नोबेल शांतता पुरस्कार इथिओपियाचे पंतप्रधान अॅबी अहमद यांना जाहीर

नोबोल

फोटो स्रोत, Twitter

(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)

इथिओपियाचे पंतप्रधान अॅबी अहमद यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एरिट्रियाबरोबर केलेल्या शांती करारासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

त्यांच्या पुढाकारामुळे गेल्यावर्षी एरिट्रियासोबत झालेल्या शांतताकरारामुळे 20 वर्षांपासूनचा लष्करी तिढा सुटला आहे. १९९८ ते २००० दरम्यान झालेल्या सीमायुद्धापासून या तिढ्याला सुरुवात झाली होती.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

शांततेच्या नोबेल पुरस्कारांचं हे १०० वं वर्षं असून ओस्लोमध्ये याची घोषणा करण्यात आली.

याच शांतता पुरस्कारासाठी तरूण पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्गच्या नावाचीही शिफारस करण्यात आल्याची चर्चा होती.

अत्यंत प्रतिष्ठेच्या या पुरस्कारासाठी यावर्षी एकूण ३०१ नावं सुचवण्यात आली होती. यामध्ये २२३ व्यक्ती आणि ७८ संस्थांचा समावेश होता.

नोबेलच्या शिफारसीसाठीच्या नियमांनुसार शिफारस करण्यात आलेल्या व्यक्तींच्या नावांची यादी पुढची ५० वर्षं प्रसिद्ध केली जात नाही.

व्हीडिओ कॅप्शन, नोबेल पुरस्कारांबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

कोण आहेत अॅबी अहमद?

43 वर्षांचे अॅबी अहमद हे एप्रिल २००८मध्ये इथिओपियाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांनी देशात मोठ्या प्रमाणावर उदारीकरण केलं. तोपर्यंत इथिओपियामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्बंध होते.

तुरुंगामध्ये डांबून ठेवण्यात आलेल्या हजारो विरोधकांची - कार्यकर्त्यांची त्यांनी मुक्तता केली आणि हद्दपार करण्यात आलेल्यांना घरी परतण्याची परवानगीही दिली.

सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे इथिओपियाचा शेजारी देश असणाऱ्या एरिट्रियासोबत शांतता करार करत त्यांनी दोन दशकांचा संघर्ष संपुष्टात आणला.

नोबेल शांतता पुरस्कार महत्त्वाचा का?

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रातल्या कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतात.

आधीच्या १२ महिन्यांमध्ये ज्यांनी मानवजातीसाठी अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे, अशांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात येतो.

"Who have conferred the greatest benefit to humankind" हे वाक्य आहे प्रसिद्ध स्वीडिश उद्योगपती आणि डायनामाईटचा शोध लावणाऱ्या आफ्रेड नोबेल यांचं. त्यांनी त्यांची बहुतेक संपत्ती हे पुरस्कार देण्यासाठी दान केली आहे.

१९०१ मध्ये पहिल्यांदा नोबेल पुरस्कार देण्यात आले.

या पुरस्कारांमध्ये स्वीडनच्या सेंट्रल बँकेने १९६८मध्ये अर्थशास्त्राच्या पुरस्काराची भर टाकली. पण याला नोबेल पुरस्कार म्हटलं जात नाही.

याआधीचे प्रसिद्ध विजेते

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना २००९मध्ये शांततेसाठीचं नोबेल देण्यात आलं. "आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यासाठी आणि लोकांमधील सहकार्य भावना वाढवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल" त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

आपल्यासाठी हा एक सुखद धक्का असून याबद्दल आपण कृतज्ञ असल्याचं ओबामांनी म्हटलं होतं. पण त्यांना पुरस्कार देण्यात आल्याबद्दल टीकाही झाली होती. कारण हा पुरस्कार जाहीर होण्याआधी केवळ १२ दिवसांपूर्वी त्यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली होती.

यासोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर (२००२), मुलींच्या शिक्षणासाठी चळवळ उभारणारी कार्यकर्ती मलाला युसुफजाई (संयुक्तपणे २०१४मध्ये), युरोपियन युनियन (२०१२), युनायटेड नेशन्स आणि त्यांचे सरचिटणीस कोफी अन्नान (२००१मध्ये संयुक्तपणे) आणि मदर टेरेसा (१९७९) यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

तर अल्बर्ट आईनस्टाईन (१९२१ भौतिकशास्त्र), मारी क्युरी (१९०३ भौतिकशास्त्र आणि १९११ रसायनशास्त्र), हॅरल्ड पिंटर (साहित्य २००५) यांनाही नोबेल पुरस्कार मिळाला होता.

लेखक आणि विचारवंत जीन - पॉल सार्त्र यांनी १९६४मध्ये हा पुरस्कार नाकारला होता.

तर व्हिएतनामचे राजकारणी ल ड्युक थो यांनी १९७३मध्ये पुरस्कार नाकारला.

तर इतर चार जणांवर त्यांच्या देशांनी हा पुरस्कार नाकारण्याची जबरदस्ती केली. २०१६मध्ये साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार गायक बॉब डिलन यांना देण्यात आला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)