पाकिस्तान निवडणुकीत विजयी झाल्या या महिला उमेदवार

एका गोष्टीसाठी पाकिस्तानची ही निवडणूक विशेष ठरली - महिलांचा सहभाग.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, एका गोष्टीसाठी पाकिस्तानची ही निवडणूक विशेष ठरली - महिलांचा सहभाग.

25 जुलैला झालेल्या पाकिस्तान निवडणुकांमध्ये इम्रान खान यांचा पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून समोर आला.

पाकिस्तानला वर्ल्ड कप मिळवून देणाऱ्या या कॅप्टनचा राजकीय मैदानातला हा विजय, त्यांचे लष्कराशी असणारे कथित संबंध, माजी पंतप्रधान आणि त्यांचे प्रतिस्पर्धी नवाझ शरीफ यांना भ्रष्टाचारप्रकरणी झालेली शिक्षा, या सगळ्या मुद्दयांमुळे यंदाची ही निवडणूक गाजली.

पण त्याचबरोबर आणखी एका गोष्टीसाठी ही निवडणूक विशेष ठरली - महिलांचा सहभाग.

पाकिस्तानच्या निवडणूक नियम 2017च्या कलम 206 नुसार सगळ्या पक्षांच्या उमेदवारांपैकी पाच टक्के उमेदवार महिला असणं आवश्यक आहे.

हेच कारण आहे की नॅशनल असेंब्लीच्या एकूण 272 जागांपैकी 171 जागांवर वेगवेगळ्या पक्षांनी महिला उमेदवारांना तिकीट दिलं.

पाकिस्तान पीपल्स पार्टीने (PPP) सगळ्यांत जास्त 19 महिला उमेदवारांना मैदानात उतरवलं होतं, तर उजव्या विचारसरणीचा पक्ष मुत्ताहिदा मजलिस-ए-अमल (MAM) ने 14 महिलांना तिकीट दिलं होतं.

इम्रान खान पंतप्रधान होणार आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इम्रान खान पंतप्रधान होणार आहे

इम्रान खान यांच्या PTIने 11 महिलांना उमेदवारी दिली तर जमात-उल-दावाच्या अल्ला-हू-अकबर पक्षानेही तीन महिलांना तिकीट दिलं.

पहिल्यांदा इतक्या महिला उमेदवार

पाकिस्तानात पहिल्यांदाच इतक्या महिला राजकीय रिंगणात उतरल्या. 2013च्या निवडणुकांमध्ये 135 महिला मैदानात होत्या.

या सगळ्यांमध्ये एक नाव अली बेगम यांचंही आहे, ज्या पुरुषप्रधान कबायली भागातून निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या महिला आहेत.

पाकिस्तान निवडणूक आयोगाचा एक नियम असंही सांगतो की कोणत्याही मतदारसंघात 10 टक्क्यांपेक्षा कमी महिलांनी मतदान केलं तर त्या ठिकाणी झालेली मतदान प्रक्रिया रद्द केली जाईल.

पाकिस्तान निवडणूक
फोटो कॅप्शन, पाकिस्तानातलं फक्त महिलांसाठी असणारं मतदान केंद्र

निवडणूक आयोगाच्या या अटीनंतर सगळ्या पक्षांनी महिला उमेदवारांना तिकिटं तर दिली, पण महिला संघटनांनी आरोप केला की या महिलांना कमी महत्त्वाच्या जागांवर लढवलं जात आहे.

या पार्श्वभूमीवर एक नजर निवडणूक लढवणाऱ्या आणि जिंकणाऱ्या काही पाकिस्तानी महिलांवर -

जुगनू मोहसीन

जुगनू मोहसीन पंजाब प्रांतातून निवडून आल्या आहेत. त्या अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या होत्या.

जुगनू नजम सेठी यांच्या पत्नी आहेत, जे पंजाब प्रांताचे माजी मुख्यमंत्री आहेत. सध्या ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे चेअरमन आहेत.

पाकिस्तान निवडणूक

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, जुगनू मोहसीन

राजकारणाव्यतिरिक्त जुगनू पत्रकारितेतही सक्रिय होत्या. त्या 'द फ्रायडे टाईम्स'च्या सहसंस्थापक आहेत.

1999 मध्ये त्यांचे पती नजम सेठी यांना नवाज शरीफ सरकारने पत्रकारितेशी संबंधित कामांवरून अटक केली होती. त्यावेळी आपल्या पतीच्या सुटकेसाठी जुगनू यांनी लढा उभा केला होता, ज्यामुळे त्या पहिल्यांदा चर्चेत आल्या होत्या. त्यांच्या या लढ्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली होती.

जरताज गुल

जरताज गुल यांनी PTI पक्षाच्या तिकीटवर दक्षिण पंजाबमधून नॅशनल असेंब्ली 191 डेरा गाजी खान-III मधून निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या.

जरताज गुल यांना 79 हजार मतं मिळाली तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी, म्हणजेच पाकिस्तान मुस्लीम लीगच्या सरदार ओवेस लेघरींना 54 हजार 548 मतं मिळाली.

पाकिस्तान निवडणूक

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, जरताज गुल

त्यांचा जन्म 1994 मध्ये फाटा प्रांतात झाला होता. त्यांचे वडील वजीर अहमद जई सरकारी अधिकारी होते.

विजयी घोषित झाल्यानंतर गुल यांनी ट्वीट करून अल्लाहचे आणि PTIचे अध्यक्ष इम्रान खान यांचे आभार मानले.

शम्स उन निसा

शम्स उन निसा पाकिस्ताना पीपल्स पार्टीच्या सक्रिय सदस्य आहेत. त्यांनी थाटा भागातून दणदणीत विजय प्राप्त केला. दणदणीत म्हणजे नेमका कसा?

त्यांना 1 लाख 52 हजार मतं मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले PTIचे उमेदवार अर्सलन बख्श ब्रोही यांना फक्त 18 हजार 900 मतं मिळाली.

2013मध्येही शम्स उन निसा याच क्षेत्रातून निवडणूक जिंकल्या होत्या. त्यांना ही निवडणूक जिंकण्याची संधी मिळाली कारण 2013 मध्येच सादिक अली मेमन यांना दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून आपली खासदारकी गमवावी लागली होती.

डॉक्टर फहमिदा मिर्झा

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या माजी अध्यक्ष फहमिदा मिर्झांनी आपली जागा पुन्हा जिंकली आहे. त्या ग्रँड डेमोक्रॅटिक अलायन्सच्या (GDA) उमेदवारीवर सिंध प्रांतातल्या बादीन भागातून विजयी झाल्या आहेत.

फहमिदा पाचव्यांदा पाकिस्तान संसदेत निवडून गेल्या आहेत. सलग पाच वेळा एका मतदारसंघातून विजयी झालेल्या फहमिदा पहिल्या महिला उमेदवार आहेत.

पाकिस्तान निवडणूक

फोटो स्रोत, Twitter/Facebook

फोटो कॅप्शन, डॉक्टर फहमिदा मिर्झा

त्यांनी 1997 मध्ये पहिल्यांदा PPPच्या तिकिटावर नॅशनल असेंब्लीची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्या 2002, 2008, 2013 मध्ये PPPच्या उमेदवार म्हणून जिंकल्या होत्या.

या वर्षाच्या जून महिन्यात त्यांनी PPPची साथ सोडून GDA सोबत जाण्याचा निर्णय घेतला.

या महिलांच्या कामगिरीनंतर हे स्पष्ट झालं आहे की तिथल्या राजकारणात महिला हळूहळू जम बसवत आहेत.

तसं पाहिलं तर पाकिस्तानच्या राजकारणात महिलांचा सहभाग बऱ्याच काळापासून आहे. बेनझिर भुत्तो पंतप्रधानही होत्या.

या व्यतिरिक्त नवाज शरीफ यांची मुलगी मरियम शरीफ यांच्यापासून ते माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांच्यापर्यंत महिलांनी राजकारणात आपली जागा बनवली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त