तालिबान: 3 भारतीय अभियंत्यांच्या सुटकेसाठी 11 तालिबानी नेत्यांची सुटका

मुल्ला बरादर

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, मुल्ला बरादर पाकिस्तानमध्ये झालेल्या चर्चेस उपस्थित झाल्यानंतर अपह्रतांना सोडण्यात आलं.

तीन भारतीय अभियंत्यांच्या मोबदल्यात 11 तालिबानी नेत्यांची सुटका केल्याची माहिती तालिबानच्या सूत्रांनी बीबीसीला दिली आहे.

सुटका करण्यात आलेल्या 11 जणांमध्ये हक्कानी या सशस्त्र गटातील एकाचा समावेश आहे.

वर्षभरापूर्वी उत्तर अफगाणिस्तानातून तालिबानने सात अभियंत्यांचं अपहरण केलं होतं. त्यापैकी तीन भारतीय होते.

अमेरिकेशी शांतता चर्चा ठप्प झाल्यानंतर पहिल्यांदाच तालिबानने अमेरिकेच्या शांतीदूताची भेट घेतल्यानंतर हे वृत्त आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेत तालिबानी शिष्टमंडळासोबत आयोजित करण्यात आलेली एक गुप्त बैठक रद्द केली होती.

त्याच्या एक महिन्यानंतर झलमय खलिदाद यांनी गेल्या आठवड्यात या गटाच्या वरिष्ठ सदस्यांची भेट घेतली. कैद्यांचं हस्तांतरण हा प्रमुख विषय या बैठकीत चर्चिला गेला, अशी माहिती बीबीसीला मिळाली.

अफगाणिस्तानच्या तुरुंगातून तीन महत्त्वाच्या तालिबानी सदस्यांना सोडण्यात आलं. त्यापैकी एक निमरोझ प्रांतात प्रतिसरकार मधील राज्यपालाचाही यामध्ये समावेश असल्याचं बंडखोर सदस्यांमधल्या सूत्रांनी सांगितलं.

न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, अमेरिकन सरकारने घोषित केलेल्या विशेष जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत अब्दुल रशिद बलूच हा होता.

कुनार प्रांतात दुसरं प्रतिसरकार चालवणारा हक्कानी ग्रुपचा सदस्यही यावेळी सोडण्यात आला. अमेरिकन तसंच अफगाण सैन्यावर मागच्या काही वर्षात झालेल्या हल्ल्यांमागे या कट्टरवाद्याचा हात असल्याचं सांगण्यात येतं.

त्याशिवाय आणखी आठ कट्टरवाद्यांनाही समझोत्यानुसार सोडून देण्यात आलं, अशी माहिती असोसिएटेड प्रेस वृत्तसंस्थेने दिली आहे.

या तालिबानी कमांडरना बागराम परिसरातील विशेष सुरक्षा बंदोबस्तात ठेवण्यात आलं होतं.

तिन्ही भारतीय अभियंत्यांचं नाव अद्याप उघड करण्यात आलं नाही. अपह्रत अभियंत्यांपैकी एकाची सुटका यावर्षी मार्चमध्ये करण्यात आली होती. पण बाकीच्या सहकाऱ्यांना बराच काळ वाट पाहावी लागली.

उत्तर बागलान परिसरातील एका वीज केंद्रात काम करणारे हे अभियंते मे 2018 मध्ये उत्तर भागात फिरायला गेले होते. अफगाणिस्तानात अपहरण ही एक गंभीर समस्या बनली आहे. इथं कट्टरवादी समूह देशातील विविध भागांमध्ये कार्यरत आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)