कोरोना व्हायरस कुठल्याही पृष्ठभागावर किती काळ जिवंत राहतो?

मास्क

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना व्हायरस जगात पसरला तसा वेगवेगळ्या पृष्ठभागांना हात लागला तर काय होईल, ही भीतीही लोकांच्या मनात घर करतेय.

लिफ्टचं बटण कोपराने दाबणे, दाराची मूठ उडताना हातावर रुमाल ठेवणे किंवा दाराची मूठ वारंवार पुसून घेणे, रेल्वेतून हँडल न धरता प्रवास करणे, ऑफिसमध्ये काम करतो तो टेबल वारंवार पुसणे, अशी दृश्यं नेहमीचीच झाली आहेत.

कोरोना विषाणुचा सर्वाधिक फैलाव झालेल्या भागांमध्ये स्थानिक प्रशासनाकडून पार्क, रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठीची औषध फवारणी केली जात आहे.

ऑफिस, हॉस्पिटल्स, दुकानं, रेस्टॉरंट आणि सोसायट्यांमध्येसुद्धा स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे. ज्या ठिकाणी हातांचा सर्वाधिक स्पर्श होतो, अशी ठिकाणं डेटॉल सारखी डिसइन्फेक्टंट टाकून स्वच्छ केली जात आहेत.

काही ठिकाणी तर मध्यरात्री जेव्हा सगळे गाढ झोपी जातात तेव्हा काही तरुण स्वतः जाऊन कॅश मशीनचे किपॅड्स निर्जंतूक करण्यासाठी पुसून घेत आहेत.

फ्लू सारखे आजार पसरवणाऱ्या इतर अनेक विषाणुंप्रमाणेच कोरोना कुटुंबातील कोव्हिड 19 हा विषाणूसुद्धा खोकलताना किंवा शिंकताना तोंडातून किंवा नाकातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या सूक्ष्म थेंबातून म्हणजेच ड्रॉपलेट्समधून पसरतो.

एकदा खोकलल्यावर जवळपास 3000 ड्रॉपलेट्स तोंडातून बाहेर फेकले जातात. हे ड्रॉपलेट्स जवळ उभी असलेली व्यक्ती, तिचे कपडे आणि आसपासच्या पृष्ठभागांवर पडतात. मात्र, काही अतिसूक्ष्म कण हवेतच राहू शकतात.

कोरोना
लाईन

इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की Centers for Disease Control & Prevention या संस्थेनुसार विषाणू असलेल्या वस्तू किंवा पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर त्याच हाताने स्वतःच्या चेहऱ्याला स्पर्श केल्यामुळे विषाणूची लागण होईलच असं नाही.

'विषाणुचा संसर्ग होण्याचा हा मुख्य मार्ग नाही', असं या संस्थेचं म्हणणं आहे. मात्र, तरीदेखील ही संस्था, जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आरोग्य अधिकारी कोव्हिड 19 विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवणे आणि वारंवार स्पर्श होणारे पृष्ठभाग निर्जंतूक करणे महत्त्वाचं असल्याचं सांगते.

त्यामुळे विषाणू असलेल्या पृष्ठभागाला स्पर्श केल्यामुळे नेमक्या किती जणांना संसर्गाची लागण होते, याची खात्रीशीर माहिती देता येत नसली तरी खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

एक महत्त्वाची बाब जी अजून स्पष्ट नाही ती म्हणजे कोव्हिड-19 हा आजार देणारा Sars-Cov_2 हा विषाणू मानवी शरीराबाहेर किती काळ जिवंत राहू शकतो.

मात्र, Sars आणि Mers यासारखे कोरोना कुटुंबातील इतर विषाणू धातू, काच आणि प्लॅस्टिक पृष्ठभागांवर तब्बल 9 दिवस जिवंत राहू शकतो, असं काही संशोधनांमध्ये आढळून आलं आहे. तर कमी तापमानात काही विषाणू तर 28 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात.

कोरोना कुटुंबातील विषाणू परिस्थितीशी जुळवून घेत असल्याचं आतापर्यंतच्या संशोधनातून स्पष्ट होतं. आता शास्त्रज्ञांकडून कोरोनाच्या Sars-Cov-2 या नव्या विषाणुच्या प्रसारावर याचा कसा परिणाम होतो, यावर संशोधन सुरू आहे.

अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ (NIH)मध्ये व्हायरोलॉजिस्ट असलेल्या नीलजे वॅन डोरेमेलन आणि मॉन्टानातील हॅमिल्टनमध्ये असलेल्या रॉकी माउंटेन लेबॉरेटरीजमधल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोनाचा हा नवा विषाणू कुठल्या पृष्ठभागावर किती काळ जिवंत राहतो, याविषयीचा अभ्यास केला. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये या अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहेत.

फवारणी

फोटो स्रोत, Getty Images

यात असं आढळलं की हा विषाणू खोकल्यातून शरीराबाहेर हवेत फेकल्यानंतर ड्रॉपलेटच्या स्वरुपात हवेत तीन तास जिवंत राहू शकतो. तर अतिसूक्ष्म म्हणजे 1 ते 5 मायक्रोमीटर आकाराचे ड्रॉपलेट्स स्थिर हवेत काही तास जिवंत राहू शकतात.

याचा अर्थ अनफिल्टर एअर कंडिशनर असलेल्या खोलीत हा विषाणू असेल तर तो त्या हवेत फार फार तर एक-दोन तास जिवंत राहू शकतो. हवा खेळती असेल तर हे डॉपलेट्स पृष्ठभागावर स्थिरावतात.

मात्र, NIHने केलेल्या अभ्यासात आढळून आलं आहे की Sars-Cov-2 हा विषाणू कार्डबोर्डवर 24 तासांपर्यंत तर प्लॅस्टिक आणि स्टेनलेस स्टीलवर 2 ते 3 दिवस जिवंत राहू शकतो.

याचाच अर्थ हा विषाणू दारांच्या मुठी, प्लॅस्टिकचे टेबल, स्टेनलेस स्टीलची भांडी यांच्यावर एवढा काळ जिवंत राहू शकतो. या संशोधनात असंही आढळलं आहे की तांब्याचा पृष्ठभागावर हा विषाणू ४ तासात मारतो.

मात्र, हा विषाणू संपवण्याचा याहूनही वेगवान पर्याय आहे. विषाणू असलेला पृष्ठभाग 62-71% अल्कोहोल असलेले किंवा 0.5% हायड्रोजन पॅरॉक्साईड असलेले डिसन्फेक्टंट लिक्विड किंवा 0.1% सोडियम हायपोक्लोराईड असलेले घरगुती वापराचे ब्लीच वापरून स्वच्छ केल्यास मिनिटभरात हे विषाणू संपतात.

कोरोना कुटुंबातील काही विषाणू उष्ण वातावरण आणि दमट हवामानात मरतात. मात्र, हा नवीन कोरोना विषाणू 56 अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानात मरतो. मात्र, हे तापमान खूपच जास्त आहे. आंघोळीच्या पाण्याच्या तापमानापेक्षाही जास्त.

सॅनिटायझर

फोटो स्रोत, Getty Images

संसर्गजन्य व्यक्तीच्या खोकल्यातून बाहेर पडलेल्या एका ड्रॉपलेटमध्ये किती विषाणू असतात, हे सांगता येत नसलं तरी साध्या फ्लूविषयी बोलायचं तर खोकल्यातील एका ड्रॉपलेटमध्ये फ्लूचे हजारो विषाणू असतात. मात्र, ही आकडेवारीही अनेक गोष्टींवर अवलंबून असते. उदाहरणार्थ विषाणू कोणता आहे, श्वसनमार्गात तो कुठे होता आणि व्यक्तीचा संसर्ग कोणत्या स्टेजला गेला आहे.

कपडे आणि इतर कठीण किंवा टणक पृष्ठभागांवर विषाणू किती काळ जिवंत राहतो, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

रॉकी माउंटेन लेबॉरेटरीजच्या वायरस इकॉलॉजी सेक्शनचे प्रमुख आणि NIH या संस्थेने केलेल्या अभ्यासाचं नेतृत्त्व करणारे विंसेंट मन्सटर सांगतात की कार्डबोर्डमध्ये शोषून घेण्याचा गुणधर्म असणाऱ्या नैसर्गिक तंतुंमुळे हा विषाणू लवकर शुष्क होत असावा म्हणजेच मरत असावा.

ते म्हणतात, "आम्हाला असं वाटतं की सच्छिद्र (पोरस) मटेरियलमुळे तो लवकर वाळत असावा आणि तंतूंमध्ये अडकून बसत असावा."

तापमानातील बदल आणि दमट हवामान याचाही विषाणू किती काळ जिवंत राहतो, यावर परिणाम होत असतो. मात्र, नेमका किती आणि कसा परिणाम होतो, यावरचं संशोधन अजून सुरू आहे.

त्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की हा विषाणू कुठल्या पृष्ठभागावर किती काळ जिवंत राहतो, याविषयीच बरंच संशोधन अजून सुरू आहे. पृष्ठभागानुसार तो 3 तासांपासून ते 3 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो, असं आतापर्यंतच्या अभ्यासांमधून आढळून आलं आहे. या विषाणुवर तापमान आणि दमट हवामानाचाही परिणाम होतो.

आणि म्हणूनच या विषाणुच्या जिवंत राहण्याची क्षमता बघता हात वारंवार स्वच्छ धुवणे आणि ज्या पृष्ठभागांना आपण वारंवार स्पर्श करतो, असे पृष्ठभाग ओळखून ते वारंवार निर्जंतूक करणे, याला पर्याय नाही.

मनस्टर म्हणतात त्याप्रमाणे, "हा विषाणू अनेक मार्गांनी संक्रमित होऊ शकतो."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)