कोरोना व्हायरस : प्राण्यांमुळेच का पसरत आहेत अलिकडचे आजार?

Chickens in cages, China

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रा. टिम बेंटन
    • Role, चॅटम हाऊस, इमर्जिंग रिस्क्स टीम

चीनमधून इतर 16 देशांमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूशी मुकाबला कसा करायचा यावर जगभर सध्या चर्चा सुरू आहे.

अशाप्रकारच्या विषाणूच्या फैलावाची वा उद्रेकाची ही पहिलीच वेळ आहे.

प्राण्यांपासून फैलाव झालेल्या या विषाणूमुळे मानवाला प्राणीजन्य रोग होण्याचा धोका पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कदाचित भविष्यामध्ये हवामान बदल आणि जागतिकीकरणामुळे जसंजसं प्राणी आणि माणसांतलं नातं बदलेल तसं कदाचित अशा अडचणींचं प्रमाणही वाढेल.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

News image

प्राण्यांमुळे माणसं कशी आजारी होऊ शकतात?

गेल्या 50 वर्षांमध्ये अनेक संसर्गजन्य आजार प्राण्यांकडून माणसांकडे येऊन वेगाने पसरले.

1980च्या दशकामध्ये HIV/AIDS ची सुरुवात ग्रेट एप्स (Great Apes) म्हणजेच माकडांपासून झाली. 2004-07 या काळात बर्ड फ्लूची साथ पक्षांकडून पसरली. तर 2009मध्ये डुक्करांमुळे स्वाईन फ्लू पसरला. सिव्हियर अक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम (SARS) हा सिव्हेट्स (Civets) मुळे पसरल्याचं नुकतंच आढळलं होतं. तर EBOLA (इबोला)ची लागण माणसांना वटवाघुळांकडून झाली.

मानवाला प्राण्यांपासून कायम आजार झाले आहेत. खरंतर बहुतेक संसर्गजन्य आजार हे वन्य प्राण्यांकडूनच आले आहेत.

पण आता बदलत्या वातावरणामुळे या प्रक्रियेला वेग आलाय. शहरांमध्ये वाढलेली गर्दी आणि आंतरराष्ट्रीय प्रवासांचं वाढलेलं प्रमाण यामुळे आता हे आजार लवकर पसरतात.

आजार प्रजाती बदलून कसे पसरतात?

आजार वाहून नेऊ शकतील असे विविध रोगकारक बॅक्टेरिया आणि विषाणू (Pathogens) बहुतेक प्राण्यांमध्ये असतात.

नवीन शरीरांमध्ये संसर्ग करणं हाच या रोगकारक विषाणूंकडचा टिकून राहण्याचा पर्याय असतो. म्हणूनच एका प्रजाती मार्फत दुसऱ्या प्रजातीत शिरकाव करणं हा त्यासाठीचा एक मार्ग असतो.

नवीन प्रजातीच्या शरीरातली रोगप्रतिकारक यंत्रणा हे रोगकारक बॅक्टेरिया आणि विषाणू मारून टाकण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच या दोन्हींमध्ये एकमेकांवर मात करण्याची स्पर्धा सुरू होते.

उदाहरणार्थ, 2003 मध्ये सार्सची साथ आली तेव्हा याची बाधा झालेल्यांपैकी साधारण 10% लोकांचा मृत्यू झाला. पण फ्लूच्या साथीमध्ये 0.1% पेक्षा कमी लोकांचा मृत्यू झाला होता.

हवामान आणि वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांमुळे प्राण्यांचा अधिवासही बदलतोय. प्राणी कुठे राहतात, कसे राहतात आणि कोणता प्राणी कोणाला खातो यामध्येही बदल होतोय.

माणसाच्या राहणीतही फरक पडलेला आहे. जागतिक लोकसंख्येपैकी 55% लोकसंख्या आता शहरांमध्ये राहते. 50 वर्षांपूर्वी हे प्रमाण 35% होतं.

Monkeys in a rubbish bin

फोटो स्रोत, Getty Images

आणि या मोठ्या शहरांमध्ये उंदीर, घुशी, रॅकून (Raccoons), खार, कोल्हा, लांडगा, माकडं अशा प्राण्यांना नवीन घर मिळतं. बागा, उद्यानं, माणसांनी केलेला कचरा यामध्ये हे सगळे प्राणी राहू शकतात.

अनेकदा जंगलांपेक्षा या प्राण्यांना शहरांमध्ये जगणं सोपं जातं. कारण इथे त्यांना भरपूर अन्न मिळतं. परिणामी या शहरी भागांमधल्या रोगराईतही वाढ होते.

धोका कोणाला?

नवीन प्रजातीतला नवीन रोग हा अनेकदा जास्त धोकादायक असतो. म्हणून एखादा नवीन रोग आढळल्यावर चिंता व्यक्त केली जाते.

त्यातही काही गटांना हे रोग होण्याचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो.

शहरात राहणारी गरीब लोकं ही बहुतेकदा स्वच्छता आणि साफसफाईच्या कामात सहभागी नसतात. त्यामुळे त्यांचा या रोगांच्या स्रोतांशी संबंध येऊन त्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.

शिवाय पुरेसा आहार न मिळणं, स्वच्छ-निरोगी वातावरण न मिळाल्याने त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही कमी असण्याची शक्यता असते. असे लोक आजारी पडल्यास त्यांना औषधोपचार परवडणारे नसतात.

शिवाय शहरांमध्ये लहान जागेत जास्त व्यक्तींचा वावर असतो. हे सगळेच जण लहानशा जागेत श्वास घेतात, त्यांचा स्पर्शही अनेक गोष्टींना होतो. त्यामुळे शहरांमध्ये नवीन संसर्ग जास्त वेगाने पसरतात.

काही संस्कृतींमध्ये शहरी प्राणी म्हणजे शहरातच पकडलेले वा परिसरातच जोपासण्यात आलेल्या प्राण्यांचं अन्न म्हणून सेवन केलं जातं.

रोगांमुळे आपली वागणूक कशी बदलते?

कोरोना व्हायरसच्या आतापर्यंत 8000 केसेस आढळल्या आहेत. तर यामुळे 170 जणांचा मृत्यू झालाय. यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न विविध देश करत असले तरी याचे आर्थिक परिणाम होणार हे नक्की.

प्रवासावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. आणि आपल्यालाही याची बाधा होऊ शकते या भीतीने लोक एकमेकांशीही वेगळं वागत आहेत.

परिणामी सरहद्द ओलांडून जाणं कठीण होतं. जागोजागी जाऊन हंगामी काम करणाऱ्यांना स्थलांतर करता येत नाही आणि याचा परिणाम उत्पादनावरही होतो.

Passengers at a Hong Kong railway station

फोटो स्रोत, Getty Images

2003 मध्ये सार्सच्या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचं सहा महिन्यांमध्ये अंदाजे 40 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं होतं. यामध्ये लोकांवरच्या उपचारांचा खर्च तर होताच पण आर्थिक व्यवहारांमध्ये झालेली घट, लोकांच्या स्थलांतरावर आलेले निर्बंध, यांचाही हा परिणाम होता.

आपण काय करू शकतो?

प्रत्येक नवीन संसर्गजन्य आजार ही एक स्वतंत्र समस्या असल्याचं समाज आणि सरकारकडून पाहिलं जातं. त्याच्याकडे जग बदलणारी एक गोष्ट म्हणून पाहिलं जात नाही.

आपण पर्यावरणात जितके बदल करू तितका इको-सिस्टीमला धक्का लागेल आणि अशा प्रकारच्या आजारांच्या उद्रेकाला संधी मिळेल.

आतापर्यंत जगातल्या एकूण रोगकारक बॅक्टेरिया आणि विषाणूंपैकी फक्त 10% ची ओळख पटलेली आहे. अजूनही इतर रोगकारकांची ओळख पटलेली नाही आणि प्राण्यांमध्ये हे विषाणू असू शकतात.

शहरात राहणाऱ्या अनेकांना शहरी प्राणी महत्त्वाचे वाटतात. पण यातल्या काही प्राण्यांमुळे धोके संभवतात, हे देखील आपण लक्षात घ्यायला हवं.

शहरात नव्याने आढळणाऱ्या प्राण्यांची नोंद ठेवणं, त्यांच्यावर नजर ठेवणं गरजेचं आहे. शिवाय लोक जंगली प्राणी मारून खात आहेत का, ते परिसरातल्या बाजारांमध्ये आणत आहेत का, यावरही लक्ष ठेवायला हवं.

स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पेस्ट कंट्रोल या सगळ्याद्वारे विषाणूंचा उद्रेक आणि फैलाव रोखता येण्याजोगा असतो.

शिवाय ज्या प्रकारे आपण पर्यावरण हाताळतो वा त्याच्याशी संबंध ठेवतो, त्याकडेही पाहणं महत्त्वाचं आहे.

बीबीसी

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)