इस्त्रायल हल्ला: सीरियातील इराणच्या तळांवर इस्रायलने हल्ले का केले?

इस्रायलच्या लष्कराने सीरियातील इराणच्या तळांवर हल्ले सुरू केले आहेत. इस्रायलच्या लष्करानेच ही माहिती दिली आहे. इराणियन रिव्होल्युशनरी गार्डची शाखा असलेल्या कद्स फोर्सवर हल्ले केल्याचं इस्रायल डिफेन्स फोर्सने म्हटलं आहे.

या संदर्भात अधिक माहिती देण्यात आली नसली तर सीरियाची राजधानी दमास्कसच्या आजूबाजूला सोमवारी सकाळी हल्ले झाल्याचं वृत्त आहे.

तर सीरियन माध्यमांनी इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे इस्रायल डिफेन्स फोर्सने रविवारी गोलन हाईटवर सीरियाचं रॉकेट पाडण्यात आल्याचं म्हटलं आहे.

युनायटेड किंगडममधील सीरियन ऑब्जर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्स या संस्थेने इस्रायलचे रॉकेट दमास्कसच्या परिसरात हल्ले करत असल्याचं म्हटलं आहे.

याच संस्थेने सीरिया हे रॉकेट पाडण्यासाठी क्षेपणास्त्र डागत असल्याचं म्हटलं आहे.

दमास्कसमधील प्रत्यक्षदर्शींनी आकाशात मोठे स्फोट दिसून आल्याचं म्हटलं आहे.

सीरियाच्या आत हल्ले केल्याची कबुली सहसा इस्रायल देत नाही, त्यामुळे ही घटना महत्त्वाची मानली जात आहे.

मे 2018मध्ये इस्रायलने सीरियातील इराणच्या सर्व लष्करी पायाभूत सुविधा उध्वस्त केल्याचं म्हटलं होतं. सीरियात 2011ला नागरी संघर्ष सुरू झाल्यानंतरची इस्रायलची ही सर्वांत मोठी कारवाई होती. इस्राईलच्या गोलन हाईटमधील लष्करी तळांवर हल्ले झाल्यानंतर इस्रायलने ही कारवाई केली होती.

नेतन्याहू यांचा इशारा

उत्तर गोलन हाईटच्या दिशेने डागण्यात आलेले रॉकेट पाडण्यात आल्याचं इस्रायलने सांगितल्यानंतर ही कारवाई झाली आहे. इथलं माऊंट हेरमॉनवर हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. या घटनेनंतर ते बंद ठेवण्यात आलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, "इराणच्या सीरियातील तळांवर हल्ला करण्याचं आणि जे आम्हाला इजा पोहोचवतील, त्यांना इजा पोहोचवण्याचं आमचं धोरण आहे. "

गोलन हाईट आहे तरी काय?

द गोलन हाईट हे मोठं खडकाळ पठार असून ते सीरियाच्या नैऋत्य दिशेला आहे. या भागाला राजकीय आणि सामरिक दृष्टीनं मोठं महत्त्व आहे. 1967ला जे सहा दिवसांचं युद्ध झालं त्यावेळी इस्रायलने हा भाग सीरियाकडून स्वतःच्या ताब्यात घेतला. त्यानंतर इथल्या नागरिकांना हा भाग सोडून पलयान केलं. युद्धसंधीनंतर हा भाग इस्रायलच्या ताब्यात गेला.

1973ला सीरियाने हा भाग पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात इस्रायलच्या सैन्याचं मोठं नुकसान झालं पण इस्रायलने हा प्रयत्न हाणून पाडला. युद्धाविरामानंतर या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांचे निरीक्षक नेमण्यात आले आहेत. 1981ला इस्रायलने एकतर्फी हा प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतला आहे. याला आंतरराष्ट्रीय मान्यता नाही. या भागात 20 हजार ज्यू नागरिक आणि तितकेच सीरियाचे नागरिक आहेत.

या भागावरून दक्षिण सीरिया आणि दमास्कस पूर्ण दिसतो. 1948 ते 1967 या काळात हा भाग जेव्हा सीरियाच्या ताब्यात होता, तेव्हा सीरियाने इस्रायलवर इथून सतत हल्ले केले होते.

हा परिसर उंचावर असल्याने त्याचा लष्कराच्या दृष्टीने महत्त्व मोठं आहे. शिवाय हा परिसर जॉर्डन नदीसाठी पाणलोट क्षेत्र आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)