उत्तर कोरियातल्या जगावेगळ्या संसदेच्या निवडणुकीबाबत तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
उत्तर कोरियाची जनता सत्तेत असलेल्या किम जाँग-उन सरकारला पुन्हा सत्तेत निवडून देणार आहे. मतदान करणं त्यांचा अधिकार आहे खरा, पण त्यांच्यापुढे उमेदवार एकच आहे - अर्थातच किम जाँग-उन.
उत्तर कोरियात Supreme People's Asssembly (SPA) साठी मतदान करणं बंधनकारक असतं आणि तिथं उमेदवारांचा कोणताही पर्याय उपलब्ध नसतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विरोध होत नाही.
किम जाँग-उन सत्तेत आल्यापासून अशा प्रकारची ही दुसरी निवडणूक आहे. मतदानाची टक्केवारी कायम 100 टक्क्यांच्या जवळपास असते. तसंच सत्ताधारी पक्षासाठी सगळ्यांची संमती असते.
संपूर्ण जगापासून अलिप्त राहिलेल्या उत्तर कोरियावर किम घराण्याची एकहाती सत्ता आहे. नागरिकांना या कुटुंबाप्रति आणि नेत्याप्रति निष्ठा दाखवावी लागते.
निवडणुका कशा होतात?
17 वर्षं पूर्ण झालेल्या किंवा त्यापेक्षा मोठ्या लोकांना मतदानाच्या दिवशी मतदान करणं बंधनकारक असतं.
"आपण राष्ट्राप्रति निष्ठा दाखवण्यासाठी लवकरात लवकर मतदान करावं, अशी अपेक्षा असते. त्यामुळे तिथे मोठ्या रांगा लागण्याची परिस्थिती ओढवते," असं उत्तर कोरियाचे निरीक्षक फ्योडॉर टर्टिटस्की यांनी सांगितलं. ते दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये राहतात.
तुमची पाळी आली की तुमच्या हातात एक बॅलेट पेपर दिला जातो. त्यावर फक्त एकच नाव असतं. बाकी तिथे काहीही माहिती भरायची नसते. कोणत्याही चौकोनात टिकमार्क करायचं नसतं. तो कागद घ्यायचा आणि बॅलट बॉक्समध्ये टाकायचा. ही पेटी मोकळ्या जागेत ठेवलेली असते.
एक केंद्र असंही असतं जिथे तुम्ही खासगीत मत देऊ शकता. पण असं केलं तर तुमच्यावर लगेचच संशय घेतला जातो, असं निरीक्षक सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
कागदोपत्री तुम्हाला त्या एक उमेदवारच्या नावावर फुली मारण्याचाही अधिकार असतो. मात्र टर्टिटस्की यांच्या मते असं केलं तर गुप्त पोलीस तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुम्हाला वेडं घोषित केलं जातं.
मतदान केंद्राच्या बाहेर पडलं की तिथे काही लोक उभे असतात. ते उमेदवाराचा उत्साह वाढवतात. आपण देशाच्या अत्यंत उत्तम नेतृत्वाला मत दिलं आहे, याबाबत तिथं जाऊन आनंद व्यक्त करणं अपेक्षित असतं.
"सरकारी प्रसारमाध्यमांमध्ये निवडणूक एखादा सण असल्यासारखं भासवलं जातं. लोक मतदान केंद्राच्या बाहेर आनंद साजरा करताना दाखवतात," असं NK न्यूजचे मिन्याँग ली सांगतात. NK न्यूज ही उत्तर कोरिया केंद्रित बातम्या देणारी वेबसाईट आहे.
मतदान बंधनकारक असल्यामुळे लोकसंख्या मोजण्याचाही तो एक मार्ग आहे. यानिमित्ताने प्रत्येक मतदारसंघाची लोकसंख्या मोजून जे लोक चीनला पळून गेले त्यांची माहिती मिळू शकते.
संसदेला काय अधिकार आहेत?
उत्तर कोरियाची संसद ही नामधारी असून तिथल्या संसदेला काहीही अधिकार नाहीत.
दर पाच वर्षांनी ही निवडणूक होते. उत्तर कोरियात संसद हे एकमेव विधिमंडळ आहे.
"मला कल्पना आहे की आंतरराष्ट्रीय माध्यमांना असं वाटतं की इथल्या संसदेला काही अधिकार आहेत. मात्र ते खोटं आहे. संसदेला काहीही अधिकार नाहीत," असं टर्टिटस्की म्हणाले.
इथले कायदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून लिहिले जातात. संसद फक्त औपचारिक मंजुरी देते.
कागदोपत्री बघायला गेला तर संसदेला बरेच अधिकार आहेत. तिथली घटना बदलण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत लागतं. त्याचप्रमाणे किम जाँग-उन यांना सत्तेतून बेदखल करण्यासाठी अगदी नाममात्र बहुमताची गरज आहे.
या संसदेची फारशी अधिवेशनंही होत नाहीत. पहिल्या बैठकीतच कार्यकारी मंडळाची नियुक्ती होते. त्यानंतर संसदेची अधिवेशनं होतही नाहीत.
तिथे वेगवेगळे पक्ष आहेत का?
तुम्हाला असं वाटत असेल की तिथे एकच पक्ष आहे. मात्र प्रत्यक्षात तिथल्या संसदेत तीन महत्त्वाचे पक्ष आहेत.
किम जाँग-उन अध्यक्ष असलेला मजूर पक्ष हा तिथला सगळ्यांत मोठा पक्ष आहे. मात्र काही जागांवर सोशल डेमोक्रॅटिक पक्ष आणि चोंडॉइस्ट चोंगू पार्टी या पक्षांचेही लोक आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
प्रत्यक्षात या तीन पक्षांत तसा काहीच फरक नाही. डेमोक्रॅटिक आघाडी स्थापन करून कोरियाच्या एकत्रीकरणासाठी ते एकत्र आले आहेत.
निकाल काय लागतील?
निकालांबाबात फारशी उत्सुकता असण्याचं काहीच कारण नाही. येत्या काही दिवसांत अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.
सगळ्यांत आधी मतदानाच्या आकर्षक आकडेवारीची घोषणा होते. 2014 मध्ये ही टक्केवारी 99.97% होती.
काही लोकांनी कदाचित आजारपणमुळे मतदान केलं नसेल. मतदानाच्या दिवशी कुणीही आजारी पडत नाही किंवा मरत नाही असा विनोद इथे प्रचलित आहे.

फोटो स्रोत, Getty Images
याचा पुढचा टप्पा असा आहे की किम जाँगच्या मतदारसंघाचे आकडे जारी केले जातात. मतदानाचा आकडा आणि पाठिंबा दोन्ही 100 टक्के असतो.
शेवटी इतर मतदारसंघातले आकडे जारी होतात. मतदानाचा आकडा कमी होऊ शकतो. मात्र प्रत्येक मतदारसंघातल्या उमेदवाराला मिळणारा पाठिंबा 100 टक्के असतो.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








