You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गंमत नाही.. इथं टॉस करण्यासाठी बॅट वापरतात
ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश ट्वेन्टी-20 लीग स्पर्धेत पारंपरिक टॉसला फाटा देत 'बॅट टॉस' करण्यात आला.
टॉस- नाणेफेक, ओली सुकी हा क्रिकेट मॅचमधला अविभाज्य घटक. दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये नाणं उडवून टॉस केला जातो. दोन्ही कर्णधारांपैकी एक जण हेड्स किंवा टेल्स असं म्हणतो. ज्याच्या बाजूने कौल लागेल त्याला प्रथम बॅटिंग करायची का बॉलिंग याचा निर्णय घेण्याची संधी मिळते. खेळपट्टीचा नूर ओळखून हा निर्णय घेतला जातो. टॉसचं महत्व क्रिकेटविश्वात अतोनात आहे. अनेकदा टॉस जिंका, सामना जिंका असंही म्हटलं जातं. टॉसचा निर्णय आपल्याबाजूने लागला तर गोष्टी अपेक्षित अशा घडण्याची शक्यता प्रबळ होते.
1877 साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पहिली कसोटी खेळवण्यात आली होती. क्रिकेटविश्वातल्या या पहिल्या सामन्यापासून कॉइन टॉसची परंपरा आजतागायत सुरू आहे.
क्रिकेटच्या 141 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नाण्याने टॉस झाला नाही. ऑस्ट्रेलियात बिग बॅश ट्वेन्टी-20 लीग स्पर्धेचा आठवा हंगाम सुरू झाला. अडलेड स्ट्रायकर्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात सलामीचा सामना झाला. सामन्यापूर्वी एका खास बॅटद्वारे टॉस करण्यात आला. ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज सलामीवीर मॅथ्यू हेडनच्या हस्ते बॅट टॉस झाला. अडलेडचा कर्णधार कॉलिन इन्ग्रामने हा बॅट टॉस जिंकला
काय असतो बॅट टॉस?
दोन्ही कर्णधार आणि सामनाधिकारी यांच्या उपस्थितीत नाण्याऐवजी बॅट हवेत उडवण्यात येते. बॅट हवेत उडवल्यावर फ्लॅट्स का फ्लिप असं पाहुण्या कर्णधाराने म्हणायचं असतं. ज्याच्या बाजूने कौल लागेल त्या कर्णधाराला पहिल्यांदा बॅटिंग करायची का बॉलिंग याचा निर्णय घेण्याची संधी मिळते.
असा होतो बॅट टॉस
कुठे होतो बॅट टॉस?
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बॅकयार्ड क्रिकेटमध्ये म्हणजे परस-अंगणात होणाऱ्या अतिस्थानिक स्पर्धांमध्ये बॅट उडवून टॉस होतो. तिथूनच आता ही परंपरा स्वीकारण्यात आली आहे. क्रिकेटव्यतिरिक्त बेसबॉलमध्ये बॅट टॉस होतो.
'बिग बॅश स्पर्धा ऑस्ट्रेलियाची आहे. प्रेक्षकांना अपील होईल, आपलं वाटेल यादृष्टीने बॅट टॉसचा निर्णय घेण्यात आला', असं किम मॅक्कोनी यांनी सांगितलं.
नाण्याने होणाऱ्या टॉसमध्ये भेदभाव होतो?
कोलंबिया विद्यापीठात हाती घेण्यात आलेल्या संशोधनानुसार नाण्य़ाने होणाऱ्या टॉसचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. 3,900 वेळा नाण्यांद्वारे टॉस घेण्यात आला. 57 टक्के वेळा हेड्स बाजूनेच टॉस जिंकला. नाण्याद्वारे होणारा टॉस दोन्ही कर्णधारांना टॉस जिंकण्याची समान संधी देतो असं नाही. नाण्याद्वारे होणाऱ्या टॉसमध्ये एका संघाला झुकतं माप मिळण्याची संधी असते असाही विचारप्रवाह होता. बॅट टॉसचाही सविस्तर अभ्यास करण्यात आला. 58-48 असं प्रमाण हिल्स-फ्लॅट्सदरम्यान असल्याचं स्ष्ट झालं.
इलेक्ट्रिक बेल्स, हेल्मेट कॅमेरा, पर्सनल माइक
IPLच्या धर्तीवर सुरू झालेल्या बिग बॅश स्पर्धेत नेहमीच तंत्रज्ञानाचा आविष्कार सादर केला जातो. या स्पर्धेतच 2012 मध्ये झिंग बेल्सचा प्रयोग करण्यात आला. बॉलचा बेल्सशी संपर्क झाल्यानंतर त्यातून प्रकाश चमकतो. लाकडी बेल्समध्ये इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचं रोपण करण्यात आलं. रनआऊट्स तसंच स्टंम्पिंग्सच्या वेळी चमकणाऱ्या बेल्स उपयुक्त ठरण्यात आलं.
याच स्पर्धेत दोन्ही संघांपैकी काही खेळाडूंच्या हेल्मेटवर कॅमेरा बसवण्याची शक्कल संयोजकांनी लढवली. संपूर्ण स्टेडियमभर कॅमेरे बसवलेले असतातच. मात्र प्रत्यक्ष खेळपट्टीवरून दृश्य कसं दिसतं हे प्रेक्षकांना दाखवण्यासाठी ही क्लृप्ती योजण्यात आली.
सामन्याचे काही क्षण खेळाडूंना मायक्रोफोन दिला जातो. लेपक माइक यंत्रणा जर्सीत लावली जाते. काही ओव्हर्स खेळाडू मैदानावर धावता-पळता समालोचकांशी संवाद साधू शकतो.
केरी पॅकर वर्ल्ड सीरिज क्रिकेट ही क्रिकेटविश्वातली पहिलीवहिली व्यावसायिक लीग ऑस्ट्रेलियातच झाली होती. या लीगने क्रिकेटविश्वा ढवळून निघालं होतं. पहिला वनडे इन्डोअर सामनाही मेलबर्नच्या डॉकलँड्स स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. पिंक बॉलचा प्रयोगही पहिल्यांदा ऑस्ट्रेलियातच झाला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)