गणेश चतुर्थी: आर्थिक मंदीच्या सावटाखाली गणपतीचा साज यंदा जरा फिका?

फोटो स्रोत, AFP Contributor/getty
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी मुंबईहून
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तुमचीही तयारी सुरू झाली असेल. नवनवीन देखावे, सजावटीचं सामान, पूजेचं साहित्य, गणपतीचे दागिने, विविध प्रकारच्या मिठाई तुम्ही बाजारात पाहिली असेल. मात्र एक ना एक दुकानदाराने तुम्हाला हे सांगितलं असेलच की "या वेळी तर काही उठावच नाही. लोकच येईना. कुणी सामानच घेईना."
विक्रेत्यांची ही कायमचीच ओरड असली तरी यंदाच्या गणेशोत्सवावर आर्थिक मंदीचं सावट असल्याचं तुम्हालाही जाणवत असेलच. पण ही परिस्थिती नेमकी किती गंभीर आहे?
दरवर्षी धुमधडाक्यात साजरा करणार्या अनेक गणेश मंडळांनी सजावटीपासून गणपतीच्या दागिन्यांपर्यंत सगळाच खर्च कमी केलाय.
मुंबईच्या गिरगावात राहणारे नाना वेदक हे 45 वर्षांपासून गणपतीचे दागिने बनवतात. लालबागचा राजा, चिंतामणी, गणेश गल्ली, GSB अशा अनेक मोठ्या मंडळांच्या गणपतीचे सोन्याचे दागिने बनवतात.
यंदा सोन्याचा भाव 38 हजारांवर गेला. त्याचबरोबर उद्योगधंद्यात मंदी आली आहे, त्यामुळे दरवर्षीपेक्षा 50 टक्के मागणी घटल्याचं नाना सांगतात. "दरवर्षी गणपतीसाठी 4 ते 5 किलो सोन्याचे दागिने आम्ही बनवतो. पण यंदा मागणीच कमी असल्यामुळे ऑर्डरही कमी आल्या," त्यांनी सांगितलं.
"आतापर्यंत एक किलोही सोन्याचे दागिने घेतले गेले नाही. दरवर्षी 30 ते 35 लोकांच्या ऑर्डर असतात, पण यावर्षी 7-8 ऑर्डर आहेत. सोन्याचे भाव वाढल्यामुळे लोक चांदीचे दागिने घेतायेत. पण प्रत्येकवर्षी आमचे 70 ते 80 किलो चांदीचे दागिने विकले जात होते, पण यंदा त्यातही 20 टक्के घट आहे," असं नाना वेदक सांगतात.
'पैसेच नाहीत तर सजावट कुठून करणार?'
गणपतीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या सामग्रीच्या किमतीही साधारण 30 टक्क्यांनी वाढल्याचं बाजारपेठात फिरल्यावर लक्षात येतं. तीन ते चार हजारांना मिळणाऱ्या सजावटी आता आठ-दहा हजारांवर जाऊन पोहोचल्या आहेत. त्यामुळे घरगुती गणपतींच्या सजावटीची झगमगाट कमी झालेली दिसली तर आश्चर्य वाटायला नको.
गणेश मंडळांनीही यंदा सजावट कमी केल्याचं दिसून येतंय.
फोर्टच्या राजा गणेश मंडळाकडून दरवर्षी विविध थीम साकारल्या जातात, पण यंदा "फक्त एक पडदा मारून गणपती बसवणार" असल्याचं मंडळाचे सचिव नयन डुंबरी यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
"बाजारात मंदीचं वातावरण आहे. आमचे दरवर्षी सजावटीसाठी एक ते सव्वा लाख रुपये खर्च होतात. यावर्षी मात्र आम्ही आमची सजावट 20 हजारात बसवली आहे. आम्ही गणपती बाप्पाच्या आगमनासाठी ढोलताशा पथक बोलवतो. पण यंदा आम्ही बाप्पाचं आगमन शांततेत करणार आहोत," असं डुंबरी यांनी सांगितलं.
"आमच्या मंडळाला जाहिरातीतून अधिक पैसे मिळतात. त्यातून आम्ही इतर खर्च करायचो, पण इतकी वर्षं 40-50 हजारांची जाहिरात देणार्या जाहिरातदारांनी यावर्षी जाहिरात देणं शक्य नसल्याचं सांगितलं."
अनेकांच्या नोकर्या गेल्या आहेत. काहींची पगारवाढ झालेली नाही, त्यामुळे हजार रुपये वर्गणी देणारे लोकांनी परवडत नसल्याचं सांगून 250-500 रुपये दिले. त्यामुळे देणगीदार, जाहिराती यामधून निघणार्या खर्चावर 60 टक्के परिणाम झाला असल्याचं नयन डुंबरे यांनी पुढे सांगितलं.
हात आवरता घ्यावा लागणारं फोर्टमधलं हे मंडळ एकमेव नाही. मुंबईत अशी अनेक मंडळं आहेत, ज्यांच्याकडे गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही धुमधडाक्यात करण्यासाठी पैसे जमा झाले नाहीत.
GSTमध्ये सूट मिळावी
"आज आम्ही गणेशोत्सवासाठी ज्यांच्याकडे देणगी मागतोय, ते लोक इच्छा असूनही आम्हाला अपेक्षित देणगी देऊ शकत नाही. व्यापारी आणि उद्योजकांमध्ये निरुत्साह आहे. त्यात सर्वच गोष्टी महागल्या आहेत," असं बृहन्मुंबई महापालिकेचे गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितलं.

"सगळ्यावर GST लागला आहे, त्यामुळे जमा रक्कम काही नसून खर्च वाढतोय. आम्ही केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत. उत्सवांवरील GSTमध्ये सूट मिळावी, अशी आमची मागणी आहे. पण आमचे कार्यकर्तेच स्वतः गणेशोत्सवासाठी झटतायेत. आम्ही अनावश्यक खर्च टाळून शक्य तितक्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करू," असं ते पुढे म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








