डोनाल्ड ट्रंप: महाभियोग चौकशीत सहकार्य करण्यास व्हाईट हाऊसचा नकार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावरील महाभियोगाची कारवाई सुरू असताना चौकशीत सहकार्य करणार नाही, असं व्हाईट हाऊसने म्हटलं आहे.

रिपब्लिकन नेते जो बाईडन यांच्याविरुद्ध युक्रेनने काही पुरावे शोधावे, अशी विनंती ट्रंप यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांना केली होती, असा ट्रंप यांच्यावर आरोप आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बाईडेन हे ट्रंप यांचे प्रमुख रिपब्लिकन प्रतिस्पर्धी मानले जात आहेत.

विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वात तीन संसदीय समिती सध्या या आरोपांची चौकशी करत आहे.

व्हाईट हाऊसचे मुख्य वकील पॅट सिपोलोन यांनी आठ पानांचं एक निवेदन जारी केलंय. ट्रंप यांच्याविरुद्धची कारवाई सुरू करणाऱ्या डेमोक्रॅट नेत्या आणि संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तसंच तीन चौकशी समितींचे प्रमुख यांनी केलेले हे आरोप "घटनाबाह्य" आणि "तथ्यहीन" आहेत, असं ते या निवेदनात म्हणाले आहेत.

ही चौकशी सुरू करायची की नाही, यावर कुठलंही मतदान न घेता ही "राज्यघटनेतील निष्पक्षता आणि घटनेने लिहून दिलेली प्रक्रिया बाजूला सारून" महाभियोगासाठी ही कारवाई केली जात आहे, असा मुख्य वकील पॅट सिपोलोन यांचा आरोप आहे. उलट, डेमोक्रॅट पक्षानेच 2016च्या निवडणुकीचा कौल आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला होता, असं या पत्रात म्हटलं आहे.

"अमेरिकेच्या जनतेप्रति आपली कर्तव्यं पार पाडत राहण्यासाठी अध्यक्ष ट्रंप आणि त्यांचं प्रशासन तुमच्या या भेदभाव करणाऱ्या घटनाबाह्य चौकशीला सहकार्य करणार नाही," असं या पत्रात म्हटलं आहे.

हे ऐतिहासिक संकट? बीबीसीचे उत्तर अमेरिका प्रतिनिधी अँथनी झर्कर यांचं विश्लेषण

महाभियोग चौकशीला दोनच आठवडे झालेत नि अमेरिकेवर संवैधानिक संकटाचे ढग दाटून आलेत.

आठ पानांच्या या लांबलचक निवेदनात व्हाईट हाऊसने एकच गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे - कुठलीही विचारपूस नाही, दस्तावेज देणार नाही, कुठलंही सहकार्य करणार नाही.

ट्रंप प्रशासन या कारवाईला "घटनाबाह्य" म्हणत असलं तरी विरोधी पक्ष डेमोक्रॅटचं हेच म्हणणं आहे की घटनेनेच "फक्त आणि फक्त संसदेला ही चौकशी करण्याचे अधिकार दिले आहेत, आणि ते ही चौकशी सुरू ठेवणारच, व्हाईट होऊस सहकार्य करो वा ना करो".

या क्षणाला डेमोक्रॅट्सकडे अनेक पर्याय आहेत. व्हाईट हाऊस सहकार्य करत नाहीय, हा सुद्धा ते महाभियोगाची कारवाई पुढे नेण्यासाठीचा एक मुद्दा बनवू शकतात. किंवा ते व्हाईट हाऊसच्या काही अटी मान्य करून त्यांना सहकार्य करण्यासाठी मनधरणी करू शकतात. किंवा ते कोर्टात जाऊन व्हाईट हाऊसवर सहकार्य करण्याचं बंधन आणू शकतात.

कोर्ट मात्र या राजकीय खडाजंगीपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करेन. तसं झालं तर ट्रंप यांना असं वाटू शकतं की या संसदीय चौकशीचा काहीही निकाल येवो, त्यातून ते सहज सुखरूप बाहेर पडू शकतात.

अमेरिकेच्या इतिहासात राष्ट्राध्यक्षांचे महाभियोग यापूर्वीही झाले आहेत, मात्र अशी स्थिती कधी आली नाही. त्यामुळे मात्र दोन्ही गटांना माहितीय की यातून जोही निर्णय निघेत, त्यावरून आपलं संविधान किती सक्षम आणि कायदा किती मजबूत आहे, हे कळेल.

या सर्व प्रकरणाबाबत चार महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं :

ट्रंप यांची चौकशी का केली जातेय?

डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून, 2020 साली होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतले त्यांचे प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन आणि त्यांच्या मुलाची चौकशी करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणला, असा आरोप एका व्हिसलब्लोअरनं केला आहे.

हे असं करणं बेकायदेशीर आहे?

जर डोनाल्ड ट्रंप यांनी अशाप्रकारचा फोन केल्याचं सिद्ध झालं तर ट्रंप यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढतील. कारण अमेरिकेत निवडणूक जिंकण्यासाठी परदेशी संस्थांकडे मदत मागणं बेकायदेशीर आहे.

आता काय होईल?

डेमोक्रॅट्सचं वर्चस्व असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्सनं जर ट्रंप यांच्या महाभियोगाच्या बाजूनं कौल दिला, तर हे प्रकरण सिनेटमध्ये जाईल.

ट्रंप यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवलं जाईल?

डोनाल्ड ट्रंप यांना दोषी ठरवण्यासाठी सिनेटमध्ये दोन तृतीयांश इतक्या बहुमताची आवश्यकता असेल. मात्र ट्रंप यांचा रिपब्लिकन पक्ष सिनेटमध्ये बहुमतात आहे. त्यामुळं ट्रंप यांना दोषी ठरवणं तसं शक्य दिसत नाही.

दुसरीकडे, मुलर चौकशी समितीनं हे स्पष्ट केलंय की, पदावरील राष्ट्राध्यक्षावर गुन्हेगारी खटला चालवला जाऊ शकत नाही.

ट्रंप-युक्रेन प्रकरण नेमकं काय आहे?

याच वर्षी 25 जुलैला युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातून एक फोन कॉल करण्यात आला. एका व्हिसलब्लोअरने या कॉलविषयीचा सगळा तपशील मागितला होता.

हा व्हिसलब्लोअर एक अमेरिकन अधिकारी होता. त्यांनी दाखल केलेली तक्रार ही 'ताबडतोब दखल घेण्याजोगी' आणि विश्वासार्ह मानली गेली. या व्यक्तीने केलेल्या तक्रारीची प्रत संसदेत मांडण्यात यावी अशी मागणी डेमोक्रॅट खासदारांनी केली होती.

यानंतर अमेरिकन संसदेच्या खालच्या सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांनी राष्ट्रपती ट्रंप यांच्याविरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली.

युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर जेलेन्स्की यांच्यासोबत फोनवरून बोलताना जो बायडेन आणि त्यांच्या मुलाविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपांची तपासणी सुरू करण्यासाठी ट्रंप यांनी जेलेन्स्की यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप आहे.

जो बायडेन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आहेत आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत ते पक्षाचे उमेदवार असू शकतात. म्हणजेच ते राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचे या निवडणुकीतले प्रतिस्पर्धी असण्याची शक्यता आहे.

बायडेन यांचा मुलगा युक्रेनमधल्या एका गॅस कंपनीत काम करत होता. याप्रकरणी अद्याप बायडेन यांच्या विरोधातला कोणताही पुरावा समोर आलेला नाही.

युक्रेनचे नवे राष्ट्रपती जेलेन्स्की सत्तेत आल्यानंतर ट्रंप यांनी युक्रेनला दिली जाणारी मदत थांबवण्याचा निर्णय घेतल्याचा डेमोक्रॅट नेत्यांचा आरोप आहे.

2020 च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ट्रंप यांनी स्वतःच्या फायद्यासाठी युक्रेनमध्ये हस्तक्षेप घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचं डेमोक्रॅट नेत्यांचं म्हणणं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)