ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलेल्या अत्याचाराला तेव्हाचे 'वातावरण' जबाबदार - माजी पोप

60 च्या दशकात लैंगिक स्वातंत्र्याचा पुरस्कार झाला, त्यामुळे वातावरण बिघडलं आणि त्यातूनच ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लैंगिक अत्याचार केले असं विधान माजी पोप बेनेडिक्ट (सोळावे) यांनी केलं.

गेल्या काही वर्षांमध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लहान मुलांवर तसेच महिलांवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्या घटना का घडल्या याची कारणं माजी पोप बेनेडिक्ट सोळा यांनी दिली आहे. जर्मन कॅथलीक नियतकालिक 'क्लेरुसब्लाट'ने पोप यांचं 5,500 शब्दांचं पत्र छापलं आहे.

लैंगिक स्वातंत्र्याच्याच पुरस्कारामुळे कॅथलीक परंपरा भ्रष्ट झाली आणि या परंपरेत समलैंगिकतेचा शिरकाव झाला असं माजी पोप यांनी म्हटलं आहे.

80 च्या दशकापर्यंत लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होण्याचं प्रमाण फारसं नव्हतं पण नंतर ते वाढलं. ही स्थिती ईश्वराच्या अनुपस्थितीमुळे उद्भवली असं ते म्हणाले.

येशू ख्रिस्ताच्या मार्गावर चालणं आणि त्याच्यावर निस्सीम प्रेम करणं हाच लैंगिक अत्याचाराच्या समस्येवरील एकमेव उपाय असल्याचं माजी पोप म्हणाले. पूर्वीच्या काळात लैंगितकेबाबत असलेले मान्य संकेतांचा ऱ्हास झाला असं पोप यांनी म्हटलं आहे.

नैतिक पातळी पूर्णपणे घसरल्यामुळे लैंगिक स्वैराचाराला चालना मिळाली आणि त्यातून विविध ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्याचं पोप यांनी म्हटलं आहे. 1960 नंतर समाजात लैंगिक स्वातंत्र्याचा पुरस्कार वाढला. त्यामुळे वातावरण बिघडलं आणि काही ख्रिश्चन मिशनरी समलैंगिक बनले.

बेनेडिक्ट यांनी 2013मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सहाशे वर्षांच्या परंपरेत ते पहिलेच पोप आहेत ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यानंतर फ्रान्सिस हे पोप बनले. बेनेडिक्ट यांनी आपल्या पत्रात पोप फ्रान्सिस यांचे आभार मानले आहेत.

2018 साली पोप फ्रान्सिस यांनी एक पत्र लिहिलं होतं. त्यात ते म्हणाले होते की लहान मुलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी आपण योग्य वेळी पावलं उचलली नाहीत. आपण लहान मुलांना टाकून दिल्याप्रमाणे वागलो अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)