लग्नाच्या मंडपात 63 नातेवाईकांच्या मृत्यूनंतर आशा गमावलेल्या नवरदेवाची गोष्ट

Mirwais Elmi talks to Tolo News

फोटो स्रोत, Reuters

अफगाणिस्तानातल्या काबुलमध्ये लग्नात आत्मघातकी हल्ला झाल्यानंतर आपण सगळ्या आशा गमावल्याचं नवऱ्या मुलाचं म्हणणं आहे.

ज्यांचं लग्न होतं त्या मीरवाइज इल्मी यांनी टीव्हीवर एक मुलाखत दिली. त्यांची पत्नी वाचली असली तरी त्यांचा भाऊ आणि नातेवाईकांसह एकूण 63 जण शनिवारी झालेल्या हल्ल्यामध्ये मारले गेले.

180 पेक्षा जास्त जणांना जखमी करणाऱ्या या हल्ल्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली आहे.

हा हल्ला 'क्रूर' असल्याचं अध्यक्ष अश्रफ घनी यांनी म्हटलंय.

तालिबानने दहशतवाद्यांना रान मोकळं करून दिलं असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर अमेरिकेसोबत शांतता चर्चा करत असणाऱ्या तालिबानने या हल्ल्याचा निषेध केलाय.

मीरवाइज इल्मी यांनी टोलो न्यूजला मुलाखत दिली. ज्या हॉलमध्ये पाहुण्यांचं आनंदात स्वागत केलं तिथूनच काही तासांनी त्यांचे मृतदेह नेताना पाहिल्याचं ते सांगतात.

"माझं कुटुंब, माझी बायको धक्क्यात आहेत. त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नाहीयेत. माझ्या बायकोला सारखी चक्कर येते," ते म्हणतात.

"माझ्या सगळ्या आशा संपल्या आहेत. मी माझा भाऊ गमावला, मित्र गमावले, नातेवाईक गमावले. माझं आयुष्य परत कधीच पूर्वीसारखं आनंदी होणार नाही."

"मी अंत्यसंस्कारांनाही जाऊ शकत नाही इतका थकवा आलाय मला...पण अफगाण लोकांच्या यातना इतक्यात संपणार नाहीत, हे सुरूच राहणार," ते म्हणतात.

या हल्यामध्ये वधूच्या कुटुंबातल्या 14 जणांचा मृत्यू झाल्याचं वधुपित्याने अफगाण मीडियाला सांगितलं.

A mass funeral is held after a suicide bomb blast at a wedding in Kabul, Afghanistan August 18, 2019

फोटो स्रोत, Reuters

काय घडलं?

"आपल्या एका योद्ध्याने स्वतःवर लावलेल्या स्फोटकांचा एका मोठ्या कार्यक्रमामध्ये स्फोट केला तर तिथे पार्क करण्यात आलेल्या स्फोटकं असणाऱ्या गाडीचा स्फोट इतरांनी आपत्कालिन यंत्रणा दाखल झाल्यानंतर घडवून आणला," असं इस्लामिक स्टेटने त्यांच्या पत्रकात म्हटलंय.

शिया मुस्लिम बहुल भागात हा हल्ला झाला आहे.

तालिबान आणि इस्लामिक स्टेटसह सुन्नी मुसलमान कट्टरवाद्यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातल्या अल्पसंख्याक शियांवर अनेकदा हल्ले केले आहेत.

या लग्नात सहभागी होण्यासाठी आलेले मुनीर अहमद (23) सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत. ठार झालेल्यांमध्ये त्यांच्या चुलत भावाचाही समावेश आहे.

"स्फोट झाला त्यावेळी लग्नासाठी आलेले पाहुणे नाचत आनंद साजरा करत होते," त्यांनी एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

"स्फोटानंतर अफरातफर माजली. सगळे किंचाळत होते, आपल्या जवळच्यांसाठी रडत होते."

अफगाण लग्न बहुतेकदा मोठ्या हॉल्समध्ये होतात. इथे पुरुष आणि महिला-मुलं वेगवेगळे असतात.

काय प्रतिक्रिया उमटली?

'आढावा घेण्यासाठी आणि सुरक्षा यंत्रणांकडून असा ढिसाळपणा पुन्हा होऊ नये' म्हणून सुरक्षा यंत्रणांची बैठक बोलावल्याचं राष्ट्राध्यक्ष घनी यांनी ट्विटरवरून सांगितलं.

तर हा हल्ला 'मानवतेच्या विरोधात' असल्याचं अफगाणिस्तानचे चीफ एक्झिक्युटिव्ह अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी म्हटलंय. तर हा हल्ला विकृत असल्याचं अमेरिकेचे अफगाणिस्तानमधले राजदूत जॉन बास यांनी म्हटलंय.

तालिबानही या हल्ल्याचा निषेध करत असल्याचं त्यांच्या प्रवक्त्याने म्हटलंय.

"महिला आणि मुलांना लक्ष्य करणाऱ्या अशा हेतुपुरस्सर आणि क्रूर हल्ल्यांचं समर्थन होऊ शकत नाही," असं मीडियाला पाठवलेल्या टेक्स्ट मेसेजमध्ये झबिउल्लाह मुजाहिद यांनी म्हटलंय.

अफगाण शांतता चर्चांचं काय?

कतारची राजधानी दोहामध्ये तालिबान आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींमध्ये ही चर्चा सुरू आहे.

ही बोलणी चांगली सुरू असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डॉनाल्ड ट्रंप यांनी रविवारी पत्रकारांना सांगितलं.

"तालिबानसोबतची चर्चा चांगली सुरू आहे. अफगाण सरकारसोबतची आमची चर्चाही अतिशय चांगली होतेय," ते म्हणाले.

नाटोच्या मिशनसाठी अमेरिकेचे साधारण 14,000 सैनिक अफगाणिस्तानात आहेत. आपल्याला अमेरिकन सैन्य तिथून माघारी बोलवायचं असल्याचं ट्रंप यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून म्हटलंय.

अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन लोकांवर आणि इमारतींवर कट्टरतावाद्यांकडून हल्ले घडवले जाणार नाहीत, अशी हमी तालिबानने दिल्यास अमेरिका आपलं सैन्य टप्प्याटप्प्याने मागे घेणार आहे.

देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठीची धोरणं ठरवण्यासाठी अफगाण पथकासोबतही तालिबानची बोलणी सुरू होणार आहेत. पण अमेरिकन सैन्य माघारी कधी जाणार हे ठरत नाही तोपर्यंत अफगाण सरकारशी चर्चा करायला कट्टरवाद्यांनी नकार दिलाय.

2001मध्ये तालिबानला सत्तेतून हटण्यात आलं. पण त्यानंतरही सध्या अफगाणिस्तानच्या बहुतांश भागामध्ये तालिबानचं वर्चस्व आहे

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)