येमेनमधलं मानवी संकट आणखी गडद, 36,000 मुलांच्या भूकबळीची भीती

येमेन. संघर्ष

फोटो स्रोत, Getty Images

येमेनमधला राजकीय आणि सामाजिक संघर्ष पेटलेला असतानाच दहा लाख लहान मुलं दुष्काळाचे चटके सहन करत आहेत. लहान मुलांसाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील 'सेव्ह द चिल्ड्रन' या स्वयंसेवी संस्थेनं या लहान मुलांचं बालपण वाचवा असं आवाहन केलं आहे.

अन्नधान्याच्या वाढत्या किमती आणि येमेनी चलनाचं ढासळतं मूल्य यामुळे अधिकाअधिक कुटुंबांना गुजराण करणं अवघड झालं आहे. अन्नधान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

येमेनमधल्या बंडखोरांनी ताब्यात घेतलेल्या आणि महत्त्वपूर्ण बंदर असलेल्या ह्युडायदाह या शहराला असलेला धोका वाढला आहे. हे शहर टिकवणं येमेनपुढचं आव्हान आहे.

इथं 5.2 दशलक्ष मुलं दुष्काळाच्या छायेत आहेत.

येमेनमध्ये संघर्ष का?

हौदी बंडखोरांनी 2015मध्ये येमेनच्या पश्चिम भागावर ताबा मिळवला. याचा परिणाम म्हणून राष्ट्राध्यक्ष अब्द्राबूह मन्सौर हादी यांना देश सोडावा लागला. यामुळे येमेनमध्ये संघर्ष पेटला.

येमेन. संघर्ष

फोटो स्रोत, Save the Children

फोटो कॅप्शन, येमनमध्ये दुष्काळामुळे लहान मुलांना फटका बसला आहे.

इराणचा पाठिंबा असलेल्या बंडखोरांच्या फौजांनी येमेनमध्ये थैमान घातल्यानं संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि सात इतर अरब देशांनी येमेनमध्ये सरकारची पुनर्स्थापना व्हावी यासाठी प्रयत्न केले.

नागरिकांवर काय परिणाम?

सरकार आणि बंडखोरांमधल्या संघर्षामुळे शिक्षक तसंच असंख्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकलेत. काही लोकांना तर दोन वर्षं पगारच मिळाला नाही.

ज्यांना थोडेफार पैसे मिळत होते त्यांना प्रचंड महागाईला सामोरं जावं लागत होतं. युद्ध सुरू होण्यापूर्वीच्या तुलनेत अन्नधान्याच्या किंमती 68 टक्क्यांनी वाढल्या होत्या.

सेव्ह द चिल्ड्रनच्या दाव्यानुसार येमेनी चलनाची किंमत 180 टक्क्यांनी घसरली.

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : येमेनमधला संघर्ष निर्माण करतंय मानवी संकट

या महिन्याच्या सुरुवातीला येमेनी चलनाचं मूल्य सर्वाधिक घसरलं. याचा सर्वाधिक फटका येमेनी जनतेला बसला.

या संघर्षामुळे बंदर शहर असलेल्या ह्युडायदाह शहराला वेढा पडण्याची शक्यता आहे. यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

दुष्काळ रोखण्यासाठी देशातल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा याच शहराच्या माध्यमातून होतो. गेल्या वर्षी कॉलराच्या साथीनं हजारो नागरिकांना ग्रासलं होतं.

सेव्ह द चिल्ड्रनचं काय म्हणणं

येमेनमधल्या हजारो मुलांना पुढचं जेवण मिळेल का हे ठाऊक नाही, असं सेव्ह द चिल्ड्रन इंटरनॅशनलनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेले थॉर्निंग श्मिडट यांनी सांगितलं.

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : येमेनमधला हवाई हल्ला तुम्हाला विचलित करू शकतो

"उत्तर येमेनमधल्या एका रुग्णालयाला मी भेट दिली. रडण्याएवढीही ताकद त्यांच्या अंगात शिल्लक राहिली नव्हती. भूकेनं त्यांना क्षीण आणि कृश केलं होतं. युद्धामुळे येमेनमधली लहान मुलांची एक पिढी लयाला जाणार आहे. बॉम्बस्फोट ते जीवघेणे आजार यातच त्यांचं आयुष्य संपून जाईल', असं थॉर्निंग यांनी सांगितलं.

सेव्ह द चिल्ड्रन या स्वयंसेवी संस्थेनं येमेनमधल्या पाच ते सात वयोगटातल्या 400,000 कुपोषित मुलांवर उपचार केले. या वर्षअखेरीपर्यंत 36,000 मुलं त्यांचा जीव गमावू शकतात अशी भीती या संस्थेनं व्यक्त केली आहे.

साधारण 10,000 माणसं यापैकी दोन तृतीयांश टक्के सर्वसामान्य नागरिक आहेत ज्यांचा मृत्यू झाला आहे तर 55,000 माणसं जखमी झाली आहेत अशी माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)