कोरोना लसः व्हायरस रोखणाऱ्या लशीचे दुष्परिणाम असू शकतात का?

फोटो स्रोत, REUTERS/Dado Ruvic
कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात आतापर्यंत 20 संभाव्य लशी विकसित करण्यात आल्या आहेत. या लशींच्या प्राथमिक चाचण्यांमध्ये चांगले परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे लस बनवण्याच्या प्रक्रियेतील पुढचा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या टप्प्यात शास्त्रज्ञ लशीची मानवी वैद्यकीय चाचणी (क्लिनिकल ट्रायल) करत आहेत.
वेगवेगळ्या औषध कंपन्या आणि संशोधन संस्थांकडून 140 इतर लशींवरसुद्धा काम सुरू आहे. यांच्या मदतीने कोरोना व्हायरसला रोखता येईल, अशी अपेक्षा आहे.
गेल्या दोन आठवड्यांमध्ये लशीच्या संशोधनाने चांगलीच प्रगती केली आहे. सुरुवातीला अमेरिका, नंतर ब्रिटन आणि आता चीन, रशिया तसंच भारतातून लशीबाबत चांगल्या बातम्या येऊ लागल्यात. या सर्व ठिकाणी लस तयार केली जात आहे. इथं बनवण्यात येत असलेल्या कोरोना लशींना सुरुवातीच्या टप्प्यात चांगलं यश मिळालं.

बीबीसीच्या अनेक वाचकांनी लशीबाबतच्या प्रश्न आम्हाला पाठवले होते. बीबीसीचे आरोग्यविषयक संपादक मिशेल रॉबर्ट्स यांनी वाचकांच्या प्रश्नांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे. पाहूया.. वाचकांनी कोणकोणते प्रश्न विचारले?
प्रश्न: कोरोना लस 100 टक्के सुरक्षित असेल का? याचे काही दुष्परिणाम असू शकतात का?
उत्तर: कोणतीही लस बनवल्यानंतर तिला कठोर सुरक्षितता चाचण्यांमधून जावं लागतं. यासाठी अनेक चाचण्या करण्यात येतात. पण कोव्हिड-19 ची लस बनवण्यासाठीचं संशोधन अत्यंत वेगाने करण्यात आलं आहे.
लसीचा शोध घेण्याचं काम तुलनेने अतिशय वेगाने सुरू आहे. तरीसुद्धा मानवी चाचणीदरम्यान सर्व प्रकारची निरीक्षणं करण्यात येत आहेत. कोणत्याही लशीला मंजुरी देण्याआधी ही निरीक्षणं होणं गरजेची असतात.

- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

वैद्यकशास्त्रानुसार, कोणत्याही उपचाराचे काही दुष्परिणाम असू शकतात. हा नियम लशींना सुद्धा लागू होतो. शरीरावर लस टोचलेल्या ठिकाणी सूज येणं, त्वचा लालसर होणं, डाग पडणं अशा प्रकारचे परिणाम दिसू शकतात. पण ही बाब सामान्य मानली जाते.
प्रश्न: फ्लूवरच्या जुन्या लशीलाच कोव्हिड-19 च्या अनुषंगाने विकसित करण्यात आलं का?
उत्तर: सर्वसाधारण फ्लूपासून बचाव करण्यासाठी बनवण्यात आलेली लस कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून वाचवू शकत नाही. फ्लू (इंफ्लूएंझा) आणि कोरोना व्हायरसचा संसर्ग हे दोन्ही वेगवेगळे आजार आहेत. हे दोन्ही आजार वेगवेगळ्या विषाणूंमुळे होतात.

फोटो स्रोत, Sao Paulo State Government/AFP via Getty Images
पण फ्लूवरची लस तुमच्या आरोग्याचं संरक्षण करण्याचंच काम करते. त्यामुळे सध्याच्या कोरोना साथीच्या काळात इतर मार्ग नसल्यामुळे फ्लूची लस घेणं एक चांगला पर्याय असू शकतो.
फ्लूमुळे काही लोक गंभीररित्या आजारी पडतात. अशा स्थितीत त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यास त्यांना जास्त धोका आहे. विशेषतः इतर आजारांनी ग्रासलेल्या किंवा 65 वर्षांवरील वयाच्या व्यक्तींना कोरोनामुळे जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून फ्लूची लस घेता येऊ शकते.
प्रश्न: अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेले लोकसुद्धा लस घेऊ शकतात का?
उत्तर: शास्त्रज्ञ सध्या अनेक संभाव्य लशींवर काम करत आहेत. या लशींची चाचणी वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येत आहे. पण यापैकी कोणती लस सर्वात प्रभावी ठरली, हे अद्याप निश्चित सांगता येत नाहीय.

फोटो स्रोत, Getty Images
या सर्व प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठीच चाचण्या करण्यात येत आहेत. या लशीचा कुणाला किती लाभ होऊ शकतो, याचं निरीक्षण करणं सुरू आहे.
अवयव प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांचा विचार केल्यास हा थोडा वेगळा विषय आहे. अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नव्हे तर कमी करण्यासाठीची काही औषधं घेत असतात. तुमच्या शरीराने ते प्रत्यारोपण स्वीकारावं यासाठी ही औषधं दिली जातात. जैविक लशींमध्ये विषाणू किंवा बॅक्टेरियांचं कमजोर स्वरुप असतं, त्यामुळे त्यांच्यासाठी ही लस घेणं धोक्याचं ठरू शकतं.
प्रश्न: व्हायरसने स्वतःचं स्वरूप बदलल्यास लस प्रभावी ठरू शकते का?
उत्तर: सध्या जगभरात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसच्या नमुन्यांवर आधारित लस विकसित होत आहे. व्हायरस स्वतःचं स्वरूप बदलू शकतो, हे खरं आहे. पण यामुळे लशीचा व्हायरसवरील प्रभाव कमी होईल, असा याचा अर्थ नाही.

फोटो स्रोत, Getty Images
व्हायरसमध्ये झालेला बदल किती मोठा आणि महत्त्वपूर्ण आहे, त्यावर हे सगळं अवलंबून आहे.
व्हायरसने आपला कोणता भाग बदलला, सर्वप्रथम कोणत्या भागावर लशीचा प्रभाव पडणार आहे, या बाबी यावेळी महत्त्वाच्या ठरतील.
सध्या प्रायोगिक तत्वावर चाचणी करण्यात येत असलेल्या लशी व्हायरसच्या RNA कोडनुसार बनवल्या जात आहेत.
सध्यातरी संशोधकांनी व्हायरसच्या बाह्य आवरणावर असलेल्या 'प्रोटीन स्पाईक' या काटेरी भागाला लक्ष्य बनवून लस बनवली आहे. या काटेरी भागाचाच वापर करून व्हायरस मानवी शरीरातील पेशींवर हल्ला करतो.
अद्याप तरी व्हायरसच्या या भागात मोठा बदल झाल्याचं संशोधकांना निदर्शनास आलं नाही. त्यामुळे लस निरूपयोगी ठरेल, अशी शक्यता सध्यातरी नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








