'ते' 72 तास आणि कमांडर अभिलाष टॉमी यांची झुंज

अभिलाष

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अभिलाष
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

वादळानं उसळता हिंदी महासागर, 45 फूट उंच लाटा, 70 नॉट्स म्हणजे ताशी 130 किलोमीटर वेगानं वाहणारा वारा आणि एक शिडाची नौका वगळता दूरदूरपर्यंत कुठलाच आसरा नाही.

भारतीय नौदलाचे अधिकारी कमांडर अभिलाष टॉमी शुक्रवारी अशाच परिस्थितीत सापडले होते, जेव्हा त्यांच्या नौकेला अपघात झाला. नौकेचं शीड तुटलं, तेव्हा जवळचा पश्चिम ऑस्ट्रेलियाचा किनाराही तब्बल 3200 किलोमीटर दूर होता.

'गोल्डन ग्लोब राऊंड द वर्ल्ड' या नौकानयन शर्यतीच्या 83व्या दिवशी पहाटे कमांडर अभिलाष यांच्यावर ओढवलेल्या संकटाची माहिती त्यांनी स्वतःच आयोजकांना पाठवली.

सॅटेलाईट फोनही बंद पडल्यानं टेक्स्टिंग युनिटच्या आधारानं त्यांनी संपर्क साधला. 'माझ्या पाठीला गंभीर दुखापत झाली असून मी हालचाल करू शकत नाही, मला बहुतेक स्ट्रेचर लागेल. मी बोटीत सुरक्षित आहे. माझा सॅटेलाईट फोन बंद पडला आहे..'

अशी झाली सुटका

हा संदेश मिळताच अभिलाष टॉमी यांच्या मदतीसाठी अनेक देश एकत्र आले. भारतीय नौदल, ऑस्ट्रेलियाचं नौदल आणि हिंदी महासागराच्या त्या पट्ट्यात आसपास असणारी जहाजं एकत्रितपणे कामाला लागली.

अखेर 'ओसायरिस' हे मासेमारी करणारं फ्रेन्च जहाज भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कमांडर अभिलाष टॉमी यांच्यापर्यंत पोहोचलं आणि त्यांची सुटका करण्यात आली.

Nick Jaffe

फोटो स्रोत, Nick Jaffe

भारतीय नौदलाचे प्रवक्ता कॅप्टन डी. के शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार कमांडर टॉमी यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. त्यांना आता लवकरच एका ऑस्ट्रेलियन जहाजावर नेलं जाणार असून त्यानंतर भारतीय नौदलाच्या जहाजावर आणलं जाईल.

'धाडसी आणि जिद्दी खलाशी'

कमांडर टॉमी यांची सुटका झाल्याचं कळताच त्यांचे सहकारी आणि दिग्गज खलाशी कॅप्टन दिलीप दोंदे यांनीही इतरांप्रमाणेच सुटकेचा निश्वास टाकला आहे.

"जेव्हा अपघाताबद्दल कळलं, तेव्हा काळजी वाटली होती. मोठाच अपघात झाला होता बोटीला. पण ही खात्री पण होती, की अभिलाष त्यातून मार्ग काढेल."

कॅप्टन दोंदे हे शिडाच्या नौकेतून एकट्यानं पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले भारतीय आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या कमांडर अभिलाष टॉमी यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत 2012 साली एकट्यानं, नॉनस्टॉप, कुठेही न थांबता पृथ्वीप्रदक्षिणेचा पराक्रम गाजवला होता.

त्या कामगिरीसाठी टॉमी यांना कीर्ती चक्र हा भारतीय सेनादलांतला दुसरा सर्वोच्च सन्मान आणि साहसी क्रीडापटूंसाठीचा देशातील सर्वोच्च तेनसिंग नोर्गे पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. केरळच्या चंगनाशेरी गावात जन्मलेल्या कमांडर अभिलाष यांच्याकडे सेलिंग आणि यॉटिंगच्या दुनियेतला एक आयकॉन म्हणून पाहिलं जातं.

थुरिया

फोटो स्रोत, @indiannavy

फोटो कॅप्शन, थुरिया या यॉटची सद्यस्थिती

कोल्हापूरची यॉट्सवूमन तारामती मतीवाडे सांगते, "खलाशांना धाडसी असावं लागतंच. कमांडर अभिलाष हे तर इतिहास घडवणारे आहेत. त्यांच्या कष्टांचं, धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडंच"

"मी बऱ्याच वर्षांपासून ओळखतो त्याला. धाडसी माणूस आहे आणि जे एकदा ठरवलं ते करायची जिद्द आहे त्याच्यात," अभिलाष यांचं वर्णन करताना कॅप्टन दोंदे सांगतात.

अभिलाष यांच्या याच धाडस आणि जिद्दीची गोल्डन ग्लोब शर्यतीदरम्यान महासागरानं पूर्ण परीक्षा पाहिली.

काय आहे गोल्डन ग्लोब रेस?

1 जुलै 2018 रोजी फ्रान्समधून सुरू झालेल्या या नौकानयन शर्यतीत 13 देशांचे 18 खलाशी उतरले खरे, पण 85 दिवसांतच त्यातल्या सात जणांनी माघार घेतली आहे.

भारतीय नौदलानं तयार केलेल्या 'तुरिया' या खास नैकेसह कमांडर अभिलाष टॉमी गोल्डन ग्लोब शर्यतीत भारताचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले.

अभिलाष यांची थुरिया ही यॉट
फोटो कॅप्शन, अभिलाष यांची थुरिया ही यॉट

नौकेतून जगभ्रमंतीची ही शर्यत जगातल्या सर्वांत कठीण शर्यतींपैकी एक का आहे, हे कॅप्टन दोंदे यांनी सांगितलं. "गेल्या पन्नास वर्षांत याआधी केवळ एकदाच अशा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि नऊ स्पर्धकांपैकी केवळ एकालाच ती पूर्ण करता आली होती."

अभिलाष यांची 'तुरिया' नौका पन्नास वर्षांपूर्वीची ती शर्यत जिंकणाऱ्या रॉबिन नॉक्स-जॉन्स्टन यांच्या बोटीचीच एक प्रतिकृती आहे. सॅटेलाईट फोन वगळता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता जवळपास 30 हजार मैलांचं अंतर पार करण्याचं आव्हान अभिलाष यांच्यासमोर होतं.

महासागराचं आव्हान

हिंदी महासागराच्या दक्षिण भागात तर हे आव्हान आणखी कठीण बनतं. ज्या भागात अभिलाष यांचा अपघात झाला आहे, ती जागा जगातल्या सर्वांत दुर्गम प्रदेशांपैकी एक आहे. "तिथं फार मासेमारी होत नाही, जहाजंही फारशी जात नाहीत. तिथं फारशी जमीन नाही आणि त्यामुळं बंदरंही नाहीत," कॅप्टन दोंदे सांगतात.

या परिसरात सागरी प्रवाह आणि वारेही आणखी तीव्र असतात. महासागराचं हवामान वेगानं बदलू शकतं. त्यामुळे अपघात झाला तर कुणाला वाचवणं आणखी कठीण बनतं.

अभिलाष यांच्यापर्यंत मदत पोहोचण्यासाठीही तीन दिवस लागले, याकडे कॅप्टन दोंदे यांनी लक्ष वेधलं आहे. "कधीकधी अपघात होतात. पण आम्ही बोट अतिशय सज्ज केली होती. त्याच्याकडे संपर्क साधण्याची, मदत मागणारी सर्व यंत्रणा होती. त्याचा त्याला फायदा झाला."

आयोजकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अभिलाष यांची बोट उलटल्यामुळे शिड मोडलं आणि ते जायबंदीही झाले. ही परिस्थिती कीती धोकादायक ठरू शकते, हे दोंदे यांनी स्पष्ट केलं.

भारतीय नौदल

फोटो स्रोत, Indian Navy

फोटो कॅप्शन, कमांडर अभिलाश टॉमी यांची सुटका होताना भारतीय नौदलाच्या P8I aircraftनं हे छायाचित्र घेतलं आहे.

"जेव्हा बोट उलटते, तेव्हा बोटीचं नुकसान होतंच, पण खलाशालाही गंभीर इजा होण्याची शक्यता असते. अभिलाषच्या पाठीला दुखापत झाल्यानं त्याला बोट दुरुस्त करणं दूरच, साधी हालचाल करणंही कठीण झालं असावं. अशा परिस्थितीत मदतीसाठी संदेश पाठवणं, हायड्रेट राहण्यासाठी खात पीत राहणं आणि वाट पाहणं हेच हातात असतं."

हीच गोष्ट सोपी वाटली तरी सर्वात कठीण आहे, पण अशक्य नाही, याकडे दोंदे यांनी लक्ष वेधलं आहे. "मानवी शरीर आणि मनाचं असंच आहे. ते कणखर बनू शकतं. अशा संकटात सापडल्यावर तुमच्या साठवलेल्या उर्जेचा वापर करावा आणि जगण्याचे प्रयत्न करावेत. दुसरा पर्यायच नसतो पुढे."

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)