण करण्याची गरज वाटत आहे, असं लुकाशेन्को म्हणाले.
आता जर विरोधी पक्षांवर नियंत्रण ठेवलं नाही, तर ते अशाप्रकारे बाहेर येतील, जशी उंदरं बाहेर येतात, अशी टीका लुकाशेन्को यांनी केली.
"ही तुमच्या शेवटाची सुरुवात आहे. तुम्ही नमतं घ्याल, जसं युक्रेन आणि इतर देशांनी केलं. त्यामुळे तुम्ही प्रार्थना करा, देवाला माहित आहे कुणापासून," असंही ते म्हणाले.
सरकारी कर्मचाऱ्यांनाही रॅलीमध्ये सहभागी होण्यास सांगितलं गेलं होतं. अन्यथा, नोकरीवरून काढण्याची धमकी देण्यात आली होती, अशाही काही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. गेल्या काही दिवसात सरकारी कारखान्यांमधील कर्मचारी काम सोडून राष्ट्रपतींविरोधातील आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत.
Tut.by या वेबसाईटच्या माहितीनुसार, राष्ट्रपती लुकाशेन्को यांच्या रॅलीदरम्यान मिन्स्कमध्ये दोन लाख 20 हजार लोक जमले होते आणि लुकाशेन्को यांच्या विरोधात आवाज उठवत होते.
हेही नक्की वाचा
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









