कोरोना लॉकडाऊनः प्रवास न करताही सुटीचा आनंद कसा घ्यायचा?

कोरोना व्हायरसने जगाला ग्रासण्यापूर्वीच 'स्टेकॅशन' म्हणजेच पर्यटनासाठी परदेशात न जाता आपल्याच घराजवळच्या ठिकाणांना, शहरांना भेट देण्याचा ट्रेंड जगभरात लोकप्रिय झाला होता.

'2008 मध्ये उद्भवलेल्या जागतिक अर्थसंकटात अनेक फिरस्त्यांनी भटकंतीवरचा खर्च कमी केला. घराजवळच्या एखाद्या ठिकाणी जाऊन त्यांनी कमी खर्चात फिरायला सुरुवात केली,' असं मिंटेल या कन्झ्युमर रिसर्च एजन्सीचे ज्येष्ठ ट्रॅव्हल अॅनालिस्ट मार्लोस डे व्हाईस यांनी सांगितलं.

पैसा आणि राहणीमान यांचा विचार करून मिलेनिअल्स यापुढेही हाच ट्रेंड कायम ठेवतील असं त्यांना वाटतं.

कोव्हिड-19 मुळे आरोग्य आणि सोशल डिस्टन्सिंग यांच्या अनुषंगाने पर्यटनाचे नियमही बदलले आहेत. एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यावर असलेले निर्बंध, आर्थिक संकटाचे ढग यामुळे 'स्टेकॅशन्स' अर्थात आपल्याच देशात, राज्यात, आपल्या जवळच्या परिसरात फिरण्याचा ट्रेंड आधीपेक्षा जास्त लोकप्रिय होऊ शकतो.

घरच्या घरी किंवा जवळच्या भागात जाऊन तुम्ही तुमच्या सुट्यांचा कशा चांगल्या पद्धतीने आनंद घेऊ शकता यासाठी काही टिप्स-

'टू डू' लिस्ट विसरून जा

खऱ्या अर्थाने थकवा दूर करायचा असेल तर मनाची कवाडं सताड उघडा आणि मगच बाहेर पडा, असं वर्क लाईफ बॅलन्स एक्झिक्युटिव्ह कोच आणि मार्केट रिसर्च कंपनीसाठी काम करणाऱ्या क्लॉडिआ उन्गर यांनी सांगितलं.

जेव्हा तुम्ही तुमच्या स्वत:च्याच प्रश्नांमध्ये, समस्यांमध्ये मश्गुल असता, तेव्हा तुम्हाला आजूबाजूला काय चाललंय हे दिसतच नाही, असं क्लॉडिआ सांगतात. समजा तुम्ही सुटीसाठी बाहेर गावी गेलात, तर तिथे तुम्ही घरकाम, गाडीच्या विम्याचं नूतनीकरण असल्या गोष्टी करणार नाही. मग स्टेकेशनवर असतानाही तुम्ही या गोष्टी करू नका.

बॅरक्लेज या संस्थेने गेल्या वर्षी केलेल्या सर्वेक्षणानुसार, युकेमधल्या 25 ते 34 वयोगटातल्या दहापैकी नऊजणांना सुट्टीच्या वेळी दैनंदिन कामापासून सुटका हवी आहे. 70 टक्के जणांना डिजिटल डिटॉक्स अर्थात स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब या विश्वापासून मुक्तता हवी आहे.

वेळेची गरज काय ते ओळखा

व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर लेखन करणाऱ्या अमेरिकेतील योगा शिक्षिका लेना स्मिडिट यांच्या मते, जसं तुम्ही कामानिमित्ताने बाहेरगावी जाताय हे घरच्यांना, मित्रमैत्रिणींना सांगता तसंच सुट्टीवर जातानाही सांगून जा. तुमचा फोन बंद करून टाका. ते शक्य नसेल तर किमान नोटिफिकेशन्स म्यूट करा.

तुम्ही ऑफिसमध्ये नाही, हे सांगणारा ऑटो इमेल रिप्लाय सेट करा. तुम्ही थोड्या वेळाने इनबॉक्स चेक करताय असं होत नाहीये ना याकडे लक्ष द्या.

सुट्टीवर असताना देखील तुम्ही तंत्रज्ञानाचा आनंद लुटू शकता. अर्थात, तो वापर तुमच्या आनंदासाठी असायला हवा. मग ते गाणी ऐकणं असू शकतं, पॉडकास्ट ऐकू शकता, तुमचा आवडता कार्यक्रम पाहू शकता. तुम्ही सुट्टी का घेतली आहे याचा विचार करा. कामाचा फोन आला तर हो म्हणण्यापूर्वी तुमची सुट्टी मनासारखी झालीये ना याचा विचार करा.

जुन्या गोष्टी नव्या दृष्टीने पाहा

तुम्ही शहरात असाल किंवा ग्रामीण भागात. तुम्ही सवयींचे गुलाम असल्याप्रमाणे वागाल याची खात्री बाळगा. स्टेकॅशन्सच्या माध्यमातून तुम्हाला नव्या पद्धतीने गोष्टींकडे बघायचं आहे.

नेहमी आपण जे करतो, जे वागतो त्यात थोडा बदल करून पाहा, असं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. एखाद्या रेस्तराँमध्ये तुम्ही नेहमी जात असाल तर नेहमी ज्या ठिकाणी बसता ती जागा बदलून पाहा. एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायला आवडत असेल तर तिथे जाण्याची वेळ बदला.

आयुष्य ऑटो मोडमध्ये असल्याप्रमाणे जगत असाल तर ते बदला. नवीन जे काही बघत आहात त्यात तुमचं मन गुंतवा, जुने विचार सोडून द्या, असं उन्गर सांगतात. वर्तमानात जगा. कारण असं जगणं महत्त्वाचं.

स्वत:ला वेळ द्या

स्वत:ला वेळ देणं हा ताणतणावांना दूर करण्याचा हुकूमी मार्ग आहे, असं लेना सांगतात. स्वत:ची काळजी घेणं हा दडपणाला झुगारून देण्याचा सर्वोत्तम मंत्र असल्याचं त्यांना वाटतं.

आलिशान ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्पा मध्ये तुम्ही तुमचा अख्खा दिवस व्यतीत करू शकता. घरच्या घरी निवांत आंघोळींचा आनंद घेऊ शकता.परंतु स्वत:भोवती अडकून राहणं हाच केवळ उतारा नाही. आजूबाजूचा निसर्ग तुमचं मन खुलवू शकतो.

स्टेकेशनचं बजेट

विमानाची तिकीटं नाही, महागड्या हॉटेलांचा खर्च नाही, वाहनांच्या पेट्रोल डिझेलचा खर्च नाही म्हटल्यावर तुमचे पैसे वाचणार आहेत हे नक्की. तर हेच शिलकीतले पैसे स्टेकेशनसाठी उपयोगात आणले जाऊ शकतात.

'गुड विथ मनी' वेबसाईटच्या लोरी कॅम्पबेल म्हणतात, सुट्टीवर जाताना तुम्ही जसा विचार करता तसा स्टेकेशनवेळी करा. स्वयंपाक करणं हा तुमच्या दैनंदिन रुटीनचा भाग असेल तर मग सुट्टीच्या काळात स्वयंपाकाला बाजूला सारा.

पण तुम्ही एरव्ही स्वयंपाक करत नसाल आणि स्वयंपाक करायला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ घेऊन फर्मास बेत करू शकता. यामुळे तुमचं मन हलकं होऊ शकतं.

नवीन किंवा वेगळ्या प्रकारचे कपडे ट्राय करणं हाही एक उत्तम पर्याय असल्याचं कॅम्पबेल सांगतात. नव्या ठिकाणी जाताना तुम्ही नवीन कपडे खरेदी करता तसं घराजवळच कुठे जातानाही तुम्ही नवे कपडे नक्कीच खरेदी करू शकता. चांगलं दिसण्यापासून तुम्हाला कोणीही अडवलेलं नाही.

हॉटेल बुक करा किंवा इन्डोअर कॅम्पमध्ये जा

तुमच्याकडे बऱ्यापैकी पैसे असतील तर तुम्हाला मनापासून जायचं आहे, अशा दोन हॉटेलांची निवड करा. ब्रेकफास्टसाठी एक निवडा, दुसरं जेवण्यासाठी निवडा. हॉटेलच्या आसपास बघण्यासारखं काय आहे ते टिपून घ्या. तुमच्याच जवळच्या ठिकाणाचा आनंद लुटा असं लेना म्हणतात.

तुमचं बजेट फार नसेल तर तुम्ही घराजवळच कॅम्प अर्थात तंबू ठोकून राहू शकता. लहान मुलांना निसर्गाच्या सोबतीने राहायला आवडतं. घरातलं सामान तिकडे घेऊन जायचं, आणायचं हे लहान मुलांना आवडतं. जर तुमच्या काळी चादर असेल तर तुम्ही सावल्यांचे खेळ खेळू शकता, भूताखेतांच्या गोष्टी सांगू शकता.

काहीच करू नका

काहीही झालं तरी हा वेळ तुमचा आहे हे विसरू नका. त्यामुळे या वेळेत काही करायलाच हवं असं नाही. काहीही न करणं हाही एकप्रकारचा विरंगुळा आहे.अनेक गोष्टींनी तुम्हाला वेढू देऊ नका. घरीच आहात आणि काहीही करत नाही असं होऊ द्या. आपल्याला काय आवडतंय हे समजून घ्या.

लोकांना जे करायला आवडतं ते तुम्हालाही करायला आवडेल असा नियम नाही. तुम्हाला तुमचा वेळ कसा व्यतीत करायला आवडतो हे तुमच्यावर आहे. हे तुम्ही यंदा करणार असाल याचा अर्थ तुमची वेल प्लॅन्ड सुट्टी फुकट गेली असं नाही. त्या सुट्टीपेक्षा हे क्षण तुम्हाला जास्त आनंद देऊ शकतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)