कोरोनावर लस शोधून काढण्याचं यश 'ही' महिला संशोधक मिळवणार?

कोरोना, लस
फोटो कॅप्शन, सारा गिल्बर्ट
    • Author, टीम बीबीसी
    • Role, नवी दिल्ली

सारा गिल्बर्ट यांच्या नेतृत्त्वाखालची ऑक्सफर्ड विद्यापीठाची एक टीम कोरोना व्हायरसवरची एक लस तयार करण्याचं काम करतेय. कोरोनावरची लस तयार करण्याचं काम सध्या अनेक कंपन्या करत आहेत. अनेक देशांमध्ये सध्या याविषयीचे प्रयोग सुरू आहेत पण सगळ्यात जास्त चर्चा आहे ती ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीची.

ऑक्सफर्डच्या लशीची पहिली ह्युमन ट्रायल यशस्वी झाल्याचा दावा करण्यात येतोय. जर पुढच्या गोष्टी सुरळीत पार पडल्या तर कोरोना व्हायरसवर प्रभावी असणारी लस लवकरच तयार होईल अशी शक्ता आहे.

अॅस्ट्रा झेनका नावाच्या एका औषध उत्पादक कंपनीसोबत ऑक्सफर्ड विद्यापीठ ही लस तयार करण्याचं काम करतंय.

कोण आहेत सारा गिल्बर्ट?

कोरोना व्हायरससाठीची लस तयार करण्याच्या शर्यतीत सगळ्यात आघाडीवर असल्याचं मानण्यात येणाऱ्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या टीमचं नेतृत्त्वं सारा गिल्बर्ट करतायत.

कोरोना
लाईन

आपल्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करायचं आहे हे प्रोफेसर सारा गिल्बर्ट यांना सुरुवातीपासूनच माहिती होतं. पण नेमकी सुरुवात कुठून करायची याचा अंदाज 17व्या वर्षी त्यांना अजिबात नव्हता.

कोरोना, लस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोनावरची लस कधी येणार?

युनिव्हर्सिटी ऑफ अँजेलियामधून जीवशास्त्रात पदवी घेतल्यानंतर सारांनी बायो-केमिस्ट्रीमध्ये पीएचडी केली. ब्रुईंग रिसर्च फाऊंडेशनपासून त्यांनी करियरला सुरुवात केली. यानंतर त्यांनी इतर काही कंपन्यांमध्येही काम केलं आणि औषध निर्मितीबाबतचं ज्ञान मिळवलं.

यानंतर त्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रोफेसर एड्रियल हिल्स लॅबमध्ये आल्या. जेनेटिक्सवरच्या कामांपासून त्यांनी सुरुवात केली. यासोबतच मलेरियावरही त्यांनी भरपूर काम केलं. यानंतर त्या लस तयार करण्याचा कामात सहभागी झाल्या.

ट्रायलमध्ये मुलांची मदत

सारा यांना तीन मुलं (ट्रिपलेट्स - तिळी) आहेत. मुलांच्या जन्मानंतर वर्षभरातच त्या विद्यापीठात लेक्चरर झाल्या आणि त्यानंतर 2004 साली युनिव्हर्सिटीत रिडर झाल्या.

2007मध्ये फ्लूवरची एक लस बनवण्याचं काम त्यांना वेलकम ट्रस्टकडून मिळालं. इथपासूनच रिसर्च ग्रुपचं नेतृत्व करण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला.

सारा यांची तिन्ही मुलं आता 21 वर्षांची आहेत आणि तिघेही बायोकेमिस्ट्रीचा अभ्यास करत आहेत.

कोरोना, लस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना लसीचं काम जगभर सुरू आहे.

कोरोना व्हायरससाठी तयार करण्यात आलेल्या एका प्रायोगिक व्हॅक्सिनच्या ट्रायलमध्ये सारा यांची मुलं सहभागी झाली होती. ब्लूमबर्गने दिलेल्या बातमीनुसार हे ट्रायल व्हॅक्सिन त्यांची आई सारानेच तयार केलं होतं.

खडतर प्रवास

सारा सांगतात, "काम आणि खासगी आयुष्यातला समतोल सांभाळणं अतिशय कठीण असतं. जर तुम्हाला मदत करणारं कोणी नसेल तर हे अशक्य वाटू लागतं. माझ्या पूर्ण पगारापेक्षा मुलांच्या पाळणाघराचा खर्च जास्त होता. मग माझ्या जोडीदाराने त्याचं करियर सोडून मुलांना सांभाळलं."

"1998मध्ये माझ्या मुलांचा जन्म झाला. त्यावेळी मला फक्त 18 आठवड्यांची मॅटर्निटी लीव्ह (गरोदर असतानाची सुटी) मिळाली होती. तो काळ अतिशय कठीण होता...मला माझ्या प्रिमॅच्युअर (वेळेपूर्वी जन्मलेली) बाळांचं संगोपन करायचं होतं. आता जरी मी एका लॅबची प्रमुख असले तरी मी नाण्याची दुसरी बाजूही पाहिलेली आहे."

संशोधक असण्यातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथे कामाचे तास ठरलेले नसतात, यामुळे एका आईला काम करणं सोपं जातं, असं त्या सांगतात.

कोरोना, लस

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, कोरोना लस तयार करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत.

पण अनेकदा अशी परिस्थिती येते की सगळं एकमेकांत गुंततं आणि काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, असंही त्या सांगतात.

ज्या महिलांना विज्ञानक्षेत्रात आपलं भविष्य घडवायचंय आणि हे करताना कुटुंबही हवं आहे, त्यांना सारा सांगतात, "हे आव्हान अतिशय कठीण असल्याची बाब सगळ्यात आधी जाणून घ्यायला हवी. सगळ्यात आधी तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठीचा प्लॅन असायला हवा. सोबतच तुमच्यासोबत असं कोणीतरी असायला हवं जे तुम्ही कामावर असताना घराची काळजी घेईल."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)