डोनाल्ड ट्रंप : तालिबानसोबत होणारी शांतता चर्चा संपुष्टात

डोनाल्ड ट्रंप, अमेरिका, अफगाणिस्तान

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रंप

अफगाणिस्तानमध्ये गेल्या 18 वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध संपवण्याच्या उद्देशाने तालिबानशी होणार असलेली शांती चर्चा मेली आहे असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलं.

माझ्यापुरतं सांगायचं झालं तर शांती चर्चा मरण पावली आहे असं ट्रंप यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

रविवारी कॅम्प डेव्हिड याठिकाणी ट्रंप आणि तालिबानचं शिष्टमंडळ यांच्यात चर्चा होणार होती मात्र एक दिवस आधी ट्रंप यांनी ही बैठक रद्द केली.

अमेरिका आणि तालिबान यांच्यात आधी झालेल्या समाधानाकारक वाटाघाटीनंतर शांती चर्चा सुकर होईल अशी लक्षणं होती.

दरम्यान शांती चर्चेतून माघार घेतल्याने अमेरिकेचंच नुकसान होईल असं तालिबानने म्हटलं आहे.

अफगाणिस्तानमधून अमेरिकेच्या फौजा परत बोलावण्याच्या निर्णयाला ट्रंप यांनी आपल्या परराष्ट्र धोरणाचं उदिष्ट बनवलं होतं. मात्र आता त्यांनी शांती चर्चा रद्द केली आहे. अफगाणिस्तानात कार्यरत 14,000 अमेरिकन सैनिकांबाबत विचारलं असता ट्रंप म्हणाले, आम्ही तिथून सैन्याला माघारी बोलवू इच्छितो. मात्र हे आम्ही योग्य वेळी करू.

डोनाल्ड ट्रंप, अमेरिका, अफगाणिस्तान

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, तालिबान

अफगाणिस्तान सरकारने अमेरिकेच्या शांतता चर्चा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. अमेरिकेनं योग्य पाऊल उचलल्याचं अफगाण सरकारचं म्हणणं आहे.

शांतता चर्चा रद्द करण्यामागे काबूल इथे झालेला बाँबस्फोट कारणीभूत असल्याचं ट्रंप यांचं म्हणणं आहे. काबूलमध्ये झालेल्या या स्फोटात एका अमेरिकन सैनिकासह 12 जणांच मृत्यू झाला होता. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

"लोकांना मारून चर्चेच्या वेळी आपली बाजू उंचावेल असं तालिबान्यांना वाटलं. मात्र ही मोठी चूक आहे. आमची चर्चा ठरली होती. चर्चा होणार हा माझा निर्णय होता आणि चर्चा रद्द करण्याचा निर्णयही माझाच आहे. यासंदर्भात मी अन्य कुणाशी बोललो नाही किंला चर्चा केली नाही. कॅम्प डेव्हिड इथे होणारी चर्चा रद्द होण्याचं कारण म्हणजे तालिबानने जे करायला नको तेच केलं," असंही ट्रंप म्हणाले.

वाटाघाटी योग्य दिशेने

अफगाणिस्तानसाठी नियुक्त अमेरिकेचे विशेष राजदूत जल्मे खलीलजाद यांनी सोमवारी तालिबानशी शांती चर्चा होईल असं मुत्सदीपणे म्हटलं होतं.

प्रस्तावित चर्चा आणि वाटाघाटीनंतर अमेरिका पुढील 20 महिन्यांमध्ये अफगाणिस्तानमधून 5,400 सैनिकांना परत बोलावणार होतं.

डोनाल्ड ट्रंप, अमेरिका, अफगाणिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकन सैन्य माघारी परतणार का?

या प्रस्तावाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हेच अंतिम मंजुरी देणार होते.

गुरुवारी काबूल इथं झालेल्या बाँबस्फोटानंतर, तालिबानशी चर्चेनंतरही अफगाणिस्तानमधील हिंसाचार कमी होणार नाही हे स्पष्ट झालं होतं.

तालिबान मजबूत होताना...

2001 मध्ये अमेरिकेच्या लष्कराने हाती घेतलेल्या मोहिमेनंतर पहिल्यांदाच अफगाणिस्तानमध्ये कट्टरतावाद्यांनी मोठ्या भूभागावर नियंत्रण मिळवलं आहे.

अफगाणिस्तान सरकार हे अमेरिकेची कठपुतळी आहे असं सांगत तालिबानने चर्चेपासून दूर राहणं पसंत केलं होतं.

अमेरिका आणि तालिबान यांच्यात आतापर्यंत चर्चेच्या नऊ फेऱ्या झाल्या आहेत.

शांतता चर्चेच्या वाटाघाटींनुसार, अमेरिकेचे ठराविक सैनिक मायदेशी परतल्यानंतर तालिबान अफगाणिस्तानचा वापर अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांवर हल्ल्यासाठी करणार नाही अशी तरतूद करण्यात आली होती.

मात्र शांतीचर्चेनंतरच्या वाटाघाटीनंतरही तालिबानच्या अमलाखालील जुलुमकारी प्रशासन पुन्हा येण्याची भीती अफगाणिस्तानमधील काहींना वाटत होती.

तालिबानने 1996 ते 2001 या कालावधीत अफगाणिस्तानवर राज्य केलं.

2001 मध्ये अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानमध्ये मोहीम हाती घेतली. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय संघटनांच्या 3,500 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यापैकी 2,300 अमेरिकेचे नागरिक आहेत.

डोनाल्ड ट्रंप, अमेरिका, अफगाणिस्तान

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, अफगाणिस्तानमधील परिस्थिती सुधारणार?

अफगाणिस्तानात सर्वसामान्य माणसं, कट्टरतावादी आणि सुरक्षायंत्रणांअंतर्गत सैनिक यांच्या मृत्यूचा नेमका आकडा सांगता येणं अवघड आहे.

2019 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अहवालात अफगाणिस्तानमध्ये 32,000 जणांचा मृत्यू झाला आहे.

अफगाणिस्तानमध्ये 58,000 लष्कराचे जवान आणि 42,000 बंडखोर मारले गेले आहेत असं ब्राऊन युनिव्हर्सिटीमधील वॉटसन इन्स्टिट्यूटचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)