न्यूझीलंड घटनेनंतर नेदरलँड्समध्ये ट्राममध्ये अंधाधुंद गोळीबार; तीन ठार

गोकमन टानिस या व्यक्तीच्या शोधात आहेत.

फोटो स्रोत, @POLITIEUTRECHT / TWITTER

फोटो कॅप्शन, गोकमन टानिस या व्यक्तीच्या शोधात आहेत.

नेदरलँड्सच्या युट्रेट शहरात एका ट्राममध्ये झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी झाले.

हा दहशतवादी हल्ला असू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली असून गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा दहशतवादविरोधी पथक कसून शोध घेत आहेत.

याप्रकरणी पोलीस टर्कीच्या 37 वर्षीय गोकमन टानिस या व्यक्तीच्या शोधात आहेत. संबंधित व्यक्तीशी कोणीही संपर्क करू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

"हा दहशतवादी हल्ला आहे की नाही हे सांगता येणार नाही. अन्य ठिकाणीही गोळीबार झाला आहे. परंतु आता ठोस काही सांगता येणार नाही," असं नेदरलँड्सच्या दहशतवादविरोधी पथकाचे समन्वयक पीटर जाप आलबर्सबग यांनी सांगितलं.

युट्रेट शहराच्या महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार सकाळी पावणेअकराच्या सुमारास 24 ऑक्टोबरप्लेइन जंक्शन परिसरात हा गोळीबार झाला. मदतीसाठी तीन हेलिकॉप्टर्स पाठवण्यात आली आहेत.

नेदरलँड्स

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, घटनास्थळानजीकचं दृश्य

पंतप्रधान मार्क रट यांनी या घटनेने अतीव दु:ख झाल्याचं म्हटलं आहे. "आम्ही या हल्ल्याने हादरलो आहोत. हे भयानक आहे," असं ते म्हणाले.

एका प्रत्यक्षदर्शीने NU.nl या नेदरलँड्सच्या न्यूज वेबसाईटशी बोलताना सांगितलं की एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली.

गोळीबारात जखमी झालेल्या एका महिलेला पाहिल्याचं अन्य एका व्यक्तीने सांगितलं. या महिलेच्या हातावर आणि कपड्यांवर रक्ताचे डाग होते, असंही प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

मी तिला माझ्या गाडीतून हॉस्पिटलच्या दिशेने नेलं, असं मदत करणाऱ्या माणसाने सांगितलं. पोलीस मदतीसाठी आले तेव्हा ही महिला बेशुद्धावस्थेत होती, असं या व्यक्तीने सांगितलं.

जिथे घटना झाली ती जागा
फोटो कॅप्शन, जिथे घटना झाली ती जागा

युट्रेट विद्यापीठाच्या मेडिकल सेंटरला आपत्कालीन विभाग गोळीबारात जखमी झालेल्यांसाठी खुला करण्याचे आदेश सुरक्षा विभागाने दिले आहेत.

दरम्यान, शहरातील ट्राम वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे. मदतकार्यात अडथळा येणार नाही म्हणून परिसरात गर्दी करू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

युट्रेट शहरातील ट्राम स्टेशनच्या जवळ असलेल्या चौकात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)