पाकिस्तानने संपूर्ण काश्मीरवर सांगितला दावा, जारी केला नवा नकाशा

इमरान खान

फोटो स्रोत, REUTERS

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या नव्या राजकीय नकाशाला मंजुरी दिली आहे. या नकाशात भारत प्रशासित काश्मीरच्या भूभागाला पाकिस्तानच्या हद्दीत दाखवण्यात आलं आहे.

तसंच लडाख आणि गुजरातमधल्या जुनागडचा भाग सुद्धा पाकिस्तानने त्यांच्या नकाशात दाखवला आहे.

भारतानं मात्र पाकिस्तानचं हे पाऊल हस्यास्पद असल्याचं म्हटलं आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वतः पाकिस्तानच्या सरकारी टीव्हीवर येऊन याची माहिती दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या इम्रान खान यांच्या पक्षाच्या ट्विटर हँडलवरून नव्या नकाशाचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशाच्या नव्या राजकीय नकाशाला मंजुरी मिळाल्याचं इम्रान खान यांनी म्हटलंय.

नवा राजकीय नकाशा जाहीर करताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, "पाकिस्तानच्या इतिहासातील हा ऐतिहासिक दिवस आहे. आम्ही जगासमोर पाकिस्तानचा नवा राजकीय नकाशा सादर करत आहोत. मंत्रिमंडळाने या नकाशाला मंजुरी दिली आहे"पाकिस्तानातील शाळा आणि महाविद्यालयांमध्येही या नकाशाचा वापर केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

गेल्यावर्षी 5 ऑगस्टला भारतानं जारी केलेल्या नकाशाला हे उत्तर आहे, असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटलंय.

भारताची प्रतिक्रिया

भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं एक पत्रक प्रसिद्ध करून पाकिस्तानचं हे पाऊल हस्यास्पद असल्याचं म्हटलंय.

'पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सादर केलेला पाकिस्तानचा कथित राजकीय नकाशा आम्ही पाहिला आहे. भारतीय राज्य असलेल्या गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू, काश्मीर आणि लडाखवर दावा सांगण्याचा हा प्रकार विवेकशून्य आहे. या हास्यास्पद दाव्यांना कायदेशीर मान्यता आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्वासार्हता नाही. या प्रयत्नांमुळे हे दिसून येतं की सीमा वाढवण्याच्या विचारांनी पाकिस्तानला पछाडलं आहे आणि त्यासाठी ते दहशतवादाला पाठिंबा देत असतात,' असं भारतानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

सर क्रीक आणि सियाचिनवरही दावा

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी म्हणाले की, "पाकिस्तानने याआधीही (1949 आणि 1976) प्रशासकीय नकाशे प्रसिद्ध केले आहेत. मात्र, आता पहिल्यांदाच राजकीय नकाशा प्रसिद्ध केला आहे, ज्या नकाशाबाबत पाकिस्तानात बंद खोलीत चर्चा होत असे. या नकाशाच्या माध्यमातून पाकिस्तान नेमका कुठे आहे, हे जगाला कळेल."

या नव्या नकाशातून पाकिस्तानं सर क्रीक आणि सियाचिनवर दावा केला आहे. या दोन्ही ठिकाणांवर आजवर भारत दावा कर आला आहे. भारताचा दावा पाकिस्ताननं नव्या नकाशातून फेटाळला आहे.

"गेल्या वर्षी भारताने नकाशा जारी करत, पाकिस्तान प्रशासित काश्मीर, गीलगीट-बाल्टिस्तान भारतात दाखवलं होतं. भारताचं हे पाऊल संयुक्त राष्ट्राच्या कराराच्या विरोधात होतं. हा सर्व भाग वादग्रस्त आहे, ज्यावर अजून तोडगा शोधला जात आहे," असं कुरेश यांचं म्हणणं आहे.

"काश्मिरी आणि पाकिस्तानी जनता तसंच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार यावर तोडगा निघेल. भारतानेही याबाबत वचन दिलंय. संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीतील जनमत जो निर्णय देईल, ते काश्मीरचं भविष्य असेल," असंही कुरेशी म्हणाले.

पाकिस्तान काश्मीरच्या लोकांसोबत असल्याचं पाकिस्तानचा नवा नकाशा संदेश देतो, असं कुरेश यांचं म्हणणं आहे.

नकाशा बदलून पाकिस्तानला काहीच फायदा नाही - डॉ. रिझवी

पाकिस्तानातील राजकीय विश्लेषक डॉ. हसन अस्कारी रिझवी यांच्या मते, "नव्या राजकीय नकाशामुळे पाकिस्तानात प्रसिद्धी मिळेल, पण यामुळे काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मजबूतही होणार नाही आणि कमकुवतही होणार नाही."

"जगाला पाकिस्तानच्या बाजूनं वळवण्यासाठी नकाशाचा काहीच उपयोग होणार नाही. काश्मीरच्या मुद्द्यावर किती देश जाहीररित्या पाकिस्तानच्या बाजूने राहण्यासाठी आणि भारताच्या विरोधात जाण्यासाठी तयार आहेत, हे महत्त्वाचं आहे," असं डॉ. रिझवी म्हणतात.

"पाकिस्तानचं आंतरराष्ट्री स्तरावर किती वजन आहे, पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमका कुठे उभा आहे, या गोष्टीने फरक पडेल. नकाशाने काहीही बदलणार नाही," असंही डॉ. रिझवी म्हणतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)