गांजाची दुकानं उघडली आणि लोकांची झुंबड उडाली

गांजाच्या अधिकृत वापरास परवानगी देणारा कॅनडा हा उरुग्वेनंतर जगातला दुसरा देश ठरला आहे.

बुधवारी मध्यरात्री देशभरात गांजाचा बाजार सुरू झाल्यानंतर आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्थेसंबंधीच्या चर्चेला उधाण आलं आहे.

सरकारने गांजा विकायला परवागनी दिली आणि कॅनडाच्या एका बेटावर मध्यरात्रीपासूनच दुकानांवर लोकांची झुंबड उडाली.

गांजाचा वापर आणि व्यापार यासंबंधींचे कायदे आणि जागरुकता यांविषयीची माहिती जवळपास 15 दशलक्ष कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे.

असं असलं तरी कॅनडातली पोलीस यंत्रणा यासाठी सज्ज आहेत का, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

उरुग्वे या देशानं सर्वप्रथम गांजाच्या वापराला परवानगी दिली होती तर पोर्तुगाल आणि नेदरलँड या देशांनी गांजा बाळगण्याला अपराधमुक्त केलं आहे.

गांजावरील बंदी उठवण्याकरता कॅनडातली वेगवेगळी राज्य आणि नगरपालिका प्रशासन गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी करत होते.

गांजाचा वापर आणि व्यापार याची पूर्ण जबाबदारी क्षेत्रीय विभागांकडे देण्यात आली आहे. गांजाच्या वापरासाठी संपूर्ण देशभरात कायदा लागू करण्यात आला आहे.

कॅनडातल्या Newfoundland या क्षेत्रामधलं दुकान गांजाची अधिकृत विक्री करणारं पहिलं दुकान ठरलं आहे.

संसदेनं दिली होती मंजूरी

जून महिन्यात कॅनडाच्या संसदेनं देशभरात मारिजुआनाच्या म्हणजेच गांजाच्या मनोरंजक वापराला मान्यता दिली होती. कॅनाबिस अॅक्ट हे विधेयक संसदेत चर्चेला आल्यानंतर त्यावर मतदान होऊन 52 विरुद्ध 29 अशा मतांच्या फरकानं ते मंजूर करण्यात आलं होतं.

गांजाची लागवड, त्याचं वितरण आणि विक्री याचं नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे. येत्या सप्टेंबरपासून कॅनडातल्या नागरिकांना गांजाची खरेदी आणि वापर करता येणार आहे.

असा निर्णय घेणारे G7 राष्ट्रांमधलं कॅनडा हे पहिलंच राष्ट्र आहे.

गांजा बाळगणं 1923 मध्ये कॅनडात गुन्हा ठरवण्यात आलं होतं. 2001मध्ये त्याच्या वैद्यकीय वापरास कायदेशीर मान्यता देण्यात आली होती.

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ट्वीट करून या निर्णयाचं स्वागत केलं.

सरकारचा हा निर्णय सगळ्यांनाच मान्य नाही. विरोधी पक्ष आणि काही गटांनी या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवला असून चिंताही व्यक्त केली आहे.

हे कसं झालं?

कॅनडातल्या नागरिकांनी 2015मध्ये गांजावर 4.5 अब्ज अमेरिकन डॉलर खर्च केल्याचा अंदाज आहे. कॅनडात वाईनवर झालेल्या खर्चाएवढीच ही रक्कम आहे.

गांज्या अधिकृत विक्रीमुळे देशाच्या महसूलात 400 दशलक्ष डॉलरची वाढ होईल असं सरकारला वाटतं.

सप्टेंबरच्या मध्यापर्यंत कॅनडात विविध ठिकाणी परवानाधारक उत्पादकांना भांग आणि गांजाची विक्री करता येईल. शिवाय, परवानाधारक उत्पादकांकडून ऑनलाइनही मागवता येईल.

प्रौढ व्यक्तीला 30 ग्रॅम एवढा गांजा सोबत बाळगता येणार आहे. सर्वसाधारणपणे गांजा सेवनासाठी किमान वय 18 ठेवण्यात आलं आहे, तर काही प्रांतांमध्ये ते 19 वर्षं आहे.

जस्टिन ट्रुडो यांनी 2015च्या निवडणूक प्रचारात असा कायदा करण्याचं आश्वासन दिलं होतं. बहुसंख्य कॅनेडियन नागरिक गांजाचा वापर कायदेशीर करण्याच्या बाजूने होते.

गांजा बाळगणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्यासाठीच्या कायद्याचा वापर कॅनडात मोठ्या प्रमाणात होत होता, अशी भूमिका ट्रुडो यांनी वेळोवेळी मांडली होती.

डिसेंबर-2013मध्ये उरुग्वेनं सर्वप्रथम गांजाच्या वापराला कायदेशीर मान्यता दिली. अमेरिकेच्या काही प्रांतांतही मनोरंजनासाठी गांजा वापरण्यास परवानगी आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)