कोरोना व्हायरस : इटलीच्या चुकांमधून भारताने काय शिकण्यासारखं आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
कोरोना व्हायरसमुळे बळी गेलेल्या लोकांची सर्वाधिक संख्या इटलीत आहे. कोरोना व्हायरसच्या साथीची सुरुवात चीनमध्ये झाली, पण सर्वाधिक लोक इटलीत मृत्युमुखी पडले आहेत.
इटलीमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार इतक्या झपाट्याने का झाला? त्यांना हे रोखता नसतं आलं का या प्रश्नाची उत्तर आपण या लेखात पाहूत.
सुरुवातीला सरकार गाफील राहिलं?
दरवर्षी हजारो पर्यटक चीनहून इटलीला जातात. मिलान, व्हेनिस आणि रोम ही या पर्यटकांची आवडती ठिकाणी. डिसेंबरपासूनच कोव्हिड-१९ चीनमध्ये पसरायला सुरुवात झाली होती.

- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात

20 फेब्रुवारीर्यंत चीनमध्ये दोन हजारांच्या वर बळी गेले होते. त्यावेळी इटलीत पहिला कोव्हिड-१९चा पेशंट आढळला. त्यानंतर तीनच दिवसानंतर इटलीतील पेशंट्सची संख्या 152 वर गेली. आतापर्यंत तिथे एक लाखाच्यावर पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत आणि 11 हजरांच्या वर मृत्यू झालेत.
जेव्हा इटलीतील रुग्णांची संख्या दीडशेच्यावर गेली तेव्हा उत्तर इटलीतल्या लोंबार्डी प्रदेशातलं एक छोटं शहर बंद करण्यात आलं. पण इटली सरकारला तेव्हा अख्खा देश बंद करण्याची गरज वाटली नाही. त्यानंतर इटली सरकारने चीनहून येणारी विमानं बंद केली. आठवड्याभरात शाळा-कॉलेजं बंद झाली.

फेब्रुवारी संपेपर्यंत 500हून अधिक जणांना बाधा झाली होती, पण राजकीय पुढारी आणि प्रशासकीय अधिकारी जनतेला दिलासा देत राहिले की तुम्हाला काही होणार नाही, कोरोनाचा प्रसार रोखण्यात आपण यशस्वी होऊ. काही नेते हे फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत शेकहँड करून लोकांना दिलासा देत होते. पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी होती.
वेळीच पावलं न टाकल्यामुळे पाहता पाहता परिस्थिती हाताबाहेर गेली आणि आकड्यांचा स्फोट झाला. मग सरकार खडबडून जागं झालं, पण तोवर उशीर झाला होता. त्यानंतर देशातील 11 शहरांमध्ये 55,000 हून अधिक लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं. शाळा, कॉलेज, थिएटर्स बंद करण्यात आली, फुटबॉलचे सामने, समारंभ सर्वकाही बंद करण्यात आलं.
पण एका बाजूला शाळा, कॉलेज बंद करताना सरकारने मिलान शहर व्यापारासाठी खुलं ठेवलं. सगळं बंद केलं तर व्यापारावर परिणाम होईल, अशी भीती काही मंत्र्यांना वाटली. सगळं काही बंद करायला त्यांचा विरोध होता. मिलान पर्यकटांसाठी खुलं आहे असा ट्वीट इटलीचे एक मंत्री एंझो अॅमेनडोला यांनी केला. सरकारमधील अनेकांनी हा रिट्वीटही केला होता. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता.
इटलीच्या 4 चुकांमधून जगाने काय शिकावं?
इटलीच्या चुकातून आपण काय धडा घेऊ शकतो असं एक लेख हार्वर्ड बिजनेस रिव्ह्यूत आला आहे. त्यात त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या आहेत.
1. कन्फरमेशन बायस - म्हणजे एखादा नवा पुरावा समोर आला तरी त्याचा अर्थ सोयीनुसार आणि हवा तसाच लावायचा. चीन आणि इतर आशियाई देशांमध्ये कोरोनाने उच्छाद मांडला होता आणि वैज्ञानिक सांगत होते की मोठं संकट येणार आहे. पण इटलीतले राजकारणी देश बंद करायला तयार नव्हते कारण त्यांना अर्थव्यवस्थेची काळजी होती.

फोटो स्रोत, EPA
चीनमध्ये या व्हायरसने त्यावेळी दोन हजारहून अधिक बळी घेतले होते, पण या व्हायरसमुळे आपल्या देशात काही होणार नाही असा गैरसमज इटलीतल्या काही राजकारण्यांनी करून घेतला असू शकतो, असं हार्वर्डच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय.
2. इटलीची दुसरी चूक झाली ती म्हणजे ते वणवा थांबवण्यापेक्षा आग विझवत बसले. म्हणजे जिथे जास्त पेशंट्स आहेत, तेवढाच भाग बंद करत गेले. पण त्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केलं. त्यामुळे रोग पूर्ण देशात पसरला. त्यावेळी जर इटलीने पूर्ण देश लॉकडाऊन केला असता तर साथीचा वणवा देशभर पसरला नसता, असं या लेखात म्हटलं आहे.
3. तिसरी चूक या लेखात सांगितली आहे ती म्हणजे इटलीने इतरांच्या चुकांतून शिकण्याचा प्रयत्न केला नाही. चीन आणि दक्षिण कोरियात काय परिस्थिती आहे हे पाहून इटलीने पावलं उचलली असती तर त्याचा त्यांना फायदा झाला असता.

फोटो स्रोत, Getty Images
चीनने लॉकडाऊन करून प्रसाराचा वेग मंदावला तर दक्षिण कोरियामध्ये वेळेवर चाचण्या घेऊन रुग्णांना पटापट वेगळं काढलं. या दोन्ही गोष्टी इटलीने केल्या नाहीत.
4. इटलीची चौथी चूक झाली ती म्हणजे त्यांनी लोकांपर्यंत माहिती वेळेत पोहोचवली नाही. सार्वजनिक आरोग्याबद्दल आणि वैद्यकीय माहिती वेळीच लोकांपर्यंत आणि हॉस्पिटलच्या व्यवस्थापनापर्यंत आली असती तर त्यांना निर्णय घेणं सोपं झालं असतं. पेशंटच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेल्याने तिथल्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडला. जर हातात योग्य डेटा असता तर सोयी सुविधांचं योग्य व्यवस्थापन करता आलं असतं असं या लेखात म्हटलं आहे. नियोजन नसल्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आणि मृतांचा आकडा आणखी वेगाने वाढू लागला.
इटलीत आता काय परिस्थिती आहे?
इटलीतील स्थिती अजूनही नाजूकच आहे. अजूनही तिथे पुरेशा चाचण्या होत नसल्याचं तिथले स्थानिक आणि डॉक्टर सांगतात. इटलीतील लोंबार्डी प्रांतात कोरोना व्हायरसचा संसर्ग सगळ्यांत जास्त झाला आहे. इथं दररोज पाच हजारपेक्षा जास्त चाचण्या केल्या जात आहेत.
''आता जितक्या चाचण्या होत आहेत त्यापेक्षा अधिक चाचण्यांची गरज आहे. कारण चाचणी करणाऱ्या पथकांची वाट पाहत हजारो लोक घरांमध्ये बसले आहेत," असं तिथल्या डॉ. मासिमो गॅली यांनी सांगितलं.
याशिवाय कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांवर उपचार करणाऱ्या आरोग्य सेवकांकडे आवश्यक सुरक्षा उपकरणं आणि पोशाख नाहीयेत. इतर देशांसाठी हा एक मोठा इशारा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इटलीच्या रुग्णालयांमध्ये अतिरिक्त बेड्सची सोय करण्यात आली. पण औषधांची कमतरता ही सर्वांत मोठी समस्या आहे आणि इतर देशांनाही लवकरच या गोष्टी भेडसावणार आहेत.
इटलीमध्ये वृद्धांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोविड झाल्यावर हॉस्पिटलायझेशनची गरज भासणाऱ्यांची संख्याही जास्त आहे.
आम्ही काय करावं, ते सरकार आम्हाला नीट सांगत नाहीये, अशा तक्रारी स्थानिकांनी बीबीसी प्रतिनिधींशी बोलताना केल्या.
बीबीसी प्रतिनिधी मार्क लोवेन सांगतात की ''इटलीवासीयांसाठी प्रत्येक दिवस हा संघर्षाचा असतो. एका गावाच्या लोकसंख्येइतके लोक रोज मरत आहेत. लोंबार्डी प्रांतातच गेल्या 24 तासात 541 बळी गेले आहेत. अद्यापही आशेचा किरण कुठे दिसत नाहीये. एकच गोष्ट बरी म्हणावी लागेल की गेल्या काही दिवसांत कोरोनाची बाधा होणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात घटली आहे. पण चोहीकडून शोकसंदेशच येत आहेत.''
8 मार्चला संपूर्ण इटली लॉकडाउन करण्यात आलं. तो काळ आता सरकारने आणखी वाढवला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








