Donald Trump: महाभियोग प्रकरणातून ट्रंप यांची सिनेटकडून सुटका

फोटो स्रोत, AFP
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची महाभियोगाच्या प्रक्रियेतून सुटका झाली आहे. त्यांना पदावरुन दूर करण्याची प्रक्रिया काल सिनेटच्या निर्णयानंतर संपुष्टात आली आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या रिपब्लिकन पार्टीचे सिनेटमध्ये बहुमत आहे. ट्रंप यांच्यावर असलेला सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप 52 विरुद्ध 48 मतांनी तर काँग्रेसचं काम स्थगित केल्याचा आरोप 53 विरुद्ध 47 मतांनी फेटाळण्यात आला.
संभाव्य विरोधी उमेदवाराची बदनामी करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणल्याला ट्रंप यांच्यावर आरोप होता. हा आरोप डेमोक्रॅट खासदारांनी ठेवला होता.
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होत आहेत. महाभियोगाला सामोरे गेलेले ट्रंप पहिले उमेदवार असतील.
बुधवारी सिनेटमध्ये झालेल्या मतदानात राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना पदावरुन दूर करू नये असा कौल मिळाला.
युक्रेन संबंधांमध्ये त्यांनी आपल्या बळाचा दुरुपयोग केला असा आरोप त्यांच्यावर होता. ट्रंप यांच्यावरचा कोणताही आरोप सिद्ध झाला असता तर त्यांना आपला कार्यभार उपराष्ट्रपती माइक स्पेन्स यांच्याकडे सोपवावा लागला असता.
डेमोक्रॅट पक्षाचं बहुमत असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजनी 18 डिसेंबर रोजी महाभियोगाला मंजुरी दिली होती.
राष्ट्रपती ट्रंप काय म्हणाले?
दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ट्रंप यांनी आपल्यावरचे आरोप नेहमीच फेटाळले होते.
त्यांच्या निवडणूक कार्यालयाने जाहीर केलेल्या एका पत्रकामध्ये 'राष्ट्रपती ट्रंप पूर्णपणे यातून बाहेर आले आहेत आता त्यांना अमेरिकन नागरिकांची पुन्हा सेवा करण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.'
'ट्रंप यांना पराभूत करता येणार नाही हे रिकामटेकड्या डेमोक्रॅटसना माहित असल्यामुळेच ते ट्रंप यांना अशापद्धतीने पदच्युत करण्यासाठी महाभियोगाचा प्रस्ताव आणला गेला.'
ही एक अवघड परीक्षा होती आणि डेमोक्रॅट पक्षाची ही एक निरर्थक निवडणूक मोहीम होती. महाभियोगाचं हे नाटत अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील एक वाईट घटना ठरेल असंही त्यात म्हटलं आहे.
ट्रंप यावर प्रतिक्रिया आज गुरुवारी देणार आहेत.
गॅलप संस्थेने जाहीर केलेल्या अहवालात या आठवड्यामध्ये अमेरिकन मतदारांचा कौल सर्वांत जास्त ट्रंप यांना आहे. त्यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वीकारण्याचा दर 49 टक्के इतका झाला आहे.
महाभियोगावरील मतदान कसं झालं?
उटाचे सिनेटर मिट रोमनी यांनी ट्रंप यांच्याविरोधात मतदान केलं. ट्रंप यांच्याविरोधात जाणारे ते एकमेव रिपब्लिकन खासदार आहेत.

फोटो स्रोत, Reuters
ट्रंप यांनी जनतेच्या विश्वासाचा दुरुपयोग केला असं मत रोमनी यांनी यापूर्वी व्यक्त केलं होतं.
सुसान कॉलिन्स आणि मुरकोव्स्की हे रिपब्लिकन नेतेही ट्रंप यांच्याविरोधात मतदान करतील अशी आशा डेमोक्रॅटसना होती.
काही रिपब्लिकन सिनेटर्सनी ट्रंप यांच्यावर टीका केली होती मात्र त्यांना पदच्युत केलं जावं इतकी मोठी घटना नसल्याचं ते सिनेटर्स म्हणाले होते. ट्रंप यांना पदावरुन दूर करण्यासाठी दोन तृतियांश सिनेटर्सनी ट्रंप यांच्याविरोधात मतदान करण्याची गरज होती. हे शक्य नसल्याचं आधीपासूनच स्पष्ट होतं.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









