ग्रेटा थुनबर्ग: पर्यावरणवादी कार्यकर्ती जेव्हा आपल्या आईवडिलांनाच ढोंगी म्हणायची...

ग्रेटा थनबर्ग

फोटो स्रोत, Reuters

अवघ्या 16 वर्षी हवामान बदलाविरोधातल्या लढ्याचं जगभरात नेतृत्व करू पाहणारी ग्रेटा थुनबर्ग तुम्हाला माहिती असेलच. तिच्या धारदार भाषणांनी तिने जागतिक नेत्यांनाही संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरून झापलंय.

मात्र तिचं या लढ्यात इतकं सक्रीय होणं तिच्या वडिलांना पटलंल नव्हतं.

हवामान बदलाच्या मुद्द्यावर आपल्या मुलीने शाळा सोडून संप पुकारणं आणि एवढं मोठं आंदोलन उभं करणं आपल्याला रुचलं नव्हतं, आणि त्यानंतर असं पहिल्या पंक्तीत जाऊन बसणं हे आपल्याला योग्य वाटलं नव्हतं, असं ग्रेटाचे वडील स्वान्ट थुनबर्ग यांनी बीबीसीच्या एका कार्यक्रमात सांगितलं.

पर्यावरण कार्यकर्ती बनल्यापासून ग्रेटा आनंदी आहे. मात्र, यामुळे त्यांच्या मुलीला काही लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय, याची त्यांना काळजी वाटते, असंही ते म्हणाले.

16 वर्षांच्या ग्रेटा थुनबर्गने हवामान बदलाविषयी ज्या जोरकसपणे आंदोलन केलं त्यातून जगभरातल्या अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.

ग्रेटा थनबर्ग

ग्रेटाच्या वडिलांनी रेडियो 4च्या टुडे या कार्यक्रमात आपल्या भावना बोलून दाखवल्या. विशेष म्हणजे या कार्यक्रमात पाहुणी संपादक स्वतः ग्रेटाच होती.

या कार्यक्रमात पर्यावरणविषयक अनेक डॉक्युमेंट्री बनवणारे सुप्रसिद्ध निवेदक सर डेव्हिड अॅटनबरो हेदेखील सहभागी झाले होते. ग्रेटाने हवामान बदलाविषयी संपूर्ण जगाचे डोळे उघडल्याचं ते म्हणाले.

ग्रेटा स्वीडनची राजधानी स्टॉकहोममधल्या आपल्या घरातून व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

आपल्याला अॅटनबरो यांच्या कार्यातून प्रेरणा मिळाल्याचं यावेळी ग्रेटाने सांगितलं. या क्षेत्रात 20 वर्षांपासून काम करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांनाही जे यश मिळालं नाही, ते ग्रेटाने कमावल्याचं सर डेव्हिड अॅटनबरो म्हणाले.

ग्रेटा थनबर्ग

फोटो स्रोत, KENA BETANCUR/GETTY IMAGES

एकट्या ग्रेटामुळेच ब्रिटनच्या निवडणुकीत पर्यावरण महत्त्वाचा मुद्दा ठरल्याचंही ते म्हणाले.

यंदाच्या नोबेल पुरस्कारासाठी ग्रेटाच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. जगभरातल्या नेत्यांनी हवामान बदल रोखण्यासाठी पावलं उचलण्याची मागणी ग्रेटाने केली होती आणि तिच्या आंदोलनामुळेच जगभरातील शाळांमध्ये एकत्र संप पुकारण्यात आला होता.

नैराश्याचा सामना करणारी ग्रेटा

बीबीसीच्या कार्यक्रमात ग्रेटाच्या वडिलांनी सांगितलं की शाळेचा संप सुरू करण्याच्या तीन-चार वर्षांपूर्वी ग्रेटा नैराश्यात होती. "ग्रेटाने बोलणंही कमी केलं होतं. शाळेत जाणंही सोडलं होतं, खाणं-पिणंही सोडलं होतं. आपल्यासाठी हे एखाद्या दुस्वप्नासारखं होतं," असंही ते म्हणाले.

ग्रेटाला बरं करण्यासाठी ते ग्रेटा आणि तिची धाकटी बहीण बियाटा यांच्यासोबत जास्तीत-जास्त वेळ घरीच घालवू लागले.

ग्रेटाची आई मालेना अर्नमॅन ओपेरा गायिका आहेत. त्यांनीही जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवता यावा, यासाठी अनेक करार रद्द केले.

ग्रेटा थनबर्ग

स्वान्ट सांगतात की ते डॉक्टरांकडेही गेले. ग्रेटा 12 वर्षांची असताना तिला ऑटिझमसारखाच अॅस्पर्जर्स सिन्ड्रोम असल्याचं निदान झालं.

आजाराविषयी कळाल्यानंतर काही वर्षं ग्रेटा आणि तिच्या पालकांनी हवामान बदलाचा अभ्यास केला. ग्रेटाचा या विषयात रस वाढू लागला.

मानवाधिकारांप्रती सजग असणारे ग्रेटाचे वडील सांगतात की ग्रेटावर हवामान बदल या विषयाचा एवढा परिणाम झाला होता की ती स्वतःच्या पालकांनाच ढोंगी म्हणायची. तिचं म्हणणं होतं, "आपण हवामान बदलाला गांभीर्याने घेत नसू तर तुम्ही कुठल्या मानवाधिकारांविषयी बोलता."

पालकांच्या वागणुकीत झालेल्या बदलातून ग्रेटाला पर्यावरण कार्यकर्ती होण्याची प्रेरणा मिळाल्याचं ते सांगतात.

ग्रेटाच्या आईने विमान प्रवास करणं सोडलं आणि तिच्या वडिलांनी मांसाहार सोडून शाकाहार सुरू केला.

न्यूयॉर्क आणि मॅड्रीडमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामानविषयक संमेलनात सहभागी होण्यासाठी ग्रेटा आणि तिचे वडील बोटीने गेले होते.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

विमान प्रवासाने पर्यावरणाचं होणारं नुकसान बघता ग्रेटाने विमान प्रवास नाकारला होता.

स्वान्टे सांगतात, "मी हे सगळं यासाठी केलं कारण हे सगळं योग्य होतं. मी हे सगळं पर्यावरण वाचवण्यासाठी नाही तर आपल्या मुलीला वाचवण्यासाठी केलं."

"मला दोन मुली आहेत आणि त्याच माझ्यासाठी सर्वकाही आहेत. मला फक्त त्यांना आनंदी ठेवायचं आहे."

कार्यकर्ती बनल्यानंतर ग्रेटामध्ये बदल झाल्याचं, ती आता जास्त आनंदी राहत असल्याचं तिचे वडील सांगतात. "तुम्हाला वाटत असेल की ग्रेटा सामान्य मुलगी नाही, काहीतरी वेगळी आहे. तिला खूप प्रसिद्धी मिळाली आहे.

"पण माझ्यासाठी ती एक सामान्य मुलगीच आहे, इतरांप्रमाणेच ती सगळी कामं करू शकते. ती नाचते, हसते. आम्ही एकत्र खूप मस्ती करतो. ती आयुष्यात एका चांगल्या ठिकाणी आहे."

ग्रेटा थनबर्ग

फोटो स्रोत, Getty Images

स्वान्ट सांगतात की जेव्हापासू ग्रेटाचा शाळेचा संप व्हायरल झाला तेव्हापासून तिला अनेकांनी दूषणं लावली. ही ती माणसं आहेत जी पर्यावरण बदलण्यासाठी आपली जीवनशैलीत बदल करू इच्छित नाहीत. आपले कपडे, वागणूक आणि आपल्या वेगळेपणावरून लोक आपल्याला कसे चिडवायचे, हे ग्रेटानेही यापूर्वी सांगितलं आहे.

आपल्याला फेक न्यूजची काळजी वाटत असल्याचं ग्रेटाचे वडील म्हणतात. ग्रेटाच्या विरोधात जे काही पसरवलं जातं, त्यातून द्वेष निर्माण होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

मात्र आपली मुलगी या सर्व टीकेचा सामना उत्तमप्रकारे करेल, असा विश्वासही ते व्यक्त करतात.

ते म्हणाले, "ती हे सगळं कसं करते, मला खरंच कळत नाही. ती बरेचदा हसते. तिला हे सगळं फार बालीश वाटतं."

ते पुढे म्हणाले ग्रेटा आता 17 वर्षांची होतेय. त्यामुळे आता तिला प्रवासात कुणाच्या सोबतीची गरज नसेल.

"तिला माझी गरज असेल तेव्हा मी तिच्यासोबत जाण्याचा प्रयत्न करेन. मात्र, ती बऱ्याचशा गोष्टी स्वतःच करेल. हे खूप चांगलं आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)