युरोपच्या काही भागाला हिमवादळाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत

हिमवादळ

फोटो स्रोत, EPA

जर्मनी आणि स्वीडनच्या काही भागात शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली. या बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. ट्रेनही बंद झाल्या. शाळाही बंद ठेवण्यात आल्या.

दक्षिण जर्मनीतील बॅवेरिया शहरात मोटरवेमध्ये अडकलेल्या चालकांना बाहेर काढण्यासाठी रेड क्रॉस संस्थेच्या स्वयंसेवकांची मदत घ्यावी लागली. तर झाड अंगावर पडून एका नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.

एका स्विस हॉटेलला हिमवादळाचा तडाखा बसला. तर स्वीडन आणि नॉर्वेमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे रस्त्यावरून वाहन चालवणेही अशक्य होऊन बसले. ऑस्ट्रियाच्या बचाव कर्मचाऱ्यांना छातीपर्यंत उंच बर्फातून वाट काढत जावे लागले.

श्लोसम्बान हॉटेलजवळ स्किईंग करताना बर्फाच्या डोंगरावरून उतल्याने 41 वर्षीय पोल भरकटले.

शुक्रवारी ऑस्ट्रियामध्ये बर्फवृष्टीपासून थोडा दिलासा मिळाला. त्यापूर्वी ऑस्ट्रियाच्या काही भागात तीन मीटरपर्यंत बर्फ पडला होता. या बर्फवृष्टीमुळे गेल्या आठवड्यात 7 जणांचा मृत्यू झाला. तर शनिवारपासून 2 गिर्यारोहक बेपत्ता आहेत.

"समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंचीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होण्याची घटना 30 ते 100 वर्षातून एकदाच घडते", अशी माहिती ऑस्ट्रियाच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेटरॉलॉजी अँड जिओडायनामिक्सचे अॅलेक्झांडर रॅडलर यांनी दिली आहे.

झाडांवर बर्फ पडल्याने रस्ते किंवा ट्रेनवर झाडं उन्मळून पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ऑस्ट्रियाच्या सैन्याने हेलिकॉप्टर पाठवून झाडांवरील बर्फ साफ करण्याचे काम सुरू केले आहे.

उत्तर स्वीडनमधील काही भागात थंडीच्या वादळाने धडक दिली आहे.

मदतकार्य

फोटो स्रोत, BERGRETTUNG BAD HOFGASTEIN

फोटो कॅप्शन, मदतकार्य

नॉर्वेच्या सीमेजवळील स्टेकेनजोकला 'जॅन' वादळाचा तडाखा बसल्याने तेथील एका भागात 49.7 प्रति सेकंद इतक्या भयंकर वेगाने वारे वाहत होते.

उत्तर नॉर्वेच्या एका ट्रक ड्रायव्हरने आपण आणि इतर काही वाहन चालक गुरुवारी पहाटे पाच वाजता डोंगरातून जाणाऱ्या रस्त्यात कसे अडकून पडलो, याची हकीकत सांगितली. आपण आपल्या गाडीच्या केबिनमध्ये अख्खी रात्र काढली तर इतर लोकंही आपापल्या कारमध्ये बसून होते, अशी माहिती मॅगनर निकलिसन यांनी दिली.

बॅवेरिया प्रांतात शुक्रवारी परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. हिमवृष्टीमुळे सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याची माहिती स्थानिक टीव्हीने दिली.

तेथील दक्षिण आणि पूर्व भागातील रेल्वे सेवा सर्वाधिक प्रभावित झाली. तर मोठ्या संख्येने झाडं पडल्यामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला होता.

हिमवादळ

फोटो स्रोत, EPA

म्युनिच शहरात बर्फाच्या वजनाने झाड पडल्याने नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. घटनेच्या चाळीस मिनिटांनंतर हा मुलगा सापडला आणि बचाव पथकाला त्याला वाचवता आले नाही.

दक्षिण-पूर्व भागातील सर्वात मोठा महामार्ग असलेल्या A8 ऑटोबॅनच्या दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे रोसेनहेमजवळ चालकांना गुरूवारची रात्र गाडीतच घालवावी लागली. रेड क्रॉस आणि सरकारी संस्था अडकलेल्या या वाहन चालकांच्या मदतीसाठी धावल्या.

ऑस्ट्रियाच्या सीमारेषेजवळील बर्चेस्टगेडनमधील रस्तेही बंद करण्यात आले. तर बर्फात अडकलेल्या शेकडो लोकांना वाचवण्यासाठी सैन्याने जवळपास 200 जवान पाठवले.

हिमवादळ

फोटो स्रोत, AFP

शुक्रवारी परिस्थितीत थोडी सुधारणा झाली. मात्र शनिवारी रात्री पुन्हा हिमवृष्टीचा इशारा वेधशाळेने दिला आहे. या वातावरणामुळे म्युनिचमध्ये जवळपास 90 तर फ्रँकफर्टमध्येदेखील काही उड्डाणं रद्द करण्यात आली.

स्वित्झर्लंडमध्ये एका रेस्टॉरंटला बसलेल्या हिमवादळात तिघे जखमी झाले. श्वागल्प पासला वादळ धडकलं त्यावेळी हे हिमवादळ 300 मीटर रुंद असल्याची माहिती स्थानिक मीडियाने दिली आहे.

शुक्रवारी हॉटेल सँटिसच्या भागात हिमवादळात कुणी अडकले नाही ना, हे तपासण्यासाठी बचाव पथकाने संपूर्ण भाग पिंजून काढला.

हिमवादळ

फोटो स्रोत, Reuters

कार बर्फाखाली गाडल्या गेल्या होत्या. तर बसदेखील अर्ध्या-अधिक बर्फात अडकल्या होत्या.

"भयंकर मोठा आवाज आला आणि त्या आवाजासोबतच हॉटेलच्या मागचा भाग बर्फाने झाकोळून गेला", असं या हॉटेलमध्ये थांबलेल्या एका गेस्टने सांगितले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)