UK Elections: काश्मिरचा मुद्दा ब्रिटनच्या निवडणुकीत का गाजतोय?

- Author, झुबैर अहमद
- Role, बीबीसी प्रतिनिधी, ब्रॅडफर्डहून
उत्तर ब्रिटनमधल्या ब्रॅडफर्ड शहरात वावरताना काश्मीरचा उल्लेख झाला नाही तर बोलणं-संभाषण अर्धवट राहू शकतं. मंदिर असो वा मशीद, कोणाचं घर असो की ऑफिस, निवडणूक प्रचार काश्मीरच्या संदर्भाविना पूर्ण होऊ शकत नाही.
भारतापासून 6500 किलोमीटर दूर ब्रिटनमध्ये होत असलेल्या निवडणुकात काश्मीर हा चर्चेचा मुद्दा आहे.
केंद्र सरकारने 5 ऑगस्टला जम्मू काश्मीर राज्याला लागू असलेलं घटनेचं 370 कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने या भागाचं विभाजन दोन केंद्रशासित प्रदेशात केलं.
या निर्णयाचे पडसाद ब्रॅडफर्डमध्ये पाहायला मिळतात. इथं राहणाऱ्या भारतीय आणि पाकिस्तानच्या नागरिकांसाठी हा एक मोठा मुद्दा आहे. भारत आणि पाकिस्तानी नागरिकांमध्ये द्वेषाची जणू भिंतच निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयाने भारतीयांना आनंद झाला आहे मात्र पाकिस्तानचे नागरिक या निर्णयाने नाराज आहेत.
ब्रिटनमधील राजकीय पक्षांनी काश्मीरप्रश्नी भूमिका मांडली असली तरी या संदर्भातील प्रत्येक गोष्ट ते अगदी सावधपणे करत आहेत.
दक्षिण आशियाई नागरिकांची मतं निर्णायक असणाऱ्या 48 जागांच्या निकालावरती काश्मीरचा मुद्दा परिणाम करू शकतो.
धर्माच्या आधारे विभाजन?
ब्रिटनमध्ये 12 डिसेंबरला निवडणुका होणार आहेत. ब्रॅडफर्डच्या लोकसंख्येपैकी 43 टक्के नागरिक दक्षिण आशियाई वंशाचे आहेत.
पाकिस्तानातील मीरपूर इथून आलेल्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. इथल्या उमेदवारांची पार्श्वभूमीही तशीच आहे. पक्षांच्या काश्मीरसंदर्भातील मतानुसार कोणाला मत द्यायचं हे ठरवू असं या मतदारांचं म्हणणं आहे.
दूरवरच्या काश्मीरचा मुद्दा ब्रिटनसाठी एवढा कळीचा का? या संदर्भात आम्ही लोकांशी चर्चा केली.

एका भारतीय कंपनीचे व्यवस्थापक संचालक रशपाल सिंग सांगतात, की ब्रॅडफर्डमध्ये दक्षिण आशियाई वंशाच्या लोकसंख्येचं प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे कळत-नकळतरीत्या काश्मीर निर्णायक झालं आहे.
निवडणुकीत तरुणांसाठी बेरोजगारी, गरिबी आणि महिलांसोबत होणारा भेदभाव हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. दक्षिण आशियाई वंशाच्या लोकांसाठी काश्मीरचा मुद्दा जिव्हाळ्याचा आहे.
सध्या ब्रॅडफर्डमध्ये स्थायिक झालेल्या मात्र मूळ पाकिस्तानी असलेल्या व्यापारी कुटुंबाला आम्ही भेटलो. अनेक वर्षांपूर्वी त्यांचे पूर्वज मीरपूरहून ब्रिटनला स्थलांतरित झाले. मात्र आजही काश्मीर त्यांना जवळचा प्रश्न वाटतो.
मसूद सादिक, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी रुकसाना सादिक आणि कॉलेजात शिकणारी त्यांची मुलगी हाना सादिक हे तिघेही काश्मीरच्या मुद्यावरून भारतावर नाराज आहेत.
आताच्या घडीला इथले दोन खासदार काश्मीरी आहेत. काश्मीरच्या लोकांची संख्या भरपूर आहे. उमेदवारांना आपल्या मतदारांच्या भावना समजून घेणं आवश्यक आहे. ज्याला मत देणार त्याने संसदेत काश्मीरचा मुद्दा मांडावा असं मतदारांना वाटत असल्याचं मसूद सादिक यांनी सांगितलं.

रुकसाना सांगतात, ''आम्ही एकमेकांना सहन करतो. भारत-पाकिस्तान देशांच्या नागरिकांदरम्यानची भिंत आम्ही कधी भेदली नाही. आम्ही अंतर राखून असतो''.
कॉलेजात जाणारी हाना 16 वर्षांची आहे. ती मतदार नसली तरी या विषयावर तिची मतं ठाम आहेत.
हिंदू आणि मुसलमान यांच्यात वादविवाद सुरूच असतात. मतभेदाचं कारण केवळ धर्म नाही. परंतु धर्माची भूमिका निश्चितच महत्त्वाची आहे.
भारतीयांची भूमिका काय आहे?
ब्रॅडफर्डमधील हिंदूधर्मीयांसाठी काश्मीर महत्त्वाचं आहे. ब्रॅडफर्डमधल्या एका मंदिरात दुपारी 12 वाजता आरती सुरू होते. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असतो.
आरती पहिल्या मजल्यावर होते. मंदिराचं कार्यालय आणि प्रसादगृह तळमजल्यावर आहे. राकेश शर्मा मंदिर समितीचे प्रमुख आहेत.
1974 मध्ये दिल्लीहून ते इथं आले आहेत. त्यांच्या शहरात निवडणुकांमध्ये काश्मीर महत्वाचा मुद्दा असेल, असं ते सांगतात.
इथले बहुतांश खासदार पाकिस्तानी वंशाचे आणि लेबर पक्षाचे आहेत. भारताने जम्मू-काश्मीर राज्याला लागू असलेलं कलम 370 रद्द करणं नियमबाह्य असल्याचं त्यांना वाटतं. भारतीयांच्या मते लेबर पक्ष मुसलमानांच्या बाजूचा आहे आणि ते भारतीयांचा विचार करत नाहीत.

लेबर पक्षाने काश्मीरप्रश्नी मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा प्रस्ताव पारित केला होता. यानंतर पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात काश्मीरप्रश्नी अधिक हस्तक्षेप करण्याचं धोरण अवलंबलं होतं.
या धोरणामुळे लेबर पक्ष भारतीयांपासून दूर गेला आहे.
मुकेश चावला पंजाबहून 52 वर्षांपूर्वी इथे आले. मात्र भारताशी असलेली त्यांची नाळ आजही घट्ट आहे. त्यांनी सांगितलं, ''विरोधी पक्षाचे नेते आणि लेबर पक्षाचे खासदार जेरेमी कॉर्बिन यांनी कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचा विरोध केला होता. यामुळे भारतीयांनी सत्ताधारी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला समर्थन द्यायला सुरुवात केली. दुसरीकडे कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते बोरिस जॉन्सन यांनी काश्मीर हा भारत-पाकिस्तान यांचा अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हटलं होतं. आम्ही यात हस्तक्षेप करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. म्हणूनच आम्ही त्यांचे समर्थक झाले आहोत."
काश्मीरचा मुद्दा ब्रिटनमध्ये नको?
काश्मीरचा मुद्दा ब्रिटनमधल्या निवडणुकांमध्ये असायला नको, असं भारतीय वंशाच्या लोकांना वाटतं.
पूर्वा खंडेलवाल काही वर्षांपूर्वीच ब्रॅडफर्ड इथं आल्या आहेत. इथल्या निवडणुकांमध्ये काश्मीरचा मुद्दा उमटू नये, असं त्यांना वाटतं.
माझ्या मते काश्मीर हा भारत-पाकिस्तान यांचा अंतर्गत मुद्दा आहे. ब्रिटनने याप्रकरणी हस्तक्षेप करायला नको.

दक्षिण आशियाई वंशाची माणसं काश्मीरप्रश्नी पक्षांचं धोरण काय यानुसार मतदान करतील हे त्यांना ठाऊक आहे मात्र निवडणुकांनंतर मतदार हा मुद्दा विसरुन जातील असंही त्यांना वाटतं.
मसूद सादिक यांनी म्हटल्याप्रमाणे राजकीय पक्ष काही विशेष करू शकत नाही. भारताची अर्थव्यवस्था आणि इथली मोठी बाजारपेठ लक्षात घेता काश्मीरप्रश्नी भारतावर दबाव टाकणं कठीण आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








