गेम ऑफ थ्रोन्सचा 8वा सिझन पुन्हा बनवा, चाहत्यांची ऑनलाइन याचिका

गेम ऑफ थ्रोन्स

फोटो स्रोत, SKY ATLANTIC

गेम ऑफ थ्रोन्सच्या निर्मात्यांना थंडीने हुडहुडी भरायची वेळ आली आहे कारण या सीरियलच्या आठव्या सीझनला मिळणारा प्रतिसाद थंड पडत चालला आहे.

इतकंच नाही, तर 'चांगलं लिहू शकणारे लेखक' घेऊन हा सीझन नव्याने बनवा अशी मागणी 5 लाखाहून अधिक चाहत्यांनी केली आहे. तशा आशयाची एक ऑनलाईन याचिकाच या चाहत्यांनी सुरू केली आहे.

TheChange.Org या साईटवर ही याचिका सुरू झाली आहे आणि यामध्ये भाग घेणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे.

या मेगा-सीरियलचा आठवा सीझन पाहून अनेक चाहत्यांची निराशा झाली आहे. जॉर्ज आर आर मार्टिन यांच्या कांदबऱ्यांवर आधारित ही सीरियल जगभरात प्रचंड लोकप्रिय आहे. पण आठव्या सिझनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागानंतर या सीरियलवर प्रचंड टीका होते आहे.

आपल्या आवडत्या कॅरेक्टर्सचं वागणं आणि वेगळ्याच दिशेने जाणारं कथानक पाहून चाहत्यांची निराशा झाली आहे असं या ऑनलाईन याचिकेत म्हटलं आहे.

आणि म्हणूनच 'चांगलं लिहू शकणारे लेखक' घेऊन हा संपूर्ण सीझन पुन्हा बनवा अशी मागणी चाहत्यांनी केली आहे.

गेम ऑफ थ्रोन्स

फोटो स्रोत, Change.org

या याचिकेत म्हटलंय की या सीरियलचे क्रिएटर डेव्हिड बेनिऑफ आणि डीबी वेस 'यांनी सिद्ध केलंय की ते किती अकार्यक्षम आहेत.'

या लेखकांना संदर्भासाठी कोणतंही साहित्य उपलब्ध नसल्याचंही याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. कारण लेखक जॉर्ज मार्टिन यांच्या कांदबरी मालिकेतलं पुढचं पुस्तक 'The Winds of Winter' अपूर्ण आहे.

गेम ऑफ थ्रोन्सचा आठवा आणि शेवटचा सीझन ढोबळमानाने या पुस्तकावर आधारित आहे. पण हे पुस्तक पूर्ण झालं नसल्याने सीरियलचा शेवट पुस्तकापेक्षा वेगळा आहे.

"काहीतरी अर्थबोध होईल असाच या सीरियलचा शेवटचा सीझन हवा. माझ्या अपेक्षा पूर्ण करा आणि हा सीझन पुन्हा बनवा HBO वाल्यांनो," असं या याचिकेत म्हटलं आहे.

ज्यांनी या याचिकेवर सही केलीये त्यांनी देखील आपली मतं व्यक्त केली आहेत. अनेक चाहत्यांचं म्हणणं आहे की सीरियल 'घिसाडघाईने संपवली', तर इतरांचं म्हणणं आहे की 'या आठव्या सीझनमुळे खऱ्या लेखकाचा अपमान झाला आहे', तर काही जणांनी तर म्हटलंय की आत्तापर्यंत जे 'काही कथानक फुललं होतं त्याची आठव्या सीझन मध्ये पार माती केलीये.'

"इतके दिवस जे कथानक होतं, मालिकेतली पात्र जशी वागत होती, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं जे तंत्र होतं, ते सगळंच एका फटक्यात संपलं आहे. असं वाटतंय की ही सीरियल संपवायची म्हणून सगळी घाई आहे. जसं काही मालिकाकर्त्यांना काही पडलेलीच नाहीये," याचिकेवर सही करणाऱ्या एका व्यक्तीने लिहिलं.

गेम ऑफ थ्रोन्स

फोटो स्रोत, HBO

अर्थात आठवा सीझन पुन्हा बनवणं HBO ला परवडण्यासारखं नाहीये कारण प्रत्येक भाग शूट करण्याची किंमत 15 दशलक्ष डॉलर्स आहे असं म्हटलं जातं.

दुसरं म्हणजे असं असतानाही या सीरियलची प्रेक्षकसंख्या 'छप्पर फाड के' वाढली आहे. HBO च्या मते नुकताच प्रदर्शित झालेला एपिसोड जगात 18.4 दशलक्ष लोकांनी पाहिला.

"या सीरियलच्या शेवटावरून वाद-प्रतिवाद होतील अशी आम्हाला कल्पना होतीच", असं सीरियलचे क्रिएटर डेव्हिड बेनिऑफ आणि डीबी वेस यांनी मान्य केलं आहे.

"कोणत्याही चांगल्या कथेचा शेवट चांगला नसेल तर ती कथा चांगली राहात नाही," असं बेनिऑफ यांनी एटंरटेनमेंट वीकली या साप्ताहिकला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. "हो, त्यामुळे आम्हाला काळजी होतीच."

याबद्दल HBO चं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने त्यांच्याशी संपर्क साधला आहे.

या सीरियलचा शेवटचा भाग येत्या रविवारी प्रदर्शित होईल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)