चांद्रमोहीम : कसं होतं अपोलो 11 मिशन?

चांद्रमोहीम

फोटो स्रोत, Reuters

चंद्रावर माणूस पहिल्यांदा उतरला आणि असं करणारा अमेरिका पहिला देश ठरला, त्याला जवळपास 50 वर्षं झाली आहेत.

अमेरिका आणि जगाच्या इतिहासातच अपोलो 11 मोहिमेचं यश, हा मोठा क्षण होता. पण तेव्हा नक्की काय घडलं? आणि ते इतकं महत्त्वाचं का आहे?

1957मध्ये तेव्हाच्या सोव्हिएत युनियने स्पुटनिक उपग्रह लाँच केला. त्यानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये अंतराळात जाण्याची स्पर्धा सुरू झाली.

1961 मध्ये जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि अनेक अमेरिकन नागरिकांना असं वाटलं की शीतयुद्धातल्या त्यांच्या या प्रतिस्पर्ध्याच्या समोर या तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत अमेरिका मागे पडणार.

त्याच वर्षी सोव्हिएत युनियन पहिल्यांदा मानवाला अंतराळात पाठवलं.

म्हणून मग अमेरिकेने चंद्रावर पहिल्यांदा मानवाला पाठवायचं ठरवलं आणि 1962मध्ये केनेडी यांनी याची घोषणा केली, जी नंतर खूप प्रसिद्ध झाली. ते म्हणाले, "वी चूज टू गो टू द मून!" (आम्ही चंद्रावर जायचं ठरवलं आहे.)

चांद्रमोहीम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोव्हिएत युनिअनने पहिल्यांदा आपल्या अंतराळवीरांना अंतराळात पाठवलं, त्यामुळे अमेरिका काळजीत पडली.

ही अंतराळातली चढाओढ अशीच सुरू राहिली आणि 1965मध्ये सोव्हिएत युनियनने एक मानवरहित अवकाशयान चंद्रावर उतरवण्यात यश मिळवलं.

अमेरिकेने मोहिमेची तयारी कशी केली?

अमेरिकेची स्पेस एजन्सी असणाऱ्या नासाने या अपोलो प्रोगाम (कार्यक्रम)साठी भरपूर निधी आणि इतर गोष्टी पुरवल्या.

चांद्रमोहीम

फोटो स्रोत, NASA

17 अपोलो मोहिमांवर तब्बल 4 लाख लोकांनी काम केलं. याचा खर्च होता 25 बिलियन डॉलर्स.

अपोलो 11 मोहिमेसाठी 3 अंतराळवीरांची निवड करण्यात आली. ते होते : बझ ऑल्ड्रिन, नील आर्मस्ट्राँग आणि मायकल कॉलिन्स.

सॅटर्न पाच - Saturn V - नावाच्या एका शक्तीशाली रॉकेटने अपोलोचं कमांड आणि सर्व्हिस मॉड्यूल वाहून नेलं. यासोबतच लुनार मॉड्यूलही होतं जे नंतर चंद्रावर उतरणार होतं.

पृथ्वीच्या कक्षेचा वापर करून चंद्राच्या कक्षेमध्ये पोहोचण्याचं उद्दिष्टं होतं. त्यानंतर आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन हे लुनार मॉड्यूलमध्ये जाणार होते. लुनार मॉड्यूलमधून हे दोघे चंद्रावर उतरत असताना कॉलिन्स हे कमांड आणि सर्व्हिस मॉड्यूलमध्ये होते.

काही बिनसलं का?

अंतराळवीर असलेल्या अपोलो 1 अंतराळयानाद्वारे 1967मध्ये पहिल्यांदा पृथ्वीच्या कक्षेत जाण्याची चाचणी घेण्यात येणार होती.

पण उड्डाणाआधीच्या करण्यात येणाऱ्या तपासणीदरम्यान दुर्घटना घडली. कमांड मॉड्यूलमध्ये आग लागली आणि तीन अंतराळवीरांचा मृत्यू झाला.

चांद्रमोहीम

फोटो स्रोत, NASA

त्यानंतर अंतराळवीर असणाऱ्या मोहिमा (Manned Space Flights) पुढच्या काही महिन्यांसाठी थांबवण्यात आल्या.

अगदी अपोलो 11 मोहिमेदरम्यान देखील अंतराळवीरांना पृथ्वीवरील कन्ट्रोल रूमसोबत संपर्क साधताना अडचणी येत होत्या. आणि या मोहिमेदरम्यान एक अशी धोक्याची घंटा वाजली जी या तीन अंतराळवीरांनी पूर्वी एकलेलीच नव्हती.

शिवाय चंद्रावर उतरण्यासाठी ठरवण्यात आलेल्या जागेपासून लुनार मॉड्यूल बरंच दूरवर उतरलं.

चंद्रावरचं पहिलं पाऊल

इतक्या अडचणी येऊनही पृथ्वी सोडल्याच्या 110 तासांनंतर 20 जुलै रोजी नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरणारे पहिले व्यक्ती ठरले. 20 मिनिटांनंतर त्यांच्या मागोमाग बझ ऑल्ड्रिन उतरले.

जगभरामध्ये टीव्हीवरून प्रसारित झालेले आर्मस्ट्राँग यांचे शब्द इतिहासात नोंदले गेले, "मानवाचं हे लहानसं पाऊल, मानवजातीसाठी एक मोठी झेप ठरेल" (That's one small step for man, one giant leap for mankind)

'लुनार मॉड्यूल'च्या बाहेर हे दोन अंतराळवीर दोन तासांपेक्षा जास्त काळ होते. त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावरून काही नमुने गोळा केले, फोटो काढले आणि काही वैज्ञानिक प्रयोग तिथे उभारले.

ही चांद्रसफर यशस्वीरित्या पूर्ण करून हे दोघे पुन्हा कमांड आणि सर्व्हिस मॉड्यूलकडे गेले.

चांद्रमोहीम

फोटो स्रोत, NASA

फोटो कॅप्शन, अपोलो - 11 मध्ये सहभागी असणारे तीन अंतराळवीर

पृथ्वीवर परतण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला आणि 24 जुलै रोजी ते पॅसिफिक महासागरावर उतरले.

हे पहिलं 'मून लँडिंग' जगभरातल्या तब्बल 650 दशलक्ष लोकांनी पाहिल्याचा अंदाज आहे. अमेरिकेबाबत बोलायचं झालं तर या यशामुळे त्यांची ताकद जगाला समजली.

अत्यंत उलथापालथीच्या दशकानंतर देशाचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी हे गरजेचंही होतं. या काळात केनेडींची हत्या झाली, महत्त्वाच्या शहरांमध्ये जातीय दंगली झाल्या आणि व्हिएतनाममधल्या लष्करी कारवाईवरून अस्वस्थता निर्माण झालेली होती.

हे खरंच घडलं का?

1972च्या अखेरपर्यंत अमेरिकेच्या सहा मोहिमांद्वारे चंद्रावर अंतराळवीर उतरले होते. पण असं असूनही चंद्रावर उतरणं हा सगळा एक बनाव होता असं काहीजण म्हणतात. (कॉन्स्पिरसी थिअरी)

चांद्रमोहीम

फोटो स्रोत, NASA

फोटो कॅप्शन, चंद्रावर माणूस उतरल्यानंतर अमेरिकेत झालेले सेलिब्रिशन

पण 2009पासून नासाचं अंतराळयान चंद्राला घिरट्या घालत नजर ठेवत आहे. या यानाने पाठवलेल्या फोटोंमध्ये या अपोलो मोहिमांमुळे पृष्ठभागामुळे झालेल्या खुणा - पाऊलखुणा आणि टायरचे ठसे दिसत आहेत.

चंद्राच्या पृष्ठभागावरून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांमुळे भौगोलिक पुरावेही मिळालेले आहेत.

चंद्रावर जाण्याचं उद्दिष्टं काय?

चंद्रावर माणसं उतरवणारा अमेरिका हा जगातला अजूनही एकमेव देश आहे.

पण रशिया, जपान, चीन, युरोपीयन स्पेस एजन्सी आणि भारतासारख्या देशांनी चंद्राच्या कक्षेत प्रोब पाठवले आहेत किंवा चंद्राच्या पृष्ठभागावर वाहनं उतरवली आहेत.

असं करता येणं हे एखाद्या देशाच्या तांत्रिक सामर्थ्याचं लक्षण आहे. यामुळे त्यांना जगात मानाचं स्थान मिळतं.

याशिवाय चंद्रावरील स्रोतांची चाचपणी करण्यासारखी इतरही अनेक कारणं आहेत.

चांद्रमोहीम

फोटो स्रोत, NASA

फोटो कॅप्शन, अमेरिकेच्या महिला अंतराळवीर

चंद्राच्या दोन्ही ध्रुवांवर आढळलेल्या बर्फाचा फायदा यानाला अंतराळात दूरवर जाण्यासाठी होऊ शकतो. या बर्फात असणाऱ्या हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा वापर रॉकेटचं इंधन म्हणून केला जाऊ शकतो.

याशिवाय चंद्रावर सोनं, प्लॅटिनम किंवा पृथ्वीवर दुर्मिळ असणाऱ्या इतर धातूंचा शोध घेतला जाऊ शकतो. पण अशा गोष्टींचं उत्खनन करणं किती सोपं असेल हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)