खालच्या पातळीवरील टीकेमुळे महिला खासदारांवर राजकारण सोडण्याची वेळ

फोटो स्रोत, Getty Images
ब्रिटनमध्ये महिला खासदारांवर असभ्यपणे टीका करण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशाप्रकारच्या टीकेमधून सावरणं महाकठीण असतं, असं काही महिला नेत्यांचं म्हणणं आहे.
'अ हिस्टरी ऑफ विमेन इन पार्लमेंट' पुस्तकाच्या लेखिका आणि लेबर पार्टीच्या खासदार रेचल रिव्ह्स यांनी म्हटलं आहे, की पहिल्या महिला खासदार नॅन्सी एस्टर यांनी अथक परिश्रमांनंतर पुरुष खासदारांमध्ये स्वतःची जागा तयार केली होती.
मात्र अलीकडे महिला खासदारांना बलात्कार आणि हत्येच्या धमक्या सातत्यानं दिल्या जातात. या पार्श्वभूमीवर 50 पेक्षा जास्त खासदारांनी 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सहभागी होणार नसल्याचं म्हटलं आहे.
आपल्यावर होणाऱ्या घाणेरड्या टीकेमुळे हा निर्णय घेतल्याचं यापैकी काही महिला खासदारांनी सांगितलं आहे.
युकेच्या सांस्कृतिक मंत्री निक्की मॉर्गन यांनासुद्धा अनेक धमक्या मिळाल्या. 64 वर्षांच्या रॉबर्ट विडलरनी त्यांना फोनवरुन धमकी देताना म्हटलं होतं, की तुझे दिवस मोजायला लाग. रॉबर्ट विडलरना 18 महिन्यांसाठी तुरुंगात जावं लागलं आहे.
निक्की सांगतात, की खासदार असण्याचा त्यांच्या कौटुंबिक आयुष्यावरही थेट परिणाम होतो. गेल्या दशकभरात लोकांच्या टीकांचं स्वरूप पूर्ण बदललं आहे. सध्या ब्रेक्झिटवर वादविवाद सुरू आहेत आणि बऱ्याच लोकांना याबद्दल मतं द्यायची आहेत.
लिबरल डेमोक्रॅट आणि माजी टोरी खासदार हेडी एलन यांनासुद्धा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या धमकीमुळे त्यांनी निवडणुका न लढवण्याचा विचार केला आहे. एका 51 वर्षांच्या व्यक्तीनं त्यांना बनावट ईमेलवरून ब्रेक्झिट विषयाशी संबंधित मेल पाठवला होता. या व्यक्तीलाही 42 आठवड्यांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे.
एलन यांनी आपल्या मतदार संघातील लोकांना एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, "कुणालाही कुठल्याही नोकरीत धमक्या, घाबरवणारे ईमेल, सोशल मीडियावर घाणेरड्या टीका यांना सामोरं जायला लागू नये. लोकांना स्वतःच्या घरी पॅनिक अलार्म लावायला लागू नये. सार्वजनिक मुद्द्यांवर लोकांची मतं नक्कीच असू शकतात. पण लोकं आपली मर्यादा पार करतात. या वागण्याचा परिणाम फार भयंकर असतो, कधी कधी तर अमानवी असतो."
या लोकांना पराभूत करा
जे नेते ब्रिटननं युरोपीय महासंघातच राहावं, बाहेर पडू नये अशी भूमिका घेतात त्यांनांच अशा प्रकारच्या धमक्या मिळत आहेत, असं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
ब्रेक्झिटच्या समर्थक अँड्रिया जेनकिन्स यांनाही अभद्र टीका सहन करावी लागली आहे. ईमेलवरून धमक्यांबरोबरच त्यांच्या मतदारसंघातील कार्यालयात आत्महत्येचे एक सूचक चित्रही काढण्यात आले होते.
"मी अत्यंत व्यक्तिगत टीका सहन केल्या आहेत. मी चांगली आई नसल्याचंही मला ऐकवण्यात आलं," असं जेनकिन्स यांनी सांगितलं. तरीही त्या बधल्या नाहीत. डिसेंबरमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्या लढणार आहेत.
"मी माझं काम करण्यासाठी इथे आली आहे. माझ्या मतदारसंघातल्या लोकांचं प्रतिनिधित्व मला करायचं आहे. इथल्या स्थानिक समस्या संपवायच्या आहेत. लहान मुलांच्या शोषणाच्या मुद्द्यावरही मी लढत आहे. माझं आवडतं काम करतानाही मी इथल्या लोकांशी कायम जोडलेली असते. मी निवडणुका लढायचं सोडणं म्हणजे माझ्या लोकांना सोडणं असाच त्याचा अर्थ होतो," अँड्रिया सांगत होत्या.
लिबरल डेमोक्रेटिक पक्षाच्या खासदार सारा व्हॉलस्टन यांनी जेव्हा कॉन्झर्व्हेटिव पार्टी सोडली तेव्हा त्यांच्या स्वतःच्याच मतदारसंघात जाहीर सभा आणि प्रचार सभा न घेण्याचा सल्ला पोलिसांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर अँड्रिया जेनकिन्स यांनी रेडिओ फोर केवर एका कार्यक्रमात म्हटलं, की तुम्ही सगळी तुमची कामंधामं सोडून लोकांना अशी उत्तरं देत नाही बसू शकत. तुम्हाला तुमचं काम करत राहिलं पाहिजे आणि त्याचवेळेला अशा लोकांना धडा शिकवता आला पाहिजे.

फोटो स्रोत, Getty Images
अॅमनेस्टी इंटरनॅशनलच्या एका अभ्यासानुसार महिला खासदारांवर झालेल्या घाणेरड्या टीकांपैकी सर्वांत जास्त टीका शॅडोच्या होम सेक्रेटरी डिएन एबर्ट यांच्यावर झाल्या आहेत. यापैकी 50 टक्के टीका ट्वीटवरून करण्यात आली आहे. परंतु अशा घटनांनंतरही त्या येत्या निवडणुकीमध्ये आपल्या पार्टीचा मुख्य आवाज बनून लढणार आहेत.
आकडेवारी काय सांगते?
2019 सालच्या निवडणुकांआधी 57 खासदारांनी निवडणुका लढणार नसल्याचं म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या निवडणुकांपेक्षा ही आकडेवारी कमी आहे. यापूर्वी 2010 साली 149 खासदारांनी आणि 1997 साली 117 खासदारांनी निवडणुका न लढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यावर्षी असा निर्णय घेणाऱ्यांमध्ये महिला खासदारांची संख्या जास्त आहे.
टोरी पक्षाचे अध्यक्ष जेम्स क्लेवर्ली यांनी एकं ट्वीट रीट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, की 32 टक्के महिला खासदार निवडणुका लढणार आहेत. 18 महिलांनी निवडणुका न लढण्याचा निर्णय घेतला आहे. ही आकडेवारी तशी ठीक आहे.
ब्रिटनच्या 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये पुरुष खासदारांचं कामाचं सरासरी वय 63 वर्षे आहे तर महिलांचं वय 59 आहे.
आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेणाऱ्यांपैकी एकूण 89 टक्के खासदारांनी ब्रेक्झिटविरोधात मतं दिली होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








