उईगर मुस्लीम नागरिकांना 'डांबून ठेवल्यावरून' अमेरिकेची चिनी अधिकाऱ्यांवर व्हिसाबंदी

मुस्लिमांवरील दडपशाहीत सहभाग असल्याप्रकरणी चिनी अधिकाऱ्यांचे व्हिसा रोखण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे.

अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयानं सोमवारी 7 ऑक्टोबररोजी 28 चिनी संस्थांना काळ्या यादीत टाकलंय. त्यानंतर आता व्हिसाबंदीचा निर्णय घेतलाय.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पाँपेओ यांनी ट्वीट करून सांगितलं की, "चीनने शिनजियांगमध्ये धर्म आणि संस्कृती मिटवण्यासाठी 10 लाखांहून अदिक मुस्लिमांना निर्दयी आणि पद्धतशीर मोहिमेद्वारे ताब्यात घेतलंय. पाळत ठेवलेल्या आणि अटक केलेल्या सर्वांना चीननं सोडलं पाहिजे."

तसेच, "शिनजियांगमधील उईगर, कझाक आणि इतर मुस्लीम अल्पसंख्याकांना डांबून ठेवण्यास जबाबदार असणाऱ्या कम्युनिस्ट पार्टीच्या चीन सरकारमधील अधिकाऱ्यांना व्हिसाबंदीची घोषणा करतो," अशी माहिती पाँपेओ यांनी ट्वीटद्वारे दिलीय.

चीननं अमेरिकेचे हे आरोप निराधार असल्याचं सांगत फेटाळले आहेत. शिवाय, व्हिसाबंदीच्या निर्णयाचाही निषेध केलाय.

"अमेरिकेनं दावा केल्याप्रमाणं इथं कुठलेही 'मानवाधिकारचे प्रश्न' निर्माण झाले नाहीत," असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटलंय.

"चीनच्या अंतर्गत कामात मुद्दाम हस्तक्षेप करण्यासाठी अमेरिकेचं एक निमित्त, यापेक्षा या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही," असंही शुआंग म्हणाले.

चीन सरकार आणि कम्युनिस्ट पार्टीच्या अधिकाऱ्यांसह त्यांच्या नातेवाईकांनाही अमेरिकेची 'व्हिसाबंदी' लागू असेल.

अमेरिका आणि चीनमध्ये सध्या व्यापारयुद्धात अडकले आहेत. पुढच्याच आठवड्यात चीनमधून वॉशिंग्टनमध्ये एक शिष्टमंडळ पाठवण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षात चिनी सरकार शिनजियांग प्रांतात मोठं सुरक्षा अभियान राबवत आहे.

मानवाधिकार संघटना आणि संयुक्त राष्ट्राचं म्हणणं आहे की, चीननं उईगर मुस्लीम आणि इतर अल्पसंख्यांकांना डिटेन्शन कँपमध्ये डांबून ठेवलं असून, त्यांना इस्लामचा त्याग करण्यास सांगितलं जातंय, मँडेरिन ही चिनी भाषा जबरदस्तीनं बोलण्यास भाग पाडलं जातंय आणि कम्युनिस्ट सरकारच्या आज्ञा पाळण्याल सांगितलं जातंय.

मात्र, चीननं दावा केलाय की, ते व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आहेत. तिथल्या लोकांना नोकऱ्या मिळवून दिल्या जाणार आहेत, तसेच, चिनी समाजात एकरूप होण्यासाठी मदत केली जात आहे, जेणेकरून दहशतवाद रोखला जाईल.

उईगर हे मूळचे तुर्किक वंशाचे आहेत. शिनजियांग प्रांतात 45 टक्के लोकसंख्या उईगर मुस्लिमांची आहे, तर 40 टक्के हान चिनी लोकांची आहे. 1949 सालापूर्वी हा भाग तुर्कस्तानच्या अख्त्यारित होता. मात्र, त्यानंतर या भागावर चीननं ताबा मिळवला. शिनजियांग प्रांत आता स्वायत्त प्रांत म्हणून चीनच्या अंतर्गत येतं, जसं दक्षिणकडे तिबेट आहे.

शिनजियांग प्रांतातल्या चीनच्या कारवायांबद्दल अमेरिकेसह जगभरातून टीका केली जातेय.

गेल्या आठवड्यात माईक पाँपेओंनी व्हॅटिकनमधल्या पत्रकार परिषदेत आरोप केला होता की, चीनकडून देवाऐवजी सरकारची पूजा करण्यास सांगितलं जातंय.

याच वर्षी जुलै महिन्यात 20 हून अधिक देशांनी संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत संयुक्त पत्रावर सही करून, उईगर आणि इतर मुस्लिमांना चीन देत असलेल्या वागणुकीचा निषेध केला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)