आकाशात अनोखा देश उभारण्याचा संकल्प; नागरिक होण्यासाठी 50 हजार अर्ज

अवकाश

फोटो स्रोत, asgardia.space

देश असा शब्द जरी उच्चारला तर नजरेसमोर पृथ्वीच्या पाठीवरील एखादा भूभाग येतो. पण अंतराळातही एक देश साकारला जात आहे. काही शास्त्रज्ञ यासाठी प्रयत्नशील असून अवकाशातील या नियोजिच देशाचं नाव Asgardia असं आहे. विशेष म्हणजे या देशात सहभागी होण्यासाठी 50 हजार लोकांनी आतापर्यंत अर्जही केले आहेत.

या 'देशा'चा पहिला उपग्रह पुढील वर्षी प्रक्षेपित केली जाणारा आहे, असं Asgardiaच्या वेबसाईटवर म्हटलं आहे. पृथ्वीच्या कक्षेतील ही खरीखुरी नो मॅन्स लॅंड असेल, असंही वेबसाईटवर म्हटलं आहे. या देशाला संयुक्त राष्ट्र मंजुरी देतील अशीही त्यांना आशा आहे.

पण काही तज्ज्ञांना मात्र हे व्यवहार्य वाटत नाही. आंतरराष्ट्रीय कायद्यांनी बाह्य अवकाशावर देशांना सार्वभौमत्व सांगता येत नाही, असा मुद्दा काही तज्ज्ञ मांडतात.

युरोपियन स्पेस एजन्सीसाठी 15 वर्षं काम केलेले संशोधक लेना द विन म्हणतात, ''Asgardiaचं नागरिकत्व मिळण्यापूर्वी लोकांच्या अर्जांची योग्य छाननी केली जाईल आणि नंतर त्यांना पासपोर्टही दिला जाईल.

त्या म्हणाल्या, "ज्या ठिकाणी तुम्ही पाय ठेऊ शकत नाही अशा देशाचे तुम्ही नागरिक कसे होऊ शकता, असं वाटणं सहाजिक आहे. ही कल्पनाच मुळात डोक्यात बसणं कठीण आहे."

"मी नेदरलॅंडची नागरिक आहे आणि आता पॅरिसमध्ये आहे. तुम्ही ज्या देशाचे नागरिक आहात, तिथं राहताच असं नाही," असं त्या म्हणाल्या.

ASGARDIA

फोटो स्रोत, ASGARDIA

फोटो कॅप्शन, ASGARDIA अवकाशातील नवा देश असेल.

व्हिएना येथील Aerospace International Research Center ही खासगी कंपनी या प्रकल्पाचं संचलन करत आहे. या कंपनीची स्थापना रशियातील संशोधक आणि उद्योगपती डॉ. इगर अशरबेली यांनी केली आहे.

पॅरिसमध्ये त्यांनी या प्रकल्पाची घोषणा केली. पत्रकार मला मूर्ख रशियन शास्त्रज्ञ म्हणतील, असं ते म्हणाले.

पृथ्वीवरील देशांच्या कायद्यांपासून मुक्त असं हे ठिकाण असेल, असं ते म्हणाले.

या प्रकल्पामुळे पृथ्वीवरील सर्व लोकांसाठी व्यवसाय आणि विज्ञानात अनेक संधी निर्माण होतील, असा दावा या कंपनीनं केला आहे.

या देशाचं राष्ट्रगीत आणि ध्वज ठरवण्यासाठी स्पर्धाही घेतली जात आहे.

लंडन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस पॉलिसी अँड लॉ या संस्थेचे संचालक प्रा. सेड मॉस्टेशर या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय कायद्यांनी कशी परवानगी मिळेल यावर शंका उपस्थित केली.

ASGARDIA

फोटो स्रोत, ASGARDIA

फोटो कॅप्शन, ASGARDIA सहभागी होण्यासाठी 50 हजार अर्ज आले आहेत.

"सर्व राष्ट्रांनी The Outer Space Treaty मान्य केली आहे. बाह्य अवकाशावर कोणाचीही मालकी असणार नाही, हे सर्वांनी स्वीकारलं आहे. " असं ते म्हणाले.

ते म्हणाले, "Asgardia कोणत्याही स्वयंशासित देशाशी संबंधित नाही. याचे नागरिक पृथ्वीवर राहतील, त्यामुळे याला मान्यता मिळण्याची शक्यता कमी आहे. "

या प्रकल्पात सध्या फक्त एकाच व्यक्तीने पैसा पुरवला आहे. पण भविष्यात निधीसाठी Crowdfundingचा वापर होणार आहे.

मॉस्टेशर म्हणतात यावरून या प्रकल्पाकडे विश्वासार्ह व्यावसायिक मॉडेल नाही, असं दिसतं.

इगर अशरबेली म्हणतात, "आम्ही अवकाशात नवीन कायदेशीर चौकट बनवू. आम्ही प्रचलित कायदे स्वीकारून हे करणार आहोत. नव्या जगाच्या अवकाश संशोधनाला योग्य असं हे कायदे असतील."

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)