इराणवर नियंत्रण ठेवलं नाही, तर तेलाच्या किंमती भडकतील: सौदीच्या युवराजांचा इशारा

पेट्रोल

इराणला रोखण्यासाठी जगाने जर पावलं उचलली नाहीत तर जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका उडेल, असा इशारा सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी दिला आहे.

सौदी अरेबिया आणि इराणमध्ये युद्ध झाल्यास त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होईल, असं सलमान यांनी म्हटलंय.

दोन आठवड्यांपूर्वी सौदी अराम्कोच्या तेलसाठ्यांवर ड्रोन हल्ला झाला होता आणि सौदी अरेबियाने यामागे इराण असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सलमान यांनी पुन्हा म्हटलं, की जर इराणला आवर घातला नाही, तर त्यांना आंतरराष्ट्रीय पटलावर अभय मिळत असल्याचा भास होईल. यातून युद्धजन्य परिस्थिती उद्भवू शकते.

CBS न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सलमान यांनी इराणसोबतच्या संबंधांव्यतिरिक्त अन्य विषयांवरही भाष्य केलं.

"पत्रकार जमाल खाशोग्जी यांच्या हत्येची जबाबदारी काही प्रमाणात आपण स्वीकारत असलो, तरी या हत्येचे आदेश आपण व्यक्तिशः दिले नव्हते," असंही त्यांनी CBS न्यूजशी बोलताना सांगितलं.

मोहम्मद बिन सलमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोहम्मद बिन सलमान

युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या हाती सध्या प्रत्यक्षरित्या सत्ता नसली तरी सगळी सूत्रं तेच हलवत असल्याचं म्हटलं जातं. रियाधमधल्या सरकारवर टीका करणारे सौदी पत्रकार जमाल खाशोग्जी यांच्यावर युवराज सलमान यांनीच हल्ला घडवून आणल्याचा संशय आहे.

टर्कीमधल्या सौदी अरेबियाच्या दूतावासामध्ये 2 ऑक्टोबर 2018 मध्ये खाशोग्जी यांची हत्या करण्यात आली होती.

CBSच्या '60 मिनिट्स न्यूज' कार्यक्रमात रविवारी (29 सप्टेंबर) युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी मुलाखत दिली. त्यांनी म्हटलं, "सौदी सरकारसाठी काम करणाऱ्या व्यक्तींनी हत्या केल्याने सौदी अरेबियाचा नेता म्हणून मी याची पूर्ण जबाबदारी घेतो."

पत्रकार जमाल खाशोग्जी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पत्रकार जमाल खाशोग्जी

पण खाशोग्जीच्या हत्येचे आदेश आपण दिले नाहीत किंवा अशा प्रकारे त्यांची हत्या करण्यात येणार असल्याचंही आपल्याला माहीत नव्हतं, असं त्यांनी म्हटलं.

खाशोग्जींच्या खुनाचा 'कट' रचण्यात आल्याचं सौदी अधिकाऱ्यांचं म्हणणं असून याविषयी 11 जणांची तपासणी सुरू आहे.

'कच्च्या तेलाच्या किमती भडकतील'

सौदी अरेबियाच्या तेलसाठ्यांवर झालेल्या हल्ल्यामागे आपला कोणताही सहभाग नसल्याचं इराणने म्हटलंय.

पण सौदीच्या राजवटीचे उत्तराधिकारी असलेले युवराज मोहम्मद बिन सलमान म्हणतात, "इराणला रोखण्यासाठी जगाने कठोर आणि ठाम पावलं उचलणं गरजेचं आहे, नाही तर जगाच्याच अडचणी वाढतील."

"कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत होईल आणि कच्च्या तेलाच्या तेलाच्या किमतीचा भडका उडेल. अशी दरवाढ आतापर्यंत कधीही पाहण्यात येणार नाही."

"जगभरातल्या इंधन पुरवठ्यापैकी 30% पुरवठा, जगभरातल्या एकूण व्यापार मार्गांपैकी 20% मार्ग आणि जगाच्या वृद्धिदरापैकी (GDP) 4% वाटा हा मिडल ईस्ट भागातून येतो. या तीनही गोष्टी थांबल्या तर काय होईल, याची कल्पना करा. फक्त सौदी अरेबिया वा मध्य पूर्वेतले देशच नाहीत तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था यामुळे कोलमडेल."

ड्रोन हल्ले

अबकैद आणि अराम्कोच्या मधल्या दोन तेल प्रकल्पांवर 14 सप्टेंबर रोजी 18 ड्रोन्स आणि 7 क्रूझ क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला करण्यात आल्याचं सौदी अरेबियाचं म्हणणं आहे.

नकाशा

येमेनमधल्या इराणधार्जिण्या हुथी बंडखोरांनी या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. पण सौदी अरेबियासोबतच त्यांचा मोठा आणि महत्त्वाचा मित्र देश असणाऱ्या अमेरिकेने इराणला याचा दोष दिलाय.

या हल्ल्यामुळे जगभराला होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा 5 टक्क्यांनी घटला आणि कच्च्या तेलाच्या किमती वधारल्या.

याला प्रत्युत्तर देण्यासाठी वॉशिंग्टनकडे 'बरेच पर्याय' उपलब्ध असून यामध्ये 'टोकाचे पर्यायही' असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय.

नेमकं प्रकरण काय?

इराण हा सौदी अरेबियाचा शत्रू तर अमेरिकेचा विरोधक आहे. डोनाल्ड ट्रंप सत्तेत आल्यानंतर इराणने तेहरानच्या आण्विक कार्यक्रमांवर निर्बंध घालणाऱ्या करारातून माघार घेतली होती.

सलमान

फोटो स्रोत, Getty Images

या वर्षात इराण-अमेरिकेतील तणाव लक्षात येण्याजोगा वाढलेला आहे.

आखातामध्ये जून आणि जुलैमध्ये झालेल्या ऑईल टँकर्सवरच्या दोन हल्ल्यांमागे आणि मे महिन्यांत झालेल्या चार हल्ल्यांमागे इराणच असल्याचं अमेरिकेने म्हटलं होतं. पण तेहरानने हे सगळे आरोप फेटाळून लावले होते.

हे नक्की वाचा

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)