इम्रान खान यांची दुसरी पत्नी आणि काळ्या जादुचं गौडबंगाल

- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
विल्यम काँग्रीव नावाच्या एका ब्रिटिश नाटककारानं 1697 साली लिहलेल्या 'द मॉर्निंग ब्राइड' या नाटकात एक चपखल वाक्य लिहलं होतं, "हेवन हॅज नो रेज लाइक लव टू हेट्रेड टर्न्ड, नॉर हेल अ फ्यूरी लाइक अ वुमन स्कॉर्न्ड." ज्याचा अर्थ होतो, त्वेषाने चिडलेल्या स्त्रिचा संताप हा अगदी नरकातील कोणत्याही यातनेपेक्षा महाभयंकर असतो.
काँग्रीव यांच्या संवादातील या ओळी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची दुसरी पत्नी, रेहाम खान हिच्याबाबतीत तंतोतंत खऱ्या आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. इम्रान खान यांच्याशी विभक्त झाल्यानंतर अनेक वर्षांनंतर आलेल्या तिच्या आत्मकथनपर पुस्तकानं भारत, पाकिस्तान आणि ब्रिटनमध्ये अक्षरशः खळबळ माजवली आहे.
रेहाम खान यांची कहाणी सुरू होते लीबियामध्ये. 1973 साली एका पाकिस्तानी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील नय्यर रमजान हे कान-नाक-घसा यांचे सर्जन होते. वडिलांविषयीची रेहामच्या मनात ठसलेली सगळ्यात सुंदर आठवण म्हणजे- तिच्या आईला वडील नेहमी 'डार्लिंग' नावाने हाक मारत.
रेहाम सांगतात, "आपण पालकांना अनेकदा नीटसं समजून घेत नाही, तेसुद्धा माणूस आहेत किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वातही एक रोमँटिक बाजू असू शकते. कित्येक दिवस तर वडील काय बोलतात हे आम्हाला कळतच नसे. कळू लागल्यावरही त्यांनी असे आईला 'डार्लिंग' म्हणणे आमच्यासाठीही थोडे धक्कादायकच होते. पण इतकेच नाही तर ते घरी आले की सगळ्यांत आधी आईचं चुंबनही घेत असत."
"पाकिस्तानच्या पारंपरिक वातावरणात, जिथं भावभावनांचं असं मोकळेढाकळं व्यक्त होणं तितकंसं प्रशस्त मानलं जात नाही, अशा संस्कृतीत वडिलांचं वागणं थोडं भुवया उंचवायला लावणारंच होतं. मी मुद्दाम हे सांगणं पसंत करते, कारण पाकिस्तानी लोकांच्या, विशेषतः पुरूषांच्याबाबत माझं असं निरीक्षण आहे की इथले पुरूष दुसऱ्यांच्या बायकांशी भलेही आदरानं बोलतील, मात्र स्वतःच्या बायकोला तितका मान देणार नाहीत. कदाचित भारतातही अशीच स्थिती असावी."

फोटो स्रोत, Reham Khan
रेहाम खान किशोरावस्थेतही खूपच बडबडी आणि धडाडीची होती. कॉलेजात असताना अनेकदा ती मुलींच्या घोळक्यात धीटाईनं बोलत असे! त्यामुळे झालं असं की तिच्या मित्र-मैत्रिणींनी तिचं 'मोर' असं नामाभिदान करून टाकलं होतं. मोर म्हणजे पश्तू भाषेत - आई.
जेव्हा ती थेट शाळेत कंडोम घेऊन दाखल झाली
त्यावेळच्या आठवणींबद्दल रेहाम भरभरून बोलतात, "मी खूपच समंजस होते, घरातही आणि मित्रमंडळींमध्येही. आजकाल 'अगोनी आँट' हा जो इंग्रजीतला शब्दप्रयोग केला जातो ना, तसाच आपुलकीचा सल्ला देण्याची भूमिका मी पार पाडत असे. जवळपास नेहमी मी मुलींमध्ये असले की त्यांच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक समस्यांविषयी शंकासमाधान करण्याच्या कामी गर्क असे तेही कुठल्याही आवेशाशिवाय, अगदी सहज."
"मला आठवतंय, त्याप्रमाणे नववीत असताना, माझ्या मैत्रिणींनी खूप हट्ट केला म्हणून कंडोम घेऊन मी थेट शाळेत पोहोचले होते! झालं असं, की माझे वडील अफगाणी निर्वासितांसाठी मोफत वैद्यकीय शिबीरांचं आयोजन करत. त्यामुळे त्यांच्या कपाटात कंडोमचे मोठे-मोठे बॉक्स असेच पडलेले असत. लहानपणी तर आम्ही त्यांचा उपयोग फुगे म्हणून खेळायलाही करत असू, हे न जाणता की या वस्तूचा खरा उपयोग काय आहे?"
या पाठोपाठ स्त्रियांविषयीचा अत्यंत गंभीर मुद्दा त्या छेडतात. "खूपच आश्चर्यकारक गोष्ट आहे, की आपल्या समाजात मुलींच्या लग्नाची घाई असते, अगदी 17-18 व्या वर्षीच मुलीला बोहल्यावर चढवलं जातं. पण लग्नानंतर तिला कशाला सामोरे जायचं आहे याची कोणतीच पूर्वकल्पना तिला दिली जात नाही. सेक्स, संबंध वा गर्भनिरोधक याबद्दल अवाक्षरही तिला सांगितलं जात नाही... त्यावेळी मी लोकांची हुबेहुब नक्कल करत असे. बेनजीर भुत्तो यांचं अगदी जोशपूर्ण आणि ओघवते भाषण त्यांच्याच शैलीत मी करत असे, तेव्हा मुलींची नुसती गर्दी माझ्याभोवती जमत असे. आणि आता जेव्हा याच गोष्टी मी पुस्तकात लिहल्या तेव्हा माझ्या याच सख्या माझ्यावर टीका करत आहेत."
फक्त 19 वर्षांच्या कोवळ्या वयात, तिच्यापेक्षा 16 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या आत्याच्या मुलानं, एजाज रहमान यानं त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तिच्या आई-वडिलांनी आनंदाने या प्रस्तावावर होकार कळवला. मात्र दुर्दैवानं पहिल्या दिवसापासूनच या लग्नात काही सुरळीत झालंच नाही, उलट रेहामला अनेकदा घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला.
तरी रेहाम याचीही प्रांजळ कबुली देतात की त्यांच्या पहिल्या नवऱ्याला आपली पत्नी एक आदर्श आणि निपुण स्त्री असावी अशी खूप इच्छा होती, मात्र त्याहून अधिक तीव्र इच्छा होती ती पत्नीला नेहमी आपल्या ताब्यात ठेवण्याची. पत्नीवर अंकुश ठेवणं अधिक महत्त्वाचं होतं.
13 वर्षांनी घेतला तलाक़
रेहाम सांगतात, "कोणी तुमच्यावर हात उचलेल किंवा काही वस्तू फेकून मारेल फक्त तेव्हाच ती घटना घरगुती हिंसाचार असते असे नाही. तर कुणीतरी सतत तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, तर हीसुद्धा हिंसाचाराची सुरूवातच म्हणायला हवी. हिंसाचार करणारा आधीच नियंत्रण ठेवू पाहणाऱ्याला जोखून घेतो. समोरचा किती सहन करू शकतो हे जाणतो. म्हणूनच लहान वयाच्या मुली हिंसाचाराला बळी पडण्याचं प्रमाण अधिक आहे. माझ्याबाबतीत सांगायचं तर मला लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच, अगदी पहिल्या तासापासूनच 'जे चालंलय ते बरं नाही' याची जाणीव होऊ लागली होती."
"घरगुती हिंसेच्या प्रकरणांमध्ये नवऱ्याचं आर्थिक नियंत्रण उत्तरोत्तर वाढतच जातं. ओरडणे-शिव्या देणे यापासून हिंसेची सुरूवात होते. हळूहळू मारझोड सुरू होते. सगळी चूक तुमचीच होती अशीच जाणीव तुम्हाला सदैव करून दिली जाते. मग तुम्ही किती नालायक, मूर्ख किंवा वाईट आहात असं सतत तुमच्या मनावर ठसवून तुमच्या आत्मविश्वासाचं पद्धतशीर खच्चीकरण केलं जातं."
पहिल्या नवऱ्यासह साडेबारा वर्षें एकाच छताखाली राहूनही रेहामला कधीही आपण घरात राहतोय अशी सुरक्षितता वाटली नाही. यावरून रेहाम त्या घरात किती हलाखीत दिवस ढकलत होत्या याची कल्पना येते.
"फक्त स्वच्छ-सुंदर बिछाने किंवा चमकत्या लाद्या म्हणजे घर नाही ना? जर घरात उत्स्फूर्त हशा पिकत नसेल किंवा ज्यांच्यावर प्रेम करता त्या लोकांचे मायेचे हात नसतील तर त्या चार भिंती असणाऱ्या जागेला घर म्हणता येईल?"
13 वर्षांच्या खडतर वैवाहिक आयुष्यानंतर आणि तीन मुलांच्या बाळंतकळा सहन केल्यानंतर रेहामनं अखेर आपल्या पतीपासून तलाक घेतला. विभक्त झाल्यानंतर सुरुवातीचे दिवस आर्थिकदृष्ट्या फार ओढाताणीचे होते पण किमान मानसिक शांती तरी होती.

फोटो स्रोत, Reham Khan
त्यांनी आधी 'लीगल टीव्ही'मध्ये नोकरी सुरू केली. त्यानंतर 'बीबीसी टेलिव्हिजन'मध्ये त्यांना काम मिळालं. त्या दिवसांबद्दल सांगतांना रेहाम हळव्या होतात. "जेव्हा मी तलाकसाठी अर्ज केला तेव्हा मला एकटीनेच सगळी कायदेशीर कारवाई करावी लागत होती. मुलांना पतीपासून लांब ठेवण्याचाही प्रयत्न करत होते. खिशात आजिबात पैसे नव्हते. तेव्हाचे फक्त 300 पाकिस्तानी रुपये माझ्याकडे होते."
"नवऱ्याबरोबर जे भागिदारीतलं बँकेचं खातं होतं, तेही नवऱ्यानं बंद करून टाकलं. पण पैशांपेक्षा सर्वांत मोठी अडचण माझ्यासाठी होती, ती म्हणजे पतिविरोधात पाऊल पुढे टाकणं. लोक काय म्हणतील या प्रश्नाचा धैर्यानं सामना करणं. पण जेव्हा मी पाऊल उचललं तेव्हा आयुष्य फार सोपं होऊन गेलं. कष्ट खूप करावे लागले पण घराचा एकदम नूरच पालटून गेला. मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू फुलू लागलं आणि मुख्य म्हणजे त्यांना आवाज फूटू लागला."
इमरान यांचा एसएमएस आणि आमंत्रण
मग अचानक त्यांनी ब्रिटनमधली बीबीसीची नोकरी सोडली आणि त्या पाकिस्तानात निघून आल्या. पाकिस्तानात आल्यावर त्या एका नामांकित वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदक म्हणून काम करू लागल्या.
याचदरम्यान, त्यांना दोनवेळा इमरान खान यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. यानंतर काहीच दिवसांनी इमरान खान यांनी रेहाम यांना एक एसएमएस पाठवला आणि त्यांच्याशी भेटीशी इच्छा असल्याचं सांगितलं.
काही दिवस टाळाटाळ केल्यानंतर अखेर रेहाम, इमरान खान यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या. त्यावेळी इमरान खान यांनी थेट लग्नाचा प्रस्तावच रेहाम यांच्यासमोर ठेवला.
रेहाम यांना अजूनही ती भेट नीट लक्षात आहे. त्या विस्तारानं सांगतात, "मी त्यांच्या व्हरांड्यात उभी होते. तर इम्रान लॉनमध्ये त्यांच्या कुत्र्याला रपेट मारण्याच्या कामी गुंतले होते. मध्येच त्यांनी अचानक मला बोलावलं. मला थोडा संकोच वाटला कारण मी उंच टाचेच्या चपला घातल्या होत्या. पण तितक्याच सुचलं. बीबीसीने मला हे शिकवलं होतं की जिथं कुठं आपण जाऊ तिथं आपल्यासोबत नेहमी एक साधी चप्पल जरूर सोबत ठेवावी."

फोटो स्रोत, Reham Khan
"मी तिथेच माझ्या उंच टाचेच्या चपला काढून ठेवल्या आणि साध्या चप्पल घालून इम्रान यांच्यादिशेनं लॉनवर गेले. जसं मी इम्रान यांच्या लॉनच्या दिशेनं गेले तसं माझ्या लक्षात आले की इम्रान यांनी माझ्या चपला उचलून टेबलाच्या मधोमध ठेऊन दिल्या. कुत्र्यानं माझ्या चपलांना काही इजा करू नये म्हणून इम्रान यांनी अशी काळजी घेतली होती."
त्याचदरम्यान एक उत्कष्ठांवर्धक प्रसंग घडला. इम्रान यांच्या लॉनवर रेहाम बसलेली असताना अचानक डासांची फौज तिथं दाखल झाली. त्यांनी इम्रान यांच्या दिशेनं मोर्चा वळवला. इम्रान अचानक खाली वाकले आणि त्यांनी रेहामच्या दोन्ही पायांच्या पोटऱ्यांना झाकले. जणू जे डासांच्या हल्ल्यापासून रेहामचा बचाव करू पाहात होते.
रेहाम सांगतात, "कदाचित डासांना माझं रक्त फार गोड लागलं असावं. इमरान बाथरूमकडे गेले तेवढ्यात अनेक डासांनी माझ्या आसपास घेराव घातला. मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होते. इतक्याच अचानक इम्रान यांनी आपल्या हातांनी माझ्या पोटऱ्यांना झाकून टाकले. मी घाबरून उभी राहिले. त्यांच्या एरवी दिसणाऱ्या रुपापेक्षा हा काही औरच अंदाज होता. खूप काळजीवाहू आणि रोमँटिक अवतार होता तो. जो इसम एरवी इतक्या आपल्याच मस्तीत असतो तो असा माझ्या पायांवर लोळण घेऊ शकतो! यावर माझा विश्वासच बसत नव्हता. त्याच भेटीत त्यांनी माझ्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. मी त्यांना थेटच विचारले की तुम्हाला माहिती आहे का माझे वय 42 वर्षें आहे. इम्रान हसून म्हणाले, चांगलेच आहे की, तुम्हाला थेट पाळण्यातून उचलून आणलं असा आरोप कोणी माझ्यावर नाही ना करणार!"
रेहाम यांनी इम्रान यांचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला. त्यांच्यात काही मतभेद झाले, पण अखेर 31 ऑक्टोबर 2014 रोजी ते दोघे विवाहबंधनात अडकले. इम्रान यांची प्रतिमा तोपर्यंत एका 'प्ले बॉय'ची होती. लग्नानंतरही ती तशीच राहिली का असं मी रेहाम यांना विचारलं.
त्यांचे उत्तर रोखठोक होते, "हे अगदी खरे आहे, की जेव्हा आपण एखाद्याशी जन्मभराची गाठ बांधणार असतो आपण त्याचा भूतकाळ तपासून पाहतो. आमच्या वयस्कर आज्या, काकी-मावश्या काय सांगतात, की जे तरुण लग्नाआधी असे 'आवारा' असतात, ते लग्नानंतर सरळमार्गी होतात. पण हे एकदम चूक आहे. माझ्या स्वानुभवानंतर मी हेच सांगेन की हे ढळढळीत खोटं आहे. जर एखादी गोष्ट त्या व्यक्तीच्या सवयीची झाली असेल तर ती बदलणं कठीण नाही अशक्य आहे. इमरान स्वतःच मला सांगायचे, माझ्या पुस्तकातही त्यांचं ते वाक्य मी मुद्दाम उद्धृत केलं आहे- 'बेबी यू कान्ट टीच ॲन ओल्ड डॉग, न्यू ट्रिक.' अर्थात तुम्ही काहीही करा मी सुधारणाऱ्यातला नाही."

फोटो स्रोत, Reham Khan
'जुन्या गर्लफ्रेंडबद्दलच्या गप्पा ते मला ऐकवत असत'
दुर्देवानं याहीवेळी रेहामच्या पदरी निराशाच आली. लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून इम्रान आणि रेहाम यांच्यातलं अंतर वाढत गेलं. काही बाहेरच्या लोकांची लुडबुड आणि इम्रान यांची पहिली पत्नी जमाइमा गोल्डस्मिथ हिचा प्रभाव जो त्यांच्यावर अजूनही कायम आहे. या कारणांमुळे सारं बिनसत गेलं.
मी रेहाम यांच्याकडे आणखी खोलात जाऊन चौकशी केली. "त्यांची पहिली पत्नी किंवा आणखी काही स्त्रियांबद्दल ते तुमच्याशी बोलायचे का?"
रेहामचं उत्तर होतं, "खूप मोठ्या प्रमाणावर, अगदी मर्यादेपलीकडे. इतर लोकांबाबतचेही खूप प्रसंग त्यांनी मला सांगितले. साधारणपणे स्त्रियांना नवऱ्यांच्या भूतकाळाबद्दलच्या किस्स्यांमध्ये फारसा रस नसतो. मात्र इमरान त्यांच्या आधीच्या बायका आणि पूर्वीच्या गर्लफ्रेंड्स यांच्याबद्दल बोलून थकतच नसत. अखंड त्याबद्दल बोलत राहत. आता जेव्हा माझं पुस्तक लोकांनी वाचलं तेव्हा इमरान यांच्या आयुष्याचा एकेकाळी भाग असलेल्या अनेकजणांनी याची कबुली दिली की जे किस्से रेहाम यांनी पुस्तकात नोंदवले आहेत, तेच किस्से इमरान यांनी त्यांनाही सांगितले होते."
सत्तरच्या दशकात एका बॉलिवूड अभिनेत्रीसह इम्रान यांच्या गुफ्तगूची अत्यंत मसालेदार चर्चा रंगवून सांगितली जात असे. इम्रान यांनी हे सर्व किस्से खरे असल्याची कबुली रेहाम यांच्याकडे दिली होती.
रेहाम सांगतात, "त्या अभिनेत्रीनं माझा चक्क लंडनपर्यंत पिच्छा केला होता, मला तर तिची भीतीच वाटू लागली होती, असं इम्रानने मला सांगितलं होतं. मात्र नंतर एक वेगळाच खुलासा माझ्यासमोर आला. त्या अभिनेत्रीच्या परिचयातल्या एकानं मला खासगीत सांगितलं की खरंतर इम्रानच हात धुवून तिच्या मागे लागला होता. नंतर 'नाव मोठं आणि लक्षण खोटं' असे उद्गार त्या अभिनेत्रीनं इम्रान यांच्याबद्दल काढले होते असंही मला कळलं."

फोटो स्रोत, Reham Khan
इम्रान यांचं खासगी आयुष्य तसंच त्यांच्या वागण्या-बोलण्यातला अनेक बाबी रेहाम यांना पसंत पडल्या नाहीत. इम्रानच्या गोटातूनही रेहामविरोधी मोहीम सुरू झाली होती.
रेहाम आठवून सांगतात, "इम्रान माझ्याबद्दल नेमका काय विचार करतात, हे मला कधी कळूच शकलं नाही. जे एक वर्षभर आम्ही सोबत होतो, तो पूर्ण काळ ते माझी तारीफ करून थकत नसत. जेव्हा जेव्हा मी कुठे भाषण देऊन येत असे वा मुलाखतीवरून येत असे ते माझं इतकं कौतुक करत की मला अवघडल्यासारखं होत असे. पण माझ्यामागे एक मोठे कारस्थान रचलं जात होतं, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे इमरान स्वतःही त्या कारस्थानाचा भाग होते. लग्नाआधी आणि लग्नानंतर ते ज्याप्रकारे पक्षाचं कामकाज चालवत त्यावर माझा आक्षेप होता, हे शंभऱ टक्के सत्य होतं. अशांना त्यांनी पक्षात स्थान दिले होतं, जे ना तर प्रामाणिक होते ना त्यांच्याकडे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी होती. या सगळ्यांची मी इम्रान यांच्याकडे नेहमी तक्रार करत असे."
"मी तुझ्या सल्ल्यानुसार काम करेन, असं लग्नाआधी इम्रान सांगत असत. मात्र लग्नानंतर जेव्हा मी याबद्दलच विचारणा करत असे तेव्हा ते मला गप्प बसवत किंवा ओरडून शांत राहण्याचा सल्ला देत. त्यांच्या पक्षात माझं वजन वाढण्याचा वगैरे प्रश्नच नव्हता कारण इमरान यांना माझ्याशी कोणत्याही राजकीय विषयावर बोलणं पसंतच नव्हतं. काही दिवसांनी तर त्यांनी मला सांगूनच टाकलं की कोणत्याही राजकीय गोष्टीवर बोलायचं असेल तर मला लिहून देत जा, कारण संध्याकाळचा वेळ त्यांनी संगीत ऐकण्यासाठी राखून ठेवली होती. मला ही गोष्ट खूप विचित्र वाटली होती."
इम्रानच्या आसपास राहणारे लोक, काळीजादू, जादुई तावीज- लॉकेट आणि इम्रानचं वादळी खासगी आयुष्य या एकाहून एक वादग्रस्त गोष्टींमुळेच रेहाम, इम्रान यांच्यापासून दूर गेल्या असं त्यांच म्हणणं आहे.
त्या काळातले दिवस आठवून त्या सांगतात, "खरं सांगू, मी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. इम्रान यांचा पक्ष म्हणजे 'स्टेटस-को'वाला पक्ष आहे, हे एप्रिल महिन्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि खुद्द इम्रानही त्यात सुधारणा करू शकत नाहीत. चुकीचं काम करणाऱ्यांना थांबवण्याची किंवा त्यांना शासन करण्याची इमरान यांच्यात हिंमत नाही असंच मला खूप काळ वाटत होतं. भ्रष्टाचारी पार्श्वभूमी असणारे आणि भूमाफिया म्हणता येतील असेच लोक इम्रान यांच्या कायम आसपास असत."
"त्यांच्या परिचयातला एक गृहस्थ मला लंडनमध्ये भेटला आणि त्याने मला 'किचन मनी'ची ऑफर दिली. मला हे खूपच अपमानास्पद वाटलं, मात्र इम्रानला याचं काहीच वाटलं नाही. त्या गृहस्थाचेच पैसे इम्रानच्या घरीही येत आणि त्यांचं घर त्या पैशावरच चाले. जो माणूस आज तुम्हाला पाच लाख रूपये देतो आहे, जेव्हा तुम्ही कुणीतरी बनाल, तेव्हा हाच गृहस्थ तुमच्याकडून पाच कोटी रुपयांची अपेक्षा करेल, असं मी इम्रानच्या कानीकपाळी ओरडून सांगण्याचा, समजवण्याचा प्रयत्न करत असे."

फोटो स्रोत, Reham Khan
"मात्र कोणतेही काम करण्यापूर्वी एकदा का होईऩा इम्रान माझ्याशी जरूर बोलत. ते विचारत, 'हा जो निळा टाय मी बांधला आहे, तो एकदम ठिक आहे ना', तर मी सांगितले 'एकदम ठीक आहे. छान दिसतोय.' तर ते जाऊन गुलाबी टाय घालून येत. ऑगस्ट महिना उजाडता-उजाडता मी काहीसा स्पष्ट निषेध नोंदवू लागले होते. 'तुम्ही माझे मत विचारताच का जर तुम्हाला त्याच्या उलटच कृती करायची आहे?', असं मी थेट बोलू लागले होते."
इम्रान यांच्या प्रतिमेला धक्का बसावा म्हणून पुस्तक लिहले?
रेहाम यांचं हे पुस्तक अगदी मोक्याच्या वेळी प्रसिद्ध झालं! इम्रान खान जेव्हा पाकिस्तानातल्या सार्वत्रिक निवडणुका लढवत होते, बरोबर त्याच वेळी पुस्तकही आलं. या पुस्तकाच्या निमित्तानं रेहाम यांनी इम्रान यांच्या राजकीय प्रतिमेला धक्का बसावा अशी खेळी खेळल्याच्याही सवंग चर्चा रंगल्या.
मात्र त्यांचा हा हेतू असला तरी तो सफल झालेला नाही. इम्रान खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे.
अशा पार्श्वभूमीवर इम्रान यांच्याशी विभक्त होण्याचा पश्चाताप होतो का नाहीतर आज तुम्ही फस्ट लेडी होऊ शकला असतात? असं मी रेहाम यांना विचारलं.
रेहाम यांचं उत्तर होतं, "एका अशा व्यक्तीबरोबर जमवून घेणं माझ्यासाठी पूर्णपणे अशक्यच होतं. त्यांनी फक्त माझ्याशी गैरवर्तन केलं असतं तर एकवेळ मी खपवून घेतलं असतं पण ते देशाबरोबर बेईमानी करत होते. देशाच्या भविष्याचा खेळखंडोबा करत होते. ज्या कारणासाठी इम्रान यांनी माझ्याशी लग्न केले ते कारणच मुळात चुकीचं होतं. त्यांच्या बरोबरची माझी जोडी एकदम विजोड होती, हेच खरं."
"एका राजकारण्याची वा पंतप्रधानाची पत्नी व्हावं अशी माझी जडण-घडण झालेलीच नाही. कुणी काही चुकीचं करत असेल तर त्याकडे कानाडोळा करून पुढे जाणं माझ्यासाठी अशक्य आहे. मी ते करू शकत नाही. जेव्हा आमच्यातलं नातं संपलं तेव्हा अशा माणसाशी लग्न करण्याइतपत मूर्ख मी कशी काय होते, याचंच मला राहून राहून आश्चर्य वाटत राहिलं."
रेहाम खान नामक वादळात दडलेला संताप या उत्तरांतून अचूक व्यक्त होतो एवढं नक्की!
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








