आर्थिक मंदी: रुपयाची घसरण का होते? डॉलर का आहे जगातील सर्वात मजबूत चलन?

डॉलर

फोटो स्रोत, Getty Images

भारतीय रुपया दिवसेंदिवस कमकुवत होत चालला आहे. बँका आणि निर्यातदारांकडून डॉलरला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यानं ही घसरण होत आहे.

परदेशी चलनाचा व्यवहार करणाऱ्यांचं म्हणणं आहे की अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे रुपयावर दबाव येत असून एक डॉलर खरेदी करण्यासाठी 72.14 रुपये द्यावे लागत आहेत.

गेल्या आठवड्यात चीनच्या चलन युआनमध्येही मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी रुपया 71.76 वर बंद झाला होता.

पण अमेरिकन डॉलर जगभरात एवढं शक्तिशाली का आहे? डॉलरला कायमच मागणी का असते? आणि जगभरातले सर्व देश आपल्या विदेशी चलनाच्या गंगाजळीत डॉलरच का ठेवतात? या प्रश्नांच्या उत्तरातून तुम्हाला रुपयाची घसरण आणि डॉलर का मजबूत आहे हे समजू शकेल.

अमेरिकन चलन डॉलरची एक जागतिक चलन म्हणून ओळख झाली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलर आणि युरो खूप लोकप्रिय आणि सार्वत्रिकपणे स्वीकारली जाणारी चलनं आहेत. जगभरातील केंद्रीय बँकांमध्ये विदेशी चलनाची जी गंगाजळी असते, त्यामध्ये 64 टक्के चलन हे अमेरिकन डॉलर असते.

रूपया

फोटो स्रोत, Getty Images

या सर्व बाबींमुळे डॉलर एक जागतिक चलन होऊन जाते आणि हेच डॉलरच्या मजबुतीचं आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे.

इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन यादीनुसार जगभरात एकूण 185 चलनं आहेत. अर्थात, यातील बहुतांश चलनांचा वापर केवळ त्या-त्या देशाच्या अंतर्गत व्यवहारात होतो. कोणतेही चलन जगभरात किती मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे, ते त्या देशाची अर्थव्यवस्था आणि ताकदीवर अवलंबून आहे.

जगातील दुसरे शक्तिशाली चलन युरो आहे. जगभरातील केंद्रीय बँकांच्या विदेशी चलनाच्या गंगाजळीत 19.9 टक्के प्रमाण युरोचं आहे.

हे स्पष्ट आहे की डॉलरची ताकद आणि स्वीकारार्हता अमेरिकन अर्थव्यवस्थेचे सामर्थ्य दाखवून देते. डॉलरच्या एकूण प्रमाणापैकी 65 टक्के डॉलरचा वापर प्रत्यक्षात अमेरिकेच्या बाहेर होतो.

जगातील 85 टक्के व्यापारात डॉलरचा सहभाग आहे. जगभरातील 39 टक्के कर्जं डॉलरमध्ये दिले जातात. त्यामुळे विदेशी बँकांना आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी डॉलरची गरज असते.

युरो

फोटो स्रोत, Getty Images

डॉलर जागतिक चलन का आहे?

1944 मधील ब्रेटनवुड्स करारानंतर डॉलरच्या शक्तिशाली वाटचालीला सुरुवात झाली. त्यापूर्वी बहुतांशी देश केवळ सोन्याला योग्य मापदंड मानत होते. विविध देशातील सरकार आश्वासन द्यायचे की त्यांचे चलन सोन्याच्या मागणीच्या मूल्यावर निर्धारित करू.

न्यू हँपशायरच्या ब्रेटनवूड्समध्ये जगातील विकसित देश भेटले आणि त्यांनी डॉलरच्या तुलनेत सर्व चलनांचा विनिमय दर ठरवला. त्यावेळी अमेरिकेकडे सर्वाधिक सोने होते. या कराराने इतर देशांना सोन्याच्याऐवजी आपले चलन डॉलरवर आधारित ठेवण्याची परवानगी दिली गेली.

1970 मध्ये अनेक देशांनी डॉलरऐवजी सोन्याला मानक बनवण्याती मागणी सुरू केली कारण त्यांना चलनवाढीचा मुकाबला करण्याची गरज होती. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी डॉलरला सोन्यापासून वेगळे केले. तोपर्यंत डॉलर जगातील सर्वात खास आणि सुरक्षित चलन बनले होते.

चिनी चलन

फोटो स्रोत, Getty Images

जगासाठी एकाच चलनाची मागणी

मार्च 2009 मध्ये चीन आणि रशियाने एका नव्या जागतिक चलनाची मागणी केली. त्यांची मागणी होती 'एक रिझर्व्ह चलन बनवले जावे जे कुठल्या विशिष्ट देशाशी संबंधित नसेल आणि दीर्घकाळासाठी स्थिर राहण्यासाठी ते सक्षम असेल. अशाप्रकारे क्रेडिट आधारित राष्ट्रीय चलनाच्या वापरामुळे होणारे नुकसान टाळता येईल.'

चीनला काळजी आहे की जर डॉलरची चलनवाढ झाली तर त्यांच्याकडचे अब्जावधी डॉलर्स काहीच उपयोगाचे राहणार नाहीत. हे त्याच परिस्थितीत होऊ शकते जेव्हा अमेरिकेचे कर्ज चुकवण्यासाठी अमेरिका नवीन नोटा छापेल. चीनने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मागणी केली आहे की डॉलरच्या ऐवजी नवे चलन बनवले जावे.

2016च्या चौथ्या तिमाहीमध्ये चीनचे युआन हे चलन जगातील एक मोठे रिझर्व्ह चलन बनले होते. 2017च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत जागतील केंद्रीय बँकांमध्ये 108 अब्ज डॉलर्स होते. ही एक छोटी सुरुवात आहे, पण भविष्यात याची वाढ होत राहील.

त्यामुळे चीनचं म्हणणं आहे की त्यांचे चलन जागतिक चलनबाजारात व्यापारासाठी पूर्णपणे वापरले जावे. म्हणजे थोडक्यात डॉलरऐवजी युआनला जागतिक चलनाच्या रूपात वापरले जावे. त्यासाठी चीन आपली अर्थव्यवस्था बळकट करत आहे.

2007 मध्ये अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हचे प्रमुख अॅलेन ग्रीनस्पॅन यांनी म्हटलं होतं की युरो डॉलरची जागा घेऊ शकते. 2006च्या अखेरीस जगभरातील केंद्रीय बँकांमध्ये एकूण विदेशी चलनात युरोचे प्रमाण 25 टक्के होते तर डॉलरचे 66 टक्के होते. जगाच्या अनेक भागांत युरोचे प्रभुत्वही आहे. युरोपियन युनियन जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणे, हेही युरोच्या बळकटीचं मोठं कारण आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)