नोत्र दाम : येशूंचा काटेरी मुकूट आणि बहुमूल्य वस्तूंबद्दल चिंता

भीषण अशा आगीत पॅरिसमधील 850 वर्षं जुन्या कॅथेड्रल नोत्र दाम हे चर्च आगीच्या भक्षस्थानी पडलं. आगीत या चर्चचं मुख्य छत आणि एक मनोरा कोसळून पडला. या आगीमुळे या उर्वरित वास्तूलाही धोका निर्माण झाला आहे.

शहराचे उपमहापौर इमॅनुएल ग्रेग्वार यांनी म्हटलं आहे, "चर्चचं फार मोठ नुकसान झालं आहे. चर्चमध्ये बऱ्याच अनमोल वस्तू आहेत, त्या बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आहे."

या चर्चवरची लाकडी कलाकुसर जळून खाक झाली आहे. 850 वर्ष जुन्या या चर्चमध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत, ज्यामुळे हे चर्च पॅरिसमधील सर्वांत शानदार वारसास्थळ बनलं आहे?

रोज विंडो :

चर्चमध्ये 13व्या शतकात बनवण्यात आलेल्या 3 गुलाबांच्या आकृतीच्या खिडक्या आहेत. हे या चर्चचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य आहे.

सर्वांत लहान खिडकी मुख्य दरवाजासमोर आहे. ही 1225साली बनली आहे. दगड आणि काच यांचा वापर करून बनवण्यात आलेली ही खिडकी अत्यंत सुंदर आहे. दक्षिणेकडे असलेल्या खिडकीचा व्यास 43 फूट असून त्यात 84 पॅनल आहेत. चर्चचे प्रवक्ते एंड्रे फिनट यांनी एक वृत्तवाहिनाला सांगितलं की या खिडक्यांना आगीत काही झळं बसली नसावी, पण इमारतीला झालेलं नुकसान लक्षात घेता आम्हाला त्यांच्याबद्दल काळजी वाटू लागली आहे.

दोन टॉवर

इथं येणारे पर्यटक चर्चच्या 2 गोथिक टॉवरना आवर्जून भेट देतात. चर्चच्या पश्चिम दिशेची दर्शनी बाजू म्हणजे हे टॉवर आहेत. या भागाचं काम 1200 साली सुरू झालं. दोन्ही टॉवरची उंची 68 मीटर आहे तसेच त्यात 387 इतक्या पायऱ्या आहेत. या टॉवरवरून पॅरिसचं मनोहारी दर्शन होतं.

गार गोयल

या टॉवरच्या जिन्यावरून वर गेलं की तिथून संपूर्ण पॅरिस दिसतं.

पण इथं पोहचताना चर्चमधील आणखी एक वैशिष्ट्य नजरेला पडतं ते म्हणजे गार गोयल होय. गार गोयल एक मिथक आहे. अनेक प्राण्यांच्या आकृत्या वापरून या मूर्त्या बनवल्या आहेत. सर्वांत प्रसिद्ध गार गोयल चर्चच्या अगदी वरच्या भागावर असून तो शहराकडे पाहात आहे, असं दिसतं.

घंटा

चर्चमध्ये 10 मोठ्या घंटा आहेत. सर्वांत मोठ्या घंटेचं वजन 23 टन आहे. ती 1685ला बनवण्यात आली. या घंटेचं नाव इमॅन्युएल असं आहे. 2013ला या चर्चच्या उत्तर भागातील घंटांची दुरुस्ती झाली होती.

या प्रत्येक घंटेला संतांची नावे दिली आहेत. मूळ घंटा फ्रान्सच्या क्रांतीवेळी तोफांचे गोळे बनवण्यासाठी वितळवण्यात आल्या होत्या.

गोथिक मनोरे

या आगीत चर्चचा सर्वांत उंच मनोरा कोसळला. हा मनोरा 12व्या शतकात बनला होता. या इमारतीत बरेच बदल झाले आहेत. फ्रान्सच्या राज्यक्रांतीत या चर्चवरही हल्ले झाले होते. त्यानंतर 1860ला चर्चची पुनर्बांधणी झाली.

रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्टसनं म्हटलं आहे की या चर्चचं छत आणि मनोर कोसळणं हे फ्रान्सच्या गोथिक शैलीचं मोठं नुकसान आहे.

अनेक वस्तू

येशू ख्रिस्तांशी संबंधित असलेल्या अनेक वस्तू आहेत. इथं एक काटेरी मुकूट आहे. येशू ख्रिस्तांना सुळावर चढवण्यात आलं, त्यावेळी त्यांनी त्यांना हा मुकूट घालण्यात आला होता, अशी आख्यायिका आहे. या आगीपासून हा मुकूट वाचवण्यात आला आहे, असं सांगण्यात आलं.

पॅरिसचे महापौर एने हिडाल्गो म्हणाले, "चर्चमधील अनेक बहुमूल्य वस्तूंना वाचवण्यात आलं आहे. अग्निशमन दल, पोलीस, चर्चमधील कर्मचारी यांनी यासाठी मोठे परिश्रम घेतले."

चर्चच्या भिंतीवर अनेक दुर्मिळ पेटिंग आहेत, त्यांना खाली उतरवणं कठीण आहे अशी माहिती बीबीसीला अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

या चर्चमध्ये काही वाद्यं आहेत. त्यातील एक 8000 पाईपचा ग्रेड ऑर्गन आहे, तो 1401मध्ये बनवला आहे. हे सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)