UK Election: बोरिस जॉन्सन यांना भारतीय वंशाचे लोक 'ब्रिटनचे मोदी' का म्हणतात?

बोरिस जॉन्सन, युके, ब्रेक्झिट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नरेंद्र मोदी आणि बोरिस जॉन्सन
    • Author, झुबैर अहमद
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, लंडन

बोरिस जॉन्सन हे 'ब्रिटनचे मोदी' आहेत असं आम्हाला वाटतं. हे विचार आहेत ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका अनिवासी भारतीयाचे.

ते सांगतात, युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इतके लोकप्रिय नाहीत पण त्यांच्यात वैचारिक समानता आहे त्यामुळे त्यांची तुलना अपरिहार्य होते.

त्यांना असं वाटतं की बोरिस जॉन्सन हे भविष्यातही निवडणुका जिंकू शकतात.

व्हीडिओ कॅप्शन, बोरिस जॉन्सन : पत्रकार ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास

कंझर्व्हेटिव्ह पक्षाला गेल्या 25 वर्षांतला सर्वांत मोठा विजय मिळवून देण्यात बोरिस जॉन्सन यांचा सिंहाचा वाटा आहे. अर्थात या विचारांशी सगळेच सहमत असतील असं नाही.

ब्रॅडफर्ड येथील एका मंदिराच्या न्यासाचे प्रमुख मुकेश शर्मा सांगतात, "दोघांमध्ये काही समानता आहे असं आम्ही छातीठोकपणे तर सांगू शकत नाही. पण बहुतांश अनिवासी भारतीयांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाला मतदान केलं त्यामुळे सध्या आम्ही खुश आहोत. पण काही लोक असेही आहेत की ज्यांनी बोरिस यांना नाकारलं आहे."

अनिवासी भारतीयांचं ब्रिटनच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे या समाजाला आकर्षित करण्याचे प्रयत्न बोरिस जॉन्सन यांनी केल्याचं दिसून आलं.

भारतीय वंशाच्या खासदारांच्या संख्येत वाढ

कंझर्व्हेटिव्ह पक्षात याआधी भारतीय वंशाचे पाच खासदार होते आता त्यांची संख्या सात झाली आहे. लेबर पार्टीतही सात भारतीय वंशाचे खासदार आहेत.

भारतीय वंशाच्या प्रीती पटेल या सध्या गृह खात्याचा कारभार सांभाळतात. हे खातं त्यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. बोरिस यांच्या मंत्रिमंडळात तसेच विरोधी पक्षातही भारतीय वंशाच्या लोकांना महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची संधी आहे.

बोरिस जॉन्सन, युके, ब्रेक्झिट

फोटो स्रोत, FACEBOOK/BORIS JOHNSON

फोटो कॅप्शन, भारतीय वंशाच्या खासदारांमध्ये वाढ झाली आहे.

निवडणूक प्रचाराच्या वेळी जॉन्सन यांनी लंडनच्या निसडेन येथील मंदिराला भेट दिली. आम्ही भारतीय वंशाच्या लोकांच्या बाजूने आहोत हा संदेश देण्यासाठी तसेच भारतीय वंशाचे लोक माझे मित्र आहेत हे दाखवण्यासाठी जॉन्सन यांनी ही भेट दिल्याचं बोललं गेलं.

इंग्लंडच्या प्रगतीमध्ये भारतीय वंशाच्या 15 लाख लोकांचं मोठं योगदान आहे असं त्यांनी नीसडेन मंदिरात म्हटलं होतं. भारतीय वंशाच्या लोकांशी आपले जिव्हाळ्याचे संबंध आहेत असं देखील ते म्हणाले होते.

कालच युके निवडणुकांचे निकाल लागले. या निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं. असं म्हटलं जात आहे की 1987 नंतर हा कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा सर्वांत मोठा विजय आहे.

ब्रेक्झिटच्या प्रश्नाचं काय?

बोरिस जॉन्सन यांचं म्हणणं आहे की या निवडणुकीत मिळालेलं स्पष्ट बहुमत म्हणजे युकेच्या जनतेनी ब्रेक्झिटला दिलेला कौल आहे. ब्रेक्झिटची प्रक्रिया तत्काळ सुरू केली जाईल आणि पुढील महिन्यात युके हे युरोपियन युनियन बाहेर असेल असं गृह मंत्री प्रीती पटेल यांनी काल म्हटलं. याचाच अर्थ असा की इतर देशांशी परस्पर संबंध कसे ठेवावेत याचे अधिकार आता युकेकडे असणार आहे.

बोरिस जॉन्सन, युके, ब्रेक्झिट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बोरिस जॉन्सन

पण विश्लेषकांचं याबाबत म्हणणं वेगळं आहे. मॅंचेस्टर येथे राहणारे आणि लेबर पार्टीचं समर्थन करणारे दिलबाग तनेजा म्हणतात "ब्रेक्झिट हे वाटतं तितकं सोपं होणार नाही. ब्रेक्झिट असं झालं आहे की अनेक वर्षांच्या संसारानंतर एखादं जोडपं जेव्हा घटस्फोट घेतं तेव्हा त्या जोडप्याची जी स्थिती होते तशीच स्थिती युके आणि युरोपियन युनियनमधील इतर देशांची होऊ शकते."

"घटस्फोटानंतर आलेल्या एकटेपणाची जाणीव दोन्ही पक्षांना सारखीच होऊ शकते. ब्रिटनला नवे मित्र शोधावे लागतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ब्रिटनशी असलेले व्यापारी संबंध आणखी दृढ केले जातील अशी घोषणा केली आहे. अमेरिकेबरोबर व्यापारी संबंध घट्ट करणं हे जॉन्सन यांच्यासमोरचं मोठं आव्हान आहे," तनेजा सांगतात.

ब्रेक्झिटनंतर भारताबरोबरच नातं कसं राहील?

एकेकाळी लेबर पार्टीसोबत असलेले विश्लेषक लॉर्ड मेघनाद देसाई म्हणतात की "ब्रिटनचे भारताबरोबर आधीही चांगले संबंध आणि पुढेही राहतील. इथं राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना तर असं वाटतं की ब्रेक्झिटनंतर बोरिस जॉन्सन यांचा पहिला परदेश दौरा हा भारताचाच असेल.

लंडन येथील एक दुकानदार ईश्वर प्रधान यांची अशी इच्छा आहे की बोरिस जॉन्सन यांना पहिला परदेश दौरा हा भारताचाच करावा. ते सांगतात, "जॉन्सन आणि भारताचं नातं घट्ट आहे. त्यांची पहिली पत्नी ही भारतीय वंशाची होती. जॉन्सन हे जेव्हा लंडनचे महापौर होते तेव्हा ते भारतात येऊन गेले आहेत. त्यांना भारतीयांबद्दल त्यांच्या मनात प्रेम आहे."

बोरिस जॉन्सन, युके, ब्रेक्झिट

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, युकेतलं वातावरण

भारत आणि ब्रिटनचं ऐतिहासिक नातं आहे पण त्यात आपलेपणाचा अभाव जाणवतो तसेच या नात्यात काही प्रमाणात संघर्ष असल्याचंही दिसून आलं आहे. जर आपण परस्पर व्यापारी संबंधांवर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की दोन्ही देशांत होणाऱ्या व्यापाराची अंदाजे उलाढाल ही 15-17 अब्ज डॉलर इतकी आहे.

भारताचे युरोपियन युनियनशी असलेले व्यापारी संबंध मजबूत आहेत. अशात ब्रिटनशी वेगळा वाणिज्य करार केल्यास भारताला फार काही फायदा होणार नाही.

लेबर पार्टीचे खासदार वीरेंद्र शर्मा सांगतात की "भारतीय वंशाचे लोक हे ब्रिटन आणि भारतासाठी सेतूचं काम करू शकतील. भारत ही मोठी बाजारपेठ आहे. भारतातील अंदाजे 900 कंपन्यांनी युरोपमध्ये गुंतवणूक केलेली आहे."

जालियानवाला बाग प्रकरणात माफी मागणार का?

केवळ व्यापारी संबंध, नोकऱ्या आणि व्यापाराच्या संधीच्या आधारावर दोन्ही देशाचे संबंध निकट होतील असं अनेकांना वाटत नाही. लंडनमध्ये असलेल्या एका हॉटेलचे मालक सुरजीत सिंह यांना वाटतं की "जालियांवाला बाग प्रकरणाबद्दल जर बोरिस जॉन्सन यांनी औपचारिकरीत्या माफी मागितली तर दोन्ही देशातील संबंधांना नवसंजीवनी मिळू शकते."

बोरिस जॉन्सन, युके, ब्रेक्झिट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बोरिस जॉन्सन आणि नरेंद्र मोदी

जालियांवाला प्रकरणाबद्दल आम्ही माफी मागूत अशी भूमिका लेबर पार्टीने निवडणुकीपूर्वी घेतली होती. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी वंशाच्या लोकांना वाटतं की बोरिस जॉन्सन हे भारताशी चांगले संबंध स्थापित करण्यावर जोर देतील. बीबीसीचे साजिद इकबाल सांगतात की "बोरिस जॉन्सन आणि पंतप्रधान मोदी यांच्या मैत्रीमुळे भारत आणि ब्रिटनच्या संबंधांना एक वेगळी उंची प्राप्त होऊ शकते."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)