डोपिंगप्रकरणी रशियावर 4 वर्षांची बंदी, टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळता येणार नाही

रशिया, डोपिंग, पुतिन, वाडा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्लादिमीर पुतिन

सरकारपुरस्कृत डोपिंग प्रकरणामुळे जागतिक उत्तेजकविरोधी संघटना अर्थात वाडाने रशियाच्या ऑलिम्पिक सहभागावर चार वर्षांची बंदी घातली आहे.

या बंदीमुळे पुढील वर्षी जपानची राजधानी टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत रशियाच्या खेळाडूंना रशियाच्या ध्वजांतर्गत सहभागी होता येणार नाही. त्यांनी निर्दोषत्व सिद्ध केलं तरच त्यांना तटस्थ खेळाडू म्हणून खेळायला मान्यता मिळेल.

या बंदीमुळे रशियाच्या खेळाडूंना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही सहभागी होता येणार नाही. वाडाच्या कार्यकारी समितीने यासंदर्भात घोषणा केली. रशियावर बंदी घालण्याचा निर्णय समितीच्या सदस्यांनी एकमताने घेतल्याचं वाडाच्या प्रवक्त्याने सांगितलं.

रशिया, डोपिंग, पुतिन, वाडा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रशियावर बंदी

2014 मध्ये रशियातील सोची इथे हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती. त्यावेळीच सरकारपुरस्कृत डोपिंगची तक्रार व्हिसल ब्लोअर्सनी केली होती. रशिया सरकारने सोची ऑलिम्पिककरता 500 कोटी रुपयांचा निधी खर्च केला होता. मात्र, स्पर्धेदरम्यान रशियन उत्तेजकविरोधी संघटना रुसादाकडून उत्तेजकांसंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवरील नियमांचं पालन होत नसल्याचं वाडाने जाहीर केलं होतं.

आमचे क्रीडापटू निर्दोष असून कामगिरी उंचावण्यासाठी ते उत्तेजकांचे सेवन करत नाहीत, असा दावा रशियातर्फे करण्यात आला आहे. या दरम्यान रुसादाचे तत्कालीन प्रमुख ग्रिगोरी रॉदचेन्को अमेरिकेला रवाना झाले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ग्रिगोरी यांचं मानसिक संतुलन ढळलं आहे, असा आरोप केला. रुसादाच्या प्रयोगशाळा बंद करण्यात आल्या आणि रासायनिक नमुने जप्त करण्यात आले.

रशिया, डोपिंग, पुतिन, वाडा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रशियावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

युरी गानुस यांच्या नेतृत्वाखाली रुसादाने नव्याने काम सुरू केलं. वाडाने गेल्या वर्षी रुसादाला मान्यता दिली. मात्र याकरता त्यांना एका अटीचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले. रुसादाने सर्व जुने दस्ताऐवज आणि नमुने वाडाला पुरवावेत अशी ही अट होती. रुसादाने वाडाला हा तपशील सादर केला. मात्र गेल्या दोन वर्षात या कागदपत्रांमध्ये, नमुन्यांमध्ये फेरफार झाल्याचं वाडाच्या लक्षात आलं.

सरकारपुरस्कृत डोपिंग होत असल्याचे पुरावे पद्धतशीरपणे नष्ट करण्यात आल्याचं उघड झालं. गानुस यांनी खरी माहिती देण्याविषयी आग्रह धरला होता. मात्र, पुरावे नष्ट करण्याच्या प्रकारामुळे ते तोंडघशी पडले. रशियन सरकारने हा बदनामी करण्याचा व्यापक कट असल्याचं म्हटलं होतं.

बंदीच्या निर्णयामुळे रशियाच्या खेळाडूंना पुढील वर्षी टोकियो इथं होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत तसंच कतारमध्ये 2022 मध्ये होणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये सहभागी होता येणार नाही.

बंदीच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी रशियाला 21 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. रशियाने अपील केल्यास, हे प्रकरण आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे म्हणजेच कॅसकडे वर्ग करण्यात येईल.

''रशियातील डोपिंग प्रकरणामुळे खेळभावनेला बट्टा लागत होता. रशियाच्या सरकारने रुसादाच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याने याप्रकरणी कठोर कारवाईची आवश्यकता होती. रशियाला आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसी संधी देण्यात आली होती. क्रीडा क्षेत्रात, जगभरातील देश उत्तेजकविरोधी मोहिमेचा भाग आहेत. रशियाला या मोहिमेशी संलग्न होता येऊ शकतं'', असं वाडाचे अध्यक्ष सर क्रेग रीडी यांनी सांगितलं.

2014 सोची हिवाळी ऑलिम्पिकनंतर वाडाने रशियावर बंदी घातली होती. गेल्या वर्षी प्योनचांग इथं झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये रशियाचे 168 खेळाडू स्वतंत्र खेळाडू म्हणून सहभागी झाले होते. या खेळाडूंपैकी 33जणांनी पदकावर नाव कोरलं.

अथलेटिक्स या खेळात 2015 पासून रशियाच्या खेळाडूंवर सरसकट बंदी घालण्यात आली होती.

बंदीच्या निर्णयानंतरही रशियाला युरो 2020 स्पर्धेत सहभागी होता येईल. युरोपियन फुटबॉलचं नियंत्रण करणाऱ्या युएफाला प्रमुख क्रीडा स्पर्धांचे आयोजक म्हणून गृहित धरण्यात आलेलं नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)