कोरोना काळात पोटदुखी आणि जुलाबाची लक्षणं दिसत असतील तर...

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"मला डायरिया झाला होता. (डायरियामध्ये जुलाब, उलट्या आणि शरीरातलं पाणी कमी होतं) त्यामुळे सुरुवातीला मी नेहमीच्या जुलाबाच्या गोळ्या घेतल्या. काही दिवस अंग दुखत होतं. या सगळ्यात साधारण एक आठवडा गेला. मग एके दिवशी माझ्या पत्नीला ताप आला. दोघेही आजारी असल्याने आम्ही कोरोनाची टेस्ट केली आणि आम्ही पॉझिटीव्ह आलो."

हा अनुभव आहे नुकतेच कोरोनामुक्त झालेले पत्रकार बशीर जमादार यांचा. बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितले, "डायरिया असल्याने कोरोना असेल असं वाटलंच नाही. ताप, सर्दी, घसा दुखणं, वास न येणं अशी कोरोनाची कोणतीच लक्षणं दिसली नव्हती. त्यामुळे डायरियाची औषधं घेतली. यात एका आठवड्याचा वेळ गेला."

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाला प्रामुख्याने जी सर्वसाधारण लक्षणं दिसून येत आहेत ती लक्षणं काही रुग्णांमध्ये दिसत नाहीत. पोटदुखी आणि डायरिया असलेल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याच्या काही केसेस राज्यात दिसून येत आहेत.

'डायरियाकडे दुर्लक्ष करू नका'

अशा रुग्णांमध्ये ताप, सर्दी, घसा दुखणं, खोकला, वास न येणं कोरोना व्हायरसची ही मुख्य लक्षणं दिसत नसल्याने रुग्णांमध्येही संभ्रम आहे.

"आमच्या एका ड्रायव्हरलाही नायर रुग्णालयात डायरियावर उपचारासाठी दाखल केले होते. काही दिवसांनंतर त्याची कोरोना टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह आली. 5-7 दिवस त्याच्यावर उपचार केल्यानंतर आता त्याला आम्ही घरी सोडले आहे." अशी माहिती मुंबईतल्या सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

तर सरकारी रुग्णालयांमध्ये चालवण्यात येणाऱ्या ओपीडीमध्येही डायरिया झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास येत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयाचे डॉ. प्रशांत साळवे (MD Medicine) यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "ओपीडीमध्ये साधारण ५ टक्के डायरिया झालेले रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. डायरियासोबत त्यांना घसा दुखणं, अंगदुखी अशीही लक्षणं दिसून येतात."

कोरोना

फोटो स्रोत, VIJAYANAND GUPTA/HINDUSTAN TIMES VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, मुंबई

अनेक केसेसमध्ये रुग्ण या प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाची टेस्ट करुन त्यावर उपचार सुरू करायलाही उशीर होतोय. ज्येष्ठ नागरिक तसंच आधीपासूनच मोठा आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक सतर्क राहण्याचा सल्ला डॉक्टर देतायत.

"काही रुग्णांमध्ये सुरुवातीला घसा दुखतो. घसा दुखण्याचे थांबते आणि काही दिवसांनी डायरिया होतो. याचा अर्थ कोरोनाचा व्हायरस तोपर्यंत आतड्यांपर्यंत पसरतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शरीरात होणारे बदल, आजार याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी." असंही डॉ. साळवे सांगतात.

'दुखणं थांबत नसेल तर कोरोनाची टेस्ट करा.'

कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनीही बीबीसीच्या मुलाखतीत दुखणं अंगावर काढू नका असा सल्ला यापूर्वी दिला होता. आताही कोव्हिड-19 वॉर्डमध्ये वैद्यकीय सेवा देत असलेले डॉक्टर वेळेत टेस्ट करा असंच सांगत आहेत.

"पोटदुखी, जुलाब ही कोरोनाची प्रमुख लक्षणं नसली तरी सतर्क रहायला हवं. त्या आजाराची औषधं घेऊनही दोन ते तीन दिवसांत त्रास होणं थांबत नसेल तर कोरोनाची टेस्ट करुन घ्या." असंही सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

कोरोना
लाईन

पोटदुखी आणि डायरिया झाल्यानंतर कोरोनाची लागण होणे असे रुग्ण महाराष्ट्रात मोठ्या संख्येने नाहीत. पण काही प्रमाणात ही लक्षणं असलेले रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाचे कोव्हिड सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "अपवादात्मक परिस्थितीमध्ये डायरिया आणि पोटदुखी ही कोरोनाची लक्षणं दिसून येत आहेत. पोट दुखणं आणि डायरियासोबत ताप आला असेल तर कोणताही संभ्रम न बाळगता कोरोनाची टेस्ट करायला हवी."

मुंबई आणि पुण्यात आता कोरोनाची टेस्ट करण्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नसल्याने या दोन शहरांमध्ये कोरोनाची टेस्ट करणं आता सहज शक्य झालंय. पण उर्वरित भागातही सामान्य लोकांनी कोणताही आजार दिसून येत असला तरी सतर्क राहाण्याचा सल्ला डॉक्टर देच आहेत.

कोरोना व्हायरस इतर अवयांमध्ये कसा पसरतो ?

कोरोना व्हायरसची प्रमुख लक्षणं पाहता हा व्हायरस शरिराच्या वरच्या भागात म्हणजे श्वसनमार्गात लवकर पसरतो. श्वसन संस्थेपासून नाक, घसा ते फुप्फुसापर्यंत सर्व कोरोनाचे रिसेप्टर आहेत.

"छातीत तयार झालेला कफ हा आतड्यांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे शरीरात इतर अवयांपर्यंत व्हायरस पोहचू शकतो." अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे कोव्हिड सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना कसा पसरतो?

प्राथमिकदृष्ट्या कोरोना व्हायरस श्वसनसंस्थेवर आघात करताना दिसतो. पण कोरोना व्हायरस शरीराच्या कोणत्याही अवयवात प्रवेश करू शकतो असं कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स सांगतात. "रक्ताच्या गुठळ्या होत असल्याने पक्षाघाताचा झटका, हार्ट अटॅक, कार्डियाकसारख्या केसेस दिसून येतात." असं डॉ. भारमल सांगतात.

स्वाईन फ्लूमध्येही डायरिया हे प्रमुख लक्षणं नसतानाही पोटदुखी,डायरिया अशा काही केसेस आढळून येतात. डायरिया झालेल्या रुग्णांना स्वाईन फ्लू होत असल्याचे निदर्शनात येत होते. आता कोरोनाच्या बाबतीतही असे होत आहे.

डायरिया झाला तर काय करायला हवे?

पावसाळ्यात अन्नातून विषबाधा झाल्याने डायरिया होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे डायरिया झाला म्हणजे कोरोनाची लागण झाली असे नाही. पण आपण कोरोनासारख्या आरोग्य संकटातून जात असल्याने प्रत्येकाने काही गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, डायरियासोबत इतर कोणतीही लक्षणं नसतील तरी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधं घ्या.

डायरिया होण्यापूर्वी आपल्याला अंगदुखी, ताप किंवा घसादुखी असं काही झालं होतं का? याचा विचार करुन अशा परिस्थितीमध्ये तातडीने आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. त्यांना डायरिया होण्यापूर्वी काय झाले होते तेही सांगा.

आपण कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलो का ? त्यानंतर डायरिया झालाय का? असाही विचार संबंधित व्यक्तीने करायला हवा.

ज्येष्ठ नागरिक, डायबेटीस आणि इतर गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना डायरिया झाला तरीही त्यांनी कोरोनाची टेस्ट करायला हवी असा सल्ला डॉक्टर देतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)