ख्राईस्टचर्च हल्ला: न्यूझीलंडमध्ये अभिनव योजना - सरकारला बंदुका परत विका

फोटो स्रोत, Reuters
ख्राईस्टचर्चमध्ये मशीदीवर झालेल्या भयानक हल्ल्यानंतर न्यूझीलंडमध्ये सेमी-ऑटोमॅटिक बंदुका बाळगण्यावर बंदी घालण्यात आली होती.
आता शस्त्रास्त्रांच्या आळा घालण्यासाठी न्यूझीलंड सरकारने लोकांकडच्या बंदुका परत विकत घेणारी एक योजना जाहीर केली आहे. या हल्ल्यांनंतर आता या बंदुका लोकांकडून विकत घेण्यासाठी 20.8 कोटी न्यूझीलंड डॉलर्सची (13.6 कोटी अमेरिकन डॉलर्स) तरतूद करण्यात आली आहे.
हल्ल्याच्या काही आठवड्यांनंतर एप्रिलमध्ये संसदेने या बंदीला मान्यता दिली. मार्च महिन्यात बंदुकधारी हल्लेखोराने मशीद आणि इस्लामिक सेंटरमध्ये शुक्रवारच्या नमाजादरम्यान केलेल्या गोळीबारात 51 जणांचा जीव गेला होता.
कशा परत घेणार बंदुका?
ही योजना परवाना असणाऱ्या बंदुकांसाठीच आहे. यानुसार पुढच्या सहा महिन्यांत म्हणजे 20 डिसेंबरपर्यंत लोकांना त्यांच्याकडील बंदुका परत देता येतील.
"बंदुका परत विकत (बाय-बॅक) घेण्याचं एकच उद्दिष्टं आहे - ते म्हणजे घातक शस्त्रं चलनातून काढून घेणं," पोलिसांचे प्रमुख असणाऱ्या नॅश यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Reuters
"यापुढचं पाऊल काय असेल याची पोलिसांनी तपशिलात आखणी केलेली आहे. लोकांकडे असणाऱ्या विविध प्रकारच्या बंदुका गोळा करण्यात येतील. हे प्रचंड मोठं काम आहे आणि जुलैच्या मध्यापासून सुरू होण्याची अपेक्षा आहे."
शस्त्रास्त्रांसाठीच्या नवीन कायद्यानुसार एप्रिलमध्ये लष्करी पद्धतीच्या सेमी-ऑटोमॅटिक शस्त्रांवर आणि ती बनवण्यासाठीच्या सुट्या भागांवर बंदी घालण्यात आली. या योजनेसाठी करण्यात आलेल्या तरतुदीमधून या शस्त्र धारकांना त्यांच्याकडील शस्त्राच्या मूळ किंमतीच्या 95 टक्क्यांपर्यंतची रक्कम भरपाई म्हणून देण्यात येईल.
लष्करी पद्धतीची जवळपास 14,300 सेमीऑटोमॅटिक शस्त्रं या नवीन नियमांतर्गत येतील असा पोलिसांचा अंदाज आहे. ही योजना जाहीर करण्यात येण्याच्याही आधी आतापर्यंत जवळपास 700 बंदुका परत करण्यात आल्या असून आणखी 5,000 जणांनी आपली आयुधं पोलिसांनी जमा करण्यासाठी नोंदणी केलेली आहे.
काय घडलं ख्राईस्टचर्चमध्ये?
स्वतःला उच्च श्वेतवर्णीय समजणाऱ्या ब्रेंटन टॅरंट या ऑस्ट्रेलियन व्यक्तीने 15 मार्च रोजी ख्राईस्टचर्चमधील अल् नूर मशीद आणि द लिनवूड इस्लामिक सेंटरवर हल्ला केला.
न्यूझीलंडमध्ये शांतता असतानाच्या काळातला हा सगळ्यात भीषण गोळीबार (मास शूटिंग) होता. या हल्लेखोरावर 51 जणांच्या खुनाचा, 40 जणांचा खून करण्याचा प्रयत्न करण्याचा आणि एक दहशतवादी कारवाईचा आरोप लावण्यात आलेला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या व्यक्तीकडे असणाऱ्या सेमी ऑटोमॅटिक रायफल्समध्ये काही बदल करून त्याने त्यात जास्त बुलेट्स असणारी मॅगझिन्स घातल्याचा अंदाज आहे. या सगळ्या आरोपांमध्ये आपण दोषी नसल्याचं या संशयिताने म्हटलं असून पुढच्या वर्षी या प्रकरणी सुनावणी होण्याची अपेक्षा आहे.
न्यूझीलंडमधल्या नागरिकांकडे तब्बल 12,00,000 कायदेशीर शस्त्रं म्हणजे दर चार व्यक्तींमागे एक शस्त्र असल्याचा अंदाज न्यूझीलंड पोलिसांनी 2016मध्ये व्यक्त केला होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








