स्पेन: पीडितेला बेशुद्ध करून सामूहिक बलात्कार करणाऱ्यांची निर्दोष सुटका

फोटो स्रोत, Getty Images
स्पेनमध्ये बार्सिलोना कोर्टाने अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार खटल्यातल्या 5 आरोपींची लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून निर्दोष सुटका केली. त्यानंतर स्पेनमध्ये मोठा जनक्षोभ उसळला.
घटनेवेळी मुलगी बेशुद्धावस्थेत असल्याने आरोपींनी हिंसाचार केला नाही किंवा तिला धमकावलं नाही. त्यामुळं बलात्कार झाला नाही, असा निर्वाळा कोर्टाने दिला आहे.
स्पेनमध्ये कायद्यानुसार हिंसाचार किंवा बळाचा वापर केला तरच त्या कृत्याला लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार मानलं जातं.
या पाचही दोषींना लैंगिक अत्याचारापेक्षा कमी गंभीर मानल्या गेलेल्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्याखाली शिक्षा सुनावण्यात आली आहे.
कोर्टाने सर्व दोषींना 10 ते 12 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तर लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात 15 ते 20 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.
स्पेनमध्ये बलात्काराची व्याख्या बदलण्यावर खल सुरू आहे. शरीरसंबंध ठेवण्यास स्त्रिची स्पष्ट संमती हाच बलात्काराच्या प्रकरणांचा आधार मानला जावा का, याची समीक्षा सुरू आहे.
युरोपातल्या अनेक देशांनी गेल्या काही वर्षात बलात्कारविषयक कायद्यात बदल केले आहेत. यात संमतीशिवाय ठेवलेले शरीरसंबंध म्हणजे बलात्कार मानण्यात आला आहे. गेल्यावर्षी स्विडनने कायदा बदलला. तर डेन्मार्कमध्येही ही प्रक्रिया सुरू आहे.
अशाच एका खटल्यात स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने लैंगिक शोषणाचं कलम बाद करून त्याहून गंभीर अशा लैंगिक अत्याचाराचं कलम लावत आरोपींना शिक्षा सुनावली होती. तरीदेखील बार्सिलोना कोर्टाने हा निर्णय दिल्याने लोकांमध्ये संतापाची भावना आहे.
निकालावर उमटल्या तीव्र प्रतिक्रिया
बार्सिलोनाचे महापौर अॅदा कोलाऊ यांनी हा 'संताप आणणारा निकाल' असल्याची प्रतिक्रिया ट्वीटरवर दिली आहे.
ते लिहितात, "मी काही न्यायाधीश नाही आणि त्यांना किती वर्षांची शिक्षा व्हायला हवी, हेदेखील मला माहिती नाही. मात्र, एक गोष्ट माहिती आहे आणि ती म्हणजे हे लैंगिक शोषण नाही तर हा बलात्कार आहे."
सूचना : या बातमीतला तपशील काही वाचकांना विचलित करू शकतो.
महिला अधिकार कार्यकर्त्यांनीही अशाच प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. #JusticiaPatriarcal म्हणजे 'पुरूषसत्ताक निकाल' आणि #NoEsAbusoEsViolacino म्हणजे 'शोषण नव्हे तर बलात्कार', अशा प्रकारचे हॅशटॅश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मॅनरेसा फेमिनिस्ट स्ट्राईक कमिटीच्या प्रवक्त्या लिला कोरोमिनास यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत 'या प्रकरणात सरळ सरळ लैंगिक अत्याचार आणि बळाचा वापर झाल्याचं स्पष्ट दिसत आहे', असं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मास पाइस या राजकीय पक्षाचे नेते इनिओ इरेहॉन यांनीदेखील ही 'लाजीरवाणी' शिक्षा असल्याचं म्हटलं आहे. तर युनिदास पॉडेमॉस या राजकीय आघाडीच्या प्रवक्त्या इरेने मोंटेरो यांनी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. कायद्यात सुधारणा झाल्यास 'आम्ही एका स्त्रीवादी देशाचे नागरिक आहोत, असं आम्ही अभिमानाने सांगू शकू', असं त्यांनी म्हटलं आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी मॅनरेसा शहरात कोर्टाच्या निकालाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्रकरण नेमकं काय आहे?
स्पेनच्या ईशान्येकडच्या कॅटालोनिया प्रांतातल्या मॅनरेसा शहरात ऑक्टोबर 2016 मध्ये एका ओपन एअर ड्रिंक पार्टीत 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचं पाच जणांनी लैंगिक शोषण केलं. या प्रकरणी पाचही आरोपींना दोषी ठरवण्यात आलं.
या पाचपैकी दोघे स्पेनचे, दोघे क्युबाचे तर एक अर्जेंटिनाचा नागरिक होता. या पाचही जणांनी मद्याच्या आणि अंमली पदार्थ्यांच्या नशेत असलेल्या मुलीवर एकापाठोपाठ एक बलात्कार केल्याचं फिर्यादीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं.
यातला एक आरोपी आहे ब्रायन अॅन्ड्रेस एम. तो प्रत्येकाला "यानंतर तुझी पाळी आहे. प्रत्येकाला 15 मिनिटं आहेत, त्याहून जास्त नाही", असं सांगत होता, अशी माहितीही वकिलांनी दिली.
काय घडलं, हे धुसर आठवत असल्याचं आणि एक आरोपी त्याच्याकडची बंदूक दाखवत होता, अशी साक्ष पीडित मुलीने दिली होती.
आरोपींनी सर्व आरोप फेटाळले असले तरी पाचपैकी एका आरोपीचे डीएनए मुलीच्या अंतर्वस्त्रावर सापडले होते.
निकाल देताना कोर्टाने म्हटलं, "आपण काय करतोय आणि काय नाही, याची कल्पना मुलीला नव्हती. परिणामी शरीर संबंधांना सहमती देण्याची किंवा विरोध करण्याची क्षमता तिच्यात नव्हती."
निकालात पुढे असंही म्हटलं आहे की आरोपी "कुठल्याही प्रकारचा बळाचा वापर किंवा धाकदपटशाही न करता शरीर संबंध ठेवू शकत होते."
हा 'अत्यंत गंभीर आणि अपमानित' करणारा हल्ला असल्याचं म्हणत कोर्टाने पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून 12,000 युरो देण्याचे आदेश दिले.
फिर्यादींनी अगदी शेवटच्या क्षणी 'लैंगिक अत्याचाराचा आरोप बदलून 'लैंगिक शोषणाचा' आरोप केल्याबद्दल न्यायाधीशांनी आश्चर्य व्यक्त केलं.
मूळ 'Wolf Pack' खटला
स्पेनच्या नॅव्हेरा प्रांतातल्या पॅम्पलोना शहरात बलात्काराची अशीच एक घटना घडली होती. तो खटला 'wolf pack' (लांडगे) म्हणून गाजला होता. या वुल्फ पॅक खटल्याने स्पेनमध्ये स्त्रीवादी क्रांतीची ठिणगी पडली होती. त्यावरूनच मॅनरेसा शहरातल्या या खटल्याला 'Manressa Wolf Pack' (मॅनरेसाचे लांडगे) म्हणून संबोधलं जात आहे.
पॅंपलोना शहरात जुलै 2016 मध्ये 18 वर्षांच्या मुलीवर इमारतीच्या कॉरिडोरमध्ये लैंगिक गैरवर्तन करण्यात आलं होतं. या प्रकरणी नॅव्हेरा प्रांताच्या कोर्टाने पाच आरोपींना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
ही मुलगी 'निष्क्रीय' होती. म्हणजेच तिने कसलाच विरोध केला नाही, असं पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटलं होतं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा बळाचा वापर झाला नाही, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं होतं.
मात्र, हा लैंगिक अत्याचारच होता आणि आरोपी बलात्कारी आहेत, असं म्हणत स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने खालच्या कोर्टाने दिलेला निकाल बदलला.
त्यामुळे सर्वच्या सर्व आरोपींना झालेली 9 वर्षांची शिक्षा रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 15 वर्षांची शिक्षा सुनावली.
यानंतर स्पेनच्या पंतप्रधानांनी गेल्यावर्षी बलात्काराच्या कायद्याची फेरसमिक्षा करण्यासाठी एक समिती स्थापन केली.
मॅनरेसा शहरातल्या घटनेवर कोर्टाने दिलेल्या निकालाचे तीव्र पडसाद संपूर्ण स्पेनमध्ये उमटत आहेत. वुल्फ पॅक खटल्यात जसा न्याय मिळाला, तसा न्याय या खटल्यातही मिळावा आणि बलात्कारविषयक कायद्याची व्याख्या बदलावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








